तासगाव; प्रतिनिधी : दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासोबत काम करताना त्यांना प्रत्येक वेळेस साथ दिली. मात्र सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप माझ्यावर झाला व त्याच्या चौकशीच्या फाईलवर गृहमंत्री असताना आबांनी सही केली. माझा केसाने गळा कापला, असा धक्कादायक खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलताना केला. माजी खासदार संजय पाटील यांनी रोहित, तू लहान आहेस. कमरेखालचे वार करू नकोस, असा इशारा दिला.
माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, विधान परिषद सदस्य इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष प्रतापनाना पाटील, भाजपचे दीपक शिंदे, शेखर इनामदार, प्रभाकर पाटील, पांडुरंग पाटील, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, हणमंत पाटील, स्वप्नील पाटील, तासगाव अर्बन बँकेचे चेअरमन माहेश्वर हिंगमिरे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे, नितीन गोंधळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आबांना मागेल ते पद व गोष्टी मिळवून दिल्या. पण सिंचन घोटाळ्याचा माझ्यावर आरोप झाल्यानंतर गृहमंत्री म्हणून या केसची ओपन इन्क्वायरी करण्यासाठी आबांनी सही केली. निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सहीने त्याची चौकशी सुरू होणार होती. यानंतर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून घेत तुमच्या आबांनीच तुमची इन्क्वायरी लावण्यासाठी सही केली असल्याचे मला दाखवले. याचा मला धक्का बसला. माझे काय चुकले म्हणून आबांनी सही केली असेल, असा उद्विग्न सवालही पवार यांनी यावेळी केला.
आबांच्या नंतर त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही कायम राहिलो, मात्र नुसत्या बोलण्याने मतदारसंघाचा विकास होणार नाही. त्यासाठीची धमक नेतृत्वात असावी लागते. असे नेतृत्व संजयकाका यांच्यात आहे. येथे संस्थात्मक काही नसल्याने तरुणांच्या हाताला काम नाही. द्राक्ष, बेदाणा, शिक्षण संस्थात्मक उद्योग नसल्याने तरुण बेरोजगार राहिला आहे. इतकी वर्षे सत्ता असतानाही या मतदारसंघात विकासकामे का झाली नाहीत, असा सवालही पवार यांनी केला.
संजयकाकांना मंत्रिपद देणार
भावनेला थारा न देता संजयकाकांना निवडून द्या, त्यांना मंत्रिपद द्यायची जबाबदारी माझी, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी पवार यांनी लाडकी बहीण या योजनेमुळे गोरगरीब महिलांना झालेला फायदा त्यांनी सांगितला. मात्र विरोधक या योजनेची बदनामी करतात. ओवाळणी दिलेली भाऊ कधी परत घेतो का, असा सवाल त्यांनी केला. अल्पसंख्याकांना भीती घातली जात आहे, मात्र अल्पसंख्याक समाजाचा आमदार इद्रिस नायकवडींच्या रूपाने करून मी नुसता बोलत नाही, तर काम करतो हे कृतीतून दाखवले.
संजय पाटील म्हणाले, की गेली ३५ वर्षे या लोकांनी मतदारसंघातील लोकांच्या भविष्य आणि भावनेशी खेळ केला आहे. त्यांना तालुक्याचा विकास करता आला नाही. फक्त त्यांनी आपली लोकप्रियता टीव्हीवर चमकवली. प्रश्नांची सोडवणूक कधी झाली नाही. बारामतीकरांच्या कृपेने त्यांना दोनदा निसटता विजय मिळाला. लोकसभेला कुरघोड्या झाल्यामुळे माझा पराभव झाला. अजितदादा व घोरपडे सरकार यांच्यासोबत चर्चा होऊन इथल्या उमेदवारीवर मार्ग निघाला.
तुमचे फ्लॅट, काँट्रॅक्टर माहीत आहे
रोहित पाटील यांना इशारा देताना संजय पाटील म्हणाले, तुमचे फ्लॅट, तुमच्या चौकशी, काँट्रॅक्टर हे सगळे आम्हाला माहिती आहे. आम्ही कधीही त्रास दिला नाही. जेवताना पुढे कॅमेरा घेऊन माणसे काम करतात, तुमची ३५ वर्षे व माझी दहा वर्षे याचा हिशेब एका व्यासपीठावर या, असे आवाहन त्यांनी केले. मला आमदार करा, इतिहासात नोंद होईल एवढे पैसे आणतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी अजितराव घोरपडे, भाजपचे युवा नेते स्वप्नील पाटील यांच्यासह अनेक वक्त्यांनी भाषणे केली.
हेही वाचा :
- केरळ : फटाक्यांची आतषबाजी करताना दुर्घटना; १५० हून अधिक जखमी
- जनगणनेची तयारी सुरू
- चीनमध्ये जन्मदरात मोठी घट