शुभम गायकवाड, Jaysingpur: शिरोळ विधानसभा मतदारसंघात महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी ४०,८१६ इतके मताधिक्य घेत महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना पराभवाचा धक्का दिला. परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार उल्हास पाटील यांची अनामत रक्कम जप्त झाली.
खरी लढत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील, स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील यांच्यात झाली. यड्रावकरांकडून खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने यांनी, गणपतराव पाटलांकडून माजी मंत्री सतेज पाटील तर उल्हास पाटलांकडून माजी खासदार राजू शेट्टी यांनी खिंड लढवली.
मोठ्या चुरशीने झालेल्या विधानसभा निवडणुकीत गेले पंधरा दिवस आर-प प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. मतमोजणी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होती. सुरुवातीपासूनच आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर कमी-अधिक फरकाने आघाडीवर होते. मतमोजणीच्या एकूण २२ फेऱ्या झाल्या. कवठेसारपासून मतमोजणी सुरू झाली होती, तर मतमोजणीचा शेवट खिद्रापूरमध्ये झाला. शिरोळ तालुक्यातील मतदारांनी राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या विकासकामांना प्राधान्य दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
कॅबिनेट मंत्रिपदाची चर्चा
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील- यड्रावकर अपक्ष निवडून आले होते. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते आरोग्य राज्यमंत्री होते. राजकीय घडामोडीत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. नंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्या मंत्रिमंडळाची पूर्तता कॅबिनेट मंत्रिपदाच्या रूपाने होईल, अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.
मतांची आकडेवारी
राजेंद्र पाटील यड्रावकर- (राजर्षी शाहू विकास आघाडी) – १,३४,६३०, गणपतराव पाटील- काँग्रेस- ९३,८१४, तर उल्हास पाटील – स्वाभिमानी पक्ष- २५,०१०