गांधीनगर; प्रतिनिधी : गडमुडशिंगी (तालुका करवीर) येथे दांगट मळा येथील जुने श्री नरसिंह मंदिर आज (दि.२०) सकाळी साडेदहाच्या सुमारास विहिरीत कोसळले. या दुर्दैवी घटनेमध्ये मंदिरात पूजेसाठी गेलेले कृष्णात उमराव दांगट (वय ६४) बुडाले. रात्री उशिरापर्यंत कृष्णात दांगट यांचा शोध सुरू होता.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गडमुडशिंगी (ता.करवीर) येथे श्री नरसिंह मंदिर हे जुने मंदिर असून त्याचा साधारण चार ते पाच फूट भाग विहिरीवर येत होता. या मंदिराचा जिर्णोद्धार वीस वर्षापूर्वी करण्यात आला होता. या मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कृष्णात दांगट नित्यनेमाने पूजा करतात. आज (दि.२०) देखील ते मंदिरात पूजा करण्यास गेले होते.
थोड्याच वेळात शेजारी असणाऱ्या नागरिकांना अचानक विहिरीत काहीतरी कोसळल्याचा मोठा आवाज आला. शेजारील कुटुंबियांनी बाहेर येऊन बघितले असता. त्यांना पूर्ण मंदिरच गायब झाल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळवली.
गांधीनगर पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. व दांगट कुटुंबियांना धीर दिला. राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, ग्रा.सदस्य रावसाहेब पाटील, अशोक दांगट, पांडुरंग पाटील, अरविंद शिरगावे, संजय दांगट यांनी घटनास्थळी धाव घेऊन दांगट यांच्या पत्नी आणि दोन मुलांना आधार दिला. सततच्या अतिवृष्टीमुळे मंदिराचा पाया कमकुवत झाला असल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात होते.
शोध मोहिमेत अडथळे
अग्निशामक दल आपल्या जवानांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याचवेळी जीवरक्षक दिनकर कांबळे यांना देखील पाचारण करण्यात आले. त्यांनी आपले सर्व कसब पणास लावून दांगट यांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडे, चिखल असल्यामुळे शोध मोहिमेत अडचण येत होती. कांबळे यांच्याकडील ऑक्सिजन देखील कमी झाल्यामुळे ऑक्सिजन मालवण येथून आणावा लागणार आहे. जेसीबीच्या साह्याने शोध करण्याचे ठरले परंतु, त्याला देखील यश आले नाही. शेवटी शोध मोहीम थांबविण्याचे ठरले.
सर्वांचे लाडके बटू आण्णा
कृष्णात दांगट यांना गावातील सर्वजण आपुलकीने “बटू आण्णा” म्हणत. शांत, संयमी, धार्मिक वृत्तीचे कृष्णात दांगट हे शेतकरी होते. रोज सकाळी शेताकडे जाणे, जनावरांची देखभाल करून दांगट भावकीच्या सामुदायिक विहिरीला लागून असलेल्या श्री नरसिंह मंदिरात पूजा करणे हा गेली बरेच वर्ष नित्यक्रम होता. या दुर्दैवी घटनेची माहिती कळताच दांगट यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा :
- बिद्रीच्या ऊस उत्पादक सभासदांची दिवाळी गोड
- ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश
- कोल्हापुरातील भाजपचे दोन उमेदवार समोर