अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्विवाद विजय मिळवून दुसऱ्यांदा या पदावर विराजमान होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या विजयाचे अन्वयार्थ लावण्याची शर्यत आता येणारा काही काळ चालूच राहील. विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करणे हा तर सारासर औचित्याचा भाग आहे आणि म्हणून तसे ते खुल्या मनाने केलेही पाहिजे. पण हे करत असतानाही काही प्रश्नांची जगाला उत्तरे मिळण्यासाठी येणाऱ्या काळाचीच वाट पहावी लागेल. अमेरिकेत पुन्हा एकदा सुवर्णयुग आणणार, असे वचन ट्रम्प यांनी विजयानंतरच्या पहिल्याच जाहीर उद्बोधनात दिले. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची दिशाही स्प्ट केली. अमेरिका हा सामर्थ्यशाली तर आहेच पण आणखी मजबूत व सुरक्षित करण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही ट्रम्प यांनी दिली. वास्तविक अमेरिका ही सध्याच्या काळात जगातील सर्वात बलाढ्य अशी एकमेव महासत्ता मानली जाते. साहजिकच साऱ्या जगाचे लक्ष या देशाचे नेतृत्व निश्चित करणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे असते. त्यादृष्टीने अमेरिकेचा नवा अध्यक्ष विश्व कल्याणासंदर्भात कोणती भूमिका घेतो याकडे जागतिक समूहाचे लक्ष असते. ट्रम्प अमेरिकेत सुवर्णयुग आणण्याची भाषा करतात तेव्हा त्यांचा केवळ त्या देशापुरता सीमित विचार स्पष्ट होतो. त्यापेक्षा अधिक व्यापक विचार किंवा धोरण त्यांनी स्पष्ट करणे अधिक योग्य ठरले असते. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लष्करी व सामरिकदृष्ट्या सर्वात बलशाली देश आहे याबाबत दुमत नाही. म्हणूनच साऱ्या जगाचे लक्ष तुमच्या निवडणुकीकडे लागून राहिले असताना ज्या पध्दतीने तुमची ही सारी प्रक्रिया पार पडली त्याबद्दल स्वतः ट्रम्पच प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते, हे जग विसरणार नाही. २०२० च्या निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांनी निकालावर आक्षेप घेत जो हिंसाचार घडवला त्यामुळे त्यांची व अमेरिकेच्या लोकशाहीची खरे तर नामुष्कीच झाली होती. त्यावेळी ज्यो बायडेन विजयी झाले होते पण त्यांचा तो विजय ट्रम्प यांना रुचला नव्हता. नंतरच्या काळात त्यांच्यावर विविध खटले दाखल झाले, महाभियोगालाही सामोरे जावे लागले. वादग्रस्त टीकाटिपणी व वक्तव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नकारात्मक वातावरणही निर्माण झाले होते. अर्थात हा सारा इतिहास झाला, असे आपण मानून चालू. जे झाले ते झाले, पण आता पुन्हा नव्याने जेव्हा कौल देण्याची वेळ आली तेव्हा अमेरिकन जनतेने ट्रम्प यांच्या पारड्यात झुकते माप टाकले आहे, या वास्तवालाही महत्त्व दिले पाहिजे हे ओघाने आले.
देशाचे ४७ वे अध्यक्ष या नात्याने ट्रम्प यांची व त्यांच्या रिपब्लिकन पक्षाची नवी कारकीर्द येत्या जानेवारी २०२५ मध्ये सुरू होईल. दरम्यानचा काळ आता मावळत्या डेमोक्रॅटिक पक्षासाठी निरोपाचा असेल. रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय निवडणुकीतील पराभूत उमेदवार कमला हॅरीस यांनी दिलेली लढतही एका अर्थाने लक्षवेधी म्हणावी लागेल. त्यांची उमेदवारी जाहीर होण्यास तुलनेने अधिक वेळ लागला होता, पण तरीही ट्रम्प हॅरीस मुकाबला निकराचा व चुरशीचा होईल असा जो निवडणूकपूर्व अंदाज होता तो मात्र खरा ठरला नाही. ट्रम्प व त्यांच्या पक्षाने प्रतिनिधीगृह व सिनेटमध्येही निर्णायक बहुमतासाठीचा आकडा पार केला आहे हे विशेष. हॅरीस या मूळच्या भारतीय वंशाच्या असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत भारतातही मोठे औत्सुक्य होते. दुसरीकडे ट्रम्प यांचे सध्याच्या भारतीय नेतृत्वाशी म्हणजेच पंतप्रधान मोदींशी व्यक्तिगत स्नेहबंध असल्याचा मुद्दाही भारतात चवीने चर्चिला जात असतो. प्रत्यक्ष व्यवहारात आता पुढे काय होते याबाबतची प्रतीक्षा करणे एवढेच आपण करू शकतो. उगाच काही भाकिते वगैरे करण्यात अर्थ नाही. जगापुढे सध्या दोन मोठ्या युद्धांची समस्या आहे. रशिया व युक्रेन यांच्यातील संघर्ष दोन वर्षांहून अधिक काळ थांबायचे नाव घेईना झालाय. मध्यपूर्वेत इस्रायल विरुद्ध हमास व हिजबुल्ला यांच्याविरुद्धच्या संघर्षाने आता इस्रायल विरुद्ध इराण अशी व्यापकता धारण केली आहे. दोन्ही ठिकाणच्या युध्दात अमेरिकेची प्रत्यक्ष नसली तरी अप्रत्यक्ष किंबहुना थेट स्वरूपाची सक्रियता आहे. या युध्दांना थांबवण्यासाठी प्रयत्नांचे संकेत ट्रप्म यांनी निवडणूकपूर्व आश्वासनात ठळकपणे दिले आहेत. आता सत्तासूत्रे हाती आल्यानंतर ते प्रत्यक्ष काय कृती करतात हेही पहावे लागेल.