अमूक एक व्यक्ती विचित्रपणे का वागते? असा प्रश्न पडला की, आपले उत्तर तयार असते, बिघडलेला मानसिक तोल. म्हणजेच, मानसिक रोग. इंग्लिशमध्ये मेंटल डिसऑर्डर. परंतु हेच यावरचे योग्य आणि समर्पक उत्तर आहे? विज्ञान तर काहीतरी वेगळे सांगते, सुचवतेय…
(उत्तरार्ध)
अलीकडेच युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डमधल्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख असलेल्या बेलिंदा लिनॉक्स यांनी भयग्रस्ततेचा विकार जडलेल्या काही हजार रुग्णांवर काही चाचण्या केल्या. त्यांना असे लक्षात आले, यातल्या जवळपास ६ टक्के रुग्णांच्या शरीरातल्या ग्राहींवर हल्ला करणाऱ्या प्रतिपिंडांची संख्या वाढण्याचा दर कमालीचा वेगावला आहे. मात्र, लिनॉक्स यांच्या मते, त्यांचे असे फोफावणे अजूनही विज्ञानाला ज्ञात झालेले नाही किंवा प्रतिपिंडाचा एक संच कसा काय रुग्णांमध्ये फेफरे आणतो, भयग्रस्तता निर्माण करतो, याचीसुद्धा अजून उकल झालेली नाही. किंवा मुळात ही प्रतिपिंडे बनतात कशाला, किंवा ही प्रतिपिंडे रक्त आणि मेंदूत अडथळा ठरणारा पातळ पापुद्रा भेदून जातात का, हे सुद्धा कळलेले नाही.
मन की तेढी बात…
अर्थात, एका बाजूला काही प्रमाणात अनभिज्ञता असली तरीही, प्रतिपिंडे हटवणे, प्रतिरक्षाउपचारपद्धतीशी निगडित औषधे किंवा स्टिरॉइड्स ही मानसिक आजारांवरचा प्रभावी उपाय ठरू शकतो, यावर संशोधकांमध्ये जवळपास एकमत आहे, यात शंका नाहीत. मानसिक आजारांवर नियंत्रण मिळवण्याच्या संबंधाने आणखी एक महत्त्वाचा शोध लागलेला आहे. तो म्हणजे, चयापचयसंस्थेतल्या बिघाडामुळेसुद्धा अनेक तऱ्हेचे मानसिक आजार एखाद्याला त्रस्त करू शकतात. ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे की, मानवी शरीरातला मेंदू हा उर्जेसाठी कायम भुकेला राहणारा अवयव आहे. अशा वेळी चयापचय संस्थेत उर्जावहन मार्गात अडथळा निर्माण करण्याइतपत झालेला बिधाडसुद्धा अनेक मानसिक संकटांना वाट मोकळी करून देणारा ठरतो.
कर्क निलेन हे बाझुकी ग्रुप या अमेरिकी स्वयंसेवी संशोधनपर संस्थेतले मेंदूविज्ञान विभागाचे प्रमुख आहेत. ही संस्था मेंदूवरील संशोधनाला आर्थिक पाठबळ पुरवते. ते म्हणतात, मनोविकारांवर नियंत्रण मिळवण्यासठी चयापचयकेंद्री उपचारपद्धतीच्या अनुषंगाने सध्या १३ ट्रायल्स जगभरात सुरु आहेत. त्यात जे काही प्राथमिक निष्कर्ष हाती आलेत, त्यानुसार या उपचारपद्धतीला मोठ्या संख्येने रुग्ण उत्तम प्रतिसाद देताहेत. हे असे रुग्ण आहेत, ज्यांच्यावर औषधोपचार, संभाषणकेंद्री उपचार आणि शॉक थेरपीसुद्धा काम करेनाशी झाली आहे. अशा वेळी पर्याय म्हणून त्यांना कमी कर्बयुक्त पदार्थ मुख्यत्वे दिले जाताहेत, ज्यामुळे त्यांच्या मनोवस्थेत कमालीची सुधारणा दिसून येतेय. याच मुळे अनेक मानसोपचारतज्ज्ञ या उपचारपद्धतीचा अवलंब करताना दिसताहेत.
