Home » Blog » कोल्हापूर : महायुतीकडून महाविकास आघाडीचा १०-० धुव्वा

कोल्हापूर : महायुतीकडून महाविकास आघाडीचा १०-० धुव्वा

महाविकास आघाडीला भोपळा

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur

कोल्हापूर, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने १० पैकी १० जागा जिंकून शंभर टक्के घवघवीत यश मिळविले. महाविकास आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांच्या हातात भोपळा लागला. महायुतीच्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मित्र पक्ष जनसुराज्य शक्ती पक्षाने दोन जागा जिंकल्या. चंदगडच्या जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला असला तरी ते भाजपचे कट्टर समर्थक असल्याने जिल्ह्यात महायुतीने महाविकास आघाडीचा १०-० असा धुव्वा उडवला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ (कागल), माजी मंत्री जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे (शाहूवाडी) , माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (शिरोळ), शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर (राधानगरी) यांनी विजय मिळवत आपली जागा कायम ठेवली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (करवीर), भाजपचे अमल महाडिक (कोल्हापूर दक्षिण)  यांनी कमबॅक करत युतीचा झेंडा फडकविला. जिल्ह्यात तीन नवीन चेहरे निवडून आले असून त्यामध्ये भाजपचे राहूल आवाडे (इचलकरंजी), जनसुराज्यचे अशोकराव माने (जनसुराज्य)  आणि अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील (चंदगड) यांचा समावेश आहे.

आमदार राजूबाबा आवळे (हातकणंगले), ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण), राजेश पाटील )चंदगड या तीन विद्यमान आमदारासह माजी आमदार के.पी.पाटील (राधानगरी), डॉ. सुजीत मिणचेकर (हातकणंगले), सत्यजीत पाटील सरुडकर (शाहूवाडी), उल्हास पाटील (शिरोळ) यांना पराभव स्वीकारावा लागला. करवीरमधून राहूल पाटील, कागलमधून समरजीत घाटगे, चंदगडमधून नंदाताई बाभूळकर यांनी चांगली लढत दिली पण त्यांना पराभवास सामोरे जावे लागले.

कागलमध्ये मुश्रीफांची डबल हॅटट्रीक

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांचा पराभव डबल हॅटट्रीक साजरी केली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. मुश्रीफांनी मतमोजणीच्या सुरवातीपासून मताधिक्य मिळवत विजय साकारला. हसन मुश्रीफांनी एक लाख ४३ हजार ८२८ मते मिळाली तर समरजीत घाटगे यांना एक लाख ३१ हजार ९४९ मते मिळाली. मुश्रीफांनी ११ हजार ८७९ मतांनी विजय मिळवला. २०१९ आणि २०२४ अशा सलग दोन निवडणूकीत मुश्रीफांनी घाटगेंचा पराभव केला. मुश्रीफांना माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी खासदार संजय मंडलिक यांनी पाठिंबा दिला होता.

राजेंद्र पाटील यड्रावकर सलग दुसऱ्यांदा विजयी

शिरोळ मतदारसंघात शिवसेना शिंदे गट पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांचा ४० हजार ८८९ मतांनी पराभव केला. यड्रावकर यांनी सलग दुसऱ्यावेळी विजय मिळवला आहे. यड्रावकर यांना एक लाख ३३ हजार ७३१ मते मिळाली तर गणपतराव पाटील यांना ९२ हजार ८४२ मते मिळाली. माजी आमदार उल्हास पाटील यांना २४ हजार ८१० मते मिळाली.

शाहूवाडी सलग दुसऱ्यांदा विनय कोरे विजयी

शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर यांचा ३६ हजार ५३ मतांनी पराभव केला. कोरे यांना एक लाख ३६ हजार ६४ मते तर सत्यजीत पाटील यांना एक लाख ११ मते मिळाली. मतमोजणीच्या सुरवातीला सत्यजीत पाटील यांनी आघाडी घेतली होती. मतदानाचे पारडे वरखाली होत होते. पण पन्हाळा तालुक्यात कोरेंनी मोठे मताधिक्य मोठ्या फरकाने विजय संपादन केला.

राधानगरीत प्रकाश आबिटकरांची हॅटट्रीक

राधानगरी मतदारसंघात आमदार प्रकाश आबिटकरांनी सलग तिसऱ्यांदा विजय संपादन करत हॅटट्रीक साधली. त्यांनी सलग तिसऱ्यांदा माजी आमदार के.पी. पाटील यांचा पराभव केल्याने के.पी.चीही पराभवाची हॅटट्रीक झाली. आबिटकरांनी के.पी. पाटील ३७ हजार ५७२ मतांनी पराभव केला. आबिटकर यांना एक लाख ४२ हजार १२५ तर के.पी.पाटील यांना एक लाख चार हजार १८६ मते मिळाली. के.पी. पाटील यांचे मेव्हणे अपक्ष उमेदवार ए.वाय. पाटील यांना १८ हजार ८९१ मते मिळाली. आबिटकरांनी सुरवातीपासून आघाडी घेतली होती. त्यांना राधानगरी आणि भुदरगड या दोन्ही तालुक्यात मताधिक्य मिळाले.