जीवशास्त्राने दाखवली दिशा
या सगळ्या अर्थ एकच आहे, की आजवरच्या सगळ्या यशस्वी संशोधनांमुळे, प्रयोगांमुळे मानसिक स्वास्थ्याचे निदान करताना जीवशास्त्र केंद्रस्थानी आलेले आहे. यातूनच पुढे जाऊन वैयक्तिक स्तरावरच्या उपचारांचा मार्ग प्रशस्त होत जाणार आहे. उपचार प्रभावी ठरत जाणार आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२३ मध्ये बायोबँक नावाच्या संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार ज्या रुग्णांना वारंवार नैराश्याचे झटके येताहेत, त्यांच्या रक्तात सायटोकाइन्स नावाच्या दाहकताप्रवण प्रथिनांची पातळी कमालीची उंचावलेली असल्याचे निदर्शनास आले आहे. याच संशोधनातून हेदेखील स्पष्ट झाले की, नैराश्यग्रस्ततेचा सामना करणाऱ्या २५ टक्के रुग्णांमध्ये खालच्या स्तरावरची दाहकता नोंदली गेली आहे. त्यामुळे जे रुग्ण दाहकतेचे बळी आहेत, ते अँटिडिप्रेसंटना खूपच कमी प्रतिसाद देताहेत, ही बाबसुद्धा इथे पुरेशी उघड झाली आहे.
एक गोष्ट मात्र एव्हाना सप्ष्ट झालीय, की या क्षेत्रातले संशोधक सातत्याने नवतेचा मार्ग अवलंबून मानसोपचारांना नवी देण्याचा प्रयत्न करताहेत. उदाहरणार्थ, एका संशोधकांच्या गटाने स्मृतिभ्रंश, भयग्रस्तता आणि आत्मकेंद्रितेचे (ऑटिझम) धोके आधीच ओळखू शकतील, असे बायोमार्कर (जैवचिन्हके) शोधून काढले आहेत. कॉग्नोआ नावाची संस्था वर्तणुकीच्या चलतचित्रांचे विश्लेषण करून मुलांमधल्या ऑटिझमचे निदान करण्याचे तंत्र विकसित करताहेत. कॅलिफोर्नियास्थित क्लाण्टिटेटिव्ह बायोसायन्सेस इन्स्टिट्युटने ऑटिस्टिक मुलांच्या शरीरातल्या प्रथिना प्रथिनांमध्ये घडणाऱ्या आंतरक्रियेचा नकाशा तयार करून रोगनिदान आणि उपचारपद्धतीची नवी तंत्र विकसित करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
ज्ञानशाखांचा समन्वय महत्त्वाचा
या सर्व घडामोडी नक्कीच आशादायी आहेत, यात जराही शंका नाहीत. परंतु जर मेंदूविकार आणि मानसोपचारशास्त्र यात सध्या ज्या सीमारेषा आखलेल्या आहेत, त्या थोड्याफार सैल केल्या, तर बऱ्याचशा अडचणी दूर होण्यासारख्या आहेत. या अनुषंगाने डॉ. लिनॉक्स महद्आश्चर्याने विचारतात की, रुग्ण मेंदू विकार वॉर्डात दाखल झाला, तर त्याच्या उपचारांची दिशा वेगळी असते आणि जर हाच रुग्ण आधी मानसोपचार वॉर्डात दाखल झाला तर त्याची दिशा वेगळी असते. असे का घडावे? याउप्पर त्यांचे म्हणणे असे आहे की, निदान इंग्लंडमध्ये तरी नेहमीच्या उपचारांनी बरे न झालेल्या रुग्णांची प्रतिपिंडे तपासणी नित्याची व्हायला हवी आहे. किंग कॉलेजचे सिनिअर क्लिनिकल लेक्चरर आणि सल्लागार चेता-मनोविकारतज्ज्ञ थॉमस पोलॉक यांच्या मते, भयग्रस्ततेच्या पहिल्या झटक्यानंतरच खरे तर रुग्णांचे स्कॅनिंग व्हायला हवे. तसे झाले तर ५ ते ६ टक्के रुग्णांच्या उपचारांची नेमकी दिशा ठरू शकते. त्याचा अर्थात फायदा रुग्णांना होऊ शकतो.
गंमत अशी आहे, मेंदू विकार आणि मानसोपचार या दोन शाखांमधली दरी अँग्लो-सॅक्शन देशांमध्ये ( उदा. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, न्यूझिलँड.) इतर देशांच्या तुलनेत खूप अधिक आहे, असे या क्षेत्रातले तज्ज्ञ असलेल्या डॉ. इल्स्ट यांचे म्हणणे आहे. मात्र, जर्मनीमध्ये मानसोपचार आणि मेंदूविकार शाखांमध्ये उत्तम मेळ आहे. इथे मेंदूविकार तज्ज्ञ मानसोपचाराचेही प्रशिक्षण घेतात आणि मानसोपचार तज्ज्ञ मेंदूविकारांशी संबंधित ज्ञानग्रहणाला आपल्या प्रशिक्षणातले एक वर्ष देतात. याचा फायदा अर्थातच रोगाचे योग्य निदान करण्यापासून उपचारांचा प्रभावी योजना करण्यासाठी होतो. ते स्वतः भयग्रस्ततेचा विकार जडल्याने वा इतर मेंदूशी संबंधित मनोविकाराने ग्रस्ततेमुळे पहिल्यांदा त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राम ही चाचणी करण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात, हॉस्पिटलात तीन चार दिवस दाखल झाल्यानंतर जेवढे पैसे मोजावे लागतात, त्यापेक्षा कमी पैशात ही तपासणी होते आणि मुख्य म्हणजे, त्यामुळे प्रभावी उपाययोजनांची आखणी करणे शक्य होते.
हा सगळा उपचारांचा विकासक्रम पाहता, एक दिवस असा येईल की, मानसोपचारशास्त्र आणि रुग्ण ठामपणे पाऊले टाकत पुढे चालले असतील. अर्थात, ज्यांच्याबाबतीत मानसोपचारशास्त्र यापूर्वी कमी पडले आहे, त्यांनादेखील या ज्ञानशाखेने सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे. जेसिका ह्युस्टन ही तरुणी अशा काही दुर्दैवी रुग्णांपैकी एक आहे. जेसिकाचे नशीब असे, तिच्या आजाराचे निदान उशिराने झाले, उपचारांनाही उशीरच झाला. याचमुळे ती अजूनही ओढवलेल्या आजारातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करते आहे, तिचे भवितव्य अनिश्चित आहे. पूर्वी संसर्गपश्चात अवस्थेतले रुग्ण साधारणपणे एकाग्रता, लक्षकेंद्रितता साधण्यात अडचणींचा सामना करत होते, परंतु हे ढोंग आहे, असे म्हणून त्यांना उडवून लावले जात होते. प्रत्यक्षात ते यप्पी फ्लुचे (yuppie flu) रुग्ण बनलेले होते. या संबंधातले नवे संशोधन असे सुचवत आहे की, हा आजार प्रतिरक्षाक्षमता आणि चयापचय क्रियेतल्या बिघाडातून उद्भवतो आहे. हे पाहता काहींना ही अवस्था हिमनगाचे केवळ एक टोक आहे, असे ठामपणे वाटते आहे. या हिमनगाचा पाण्याखालचा डोळ्यांना न दिसणारा भाग शोधण्यातच दर्जेदार उत्तम रुग्णसेवा आणि दर्जेदार परिणाम दडले आहेत. तेव्हा सांगणे इतकेच आहे, मानसोपचार शास्त्र सज्ज असेल-नसेल या क्षेत्रात जीवशास्त्राचे जोरदार आगमन झालेले आहे !
(द इकॉनॉमिस्टमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा हा साभार स्वैर अनुवाद आहे.)