राजेश क्षीरसागर यांचे कमबॅक

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जोरदार कमबॅक करत काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचा २९ हजार ५५३ मतांनी पराभव केला. सुरवातीला बारा फेऱ्यापर्यंत राजेश लाटकर यांनी आघाडी घेतली होती. पण १३ व्या फेरीत क्षीरसागर यांनी आघाडी घेत शेवटपर्यंत टिकवली. क्षीरसागर यांना एक लाख ११ हजार १८५ मते तर लाटकर यांना ८१ हजार ५२२ मते मिळाली. २०१९ मध्ये क्षीरसागर पराभूत झाले होते. त्यांनी २००९ आणि २०१५ मध्ये विजय मिळवत सलग दोन वेळा आमदार झाले होते. त्यांच्या विजयाने कोल्हापूर उत्तर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर पुन्हा भगवा फडकला.

‘कोल्हापूर दक्षिण’ वर अमल महाडिकांचा पुन्हा झेंडा

काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांचा १८ हजार १३१ मतांनी पराभव करत अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिणवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकावला. सुरवातीपासून अमल महाडिक यांनी आघाडी घेतली होती. अमल महाडिक यांना एक लाख ४७ हजार ४४ तर ऋतुराज पाटील यांना एक लाख २८ हजार ९१३ मते मिळाली. २०१४ च्या निवडणूकीत अमल महाडिक यांचा पराभव झाला होता. या पराभवाचा वचपा महाडिक यांनी काढला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

चंदद्रीप नरकेंना राहूल पाटील यांनी विजयासाठी झुंजविले

करवीर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रदीप नरके यांना काँग्रेसचे उमेदवार राहूल पाटील यांनी चांगलेच झुंजवले. नरके यांनी राहूल पाटील यांच्यावर अवघ्या १९७६ मतांनी विजय मिळवला. २२ फेऱ्यापर्यंत चंद्रदीप नरके आघाडीवर होते. शेवटच्या चार फेऱ्यामध्ये राहूल पाटील यांनी मोठे मताधिक्य घेतले पण त्यांना थोडक्या मताने पराभव स्वीकारावा लागला. राहूल पाटील यांचे वडील आमदार पी.एन.पाटील यांच्या निधनाने मतदारांची मोठी सहानभुती होती. पण नरके यांनी विजय खेचून आणून पुन्हा कमबॅक केले आहे.

भाजपच्या राहूल आवाडे यांचा मोठा विजय

इचलकरंजी मतदारसंघातील उमेदवार राहूल आवाडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांचा ५६ हजार ८११ मतांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. जिल्ह्यात जास्त मताधिक्याने विजय मिळवण्याचा मान आवाडे यांना मिळाला. पहिल्याच प्रयत्नात ते निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. राहूल आवाडे यांना एक लाख ३१ हजार ९१९ तर मदन कारंडे यांनी ७५ हजार १०८ मते मिळवली. राहूल आवाडे हे आवाडे घराण्यातील तिसरे आमदार झाले आहेत. यापूर्वी त्यांचे आजोबा कल्लपाण्णा आवाडे, वडील प्रकाश आवाडेही आमदार होते. राहूल यांच्या विजयाने इचलकरंजी मतदारसंघावर आवाडे गटाचा दबदबा कायम राहिला आहे.

आमदार आवळेंचा पराभव करुन अशोकराव माने विजयी

जनसुराज शक्ती पक्षाचे अशोकराव माने यांनी काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांचा ४६ हजार ३२८ मतांनी पराभव केला. आमदार विनय कोरे यांच्या विजयानंतर अशोकराव माने यांनी विजय मिळवल्याने  जनसुराज्य शक्ती पक्षाचा आमदारांची संख्या दोन झाली आहे. अशोकराव माने यांना एक लाख ३३ हजार ६२७ तर राजूबाबा आवळे यांना ८७ हजार २९९ मते मिळाली. माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांना २४ हजार ७६७ मतांवर समाधान मानावे लागले.

चंदगडमध्ये अपक्ष शिवाजीराव पाटील यांची बाजी

चंदगडमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांचा २४ हजार १७८ मतांनी पराभव केला. पाटील हे भाजपचे कट्टर समर्थक असून त्यांनी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज भरला होता. शिवाजीराव पाटील यांना ८३ हजार ६५३ तर राजेश पाटील यांना ५९ हजार ४७५ मते मिळाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नंदीनी बाभूळकर यांना ४६ हजार ४८७ मते मिळाली. सरुवातीपासून शिवाजी पाटील यांनी मतदानात आघाडी घेतली होती. चंदगडला फ्रेश चेहऱ्याचा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या रुपाने मिळाला आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00