महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : देशात म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या शाही दसरा लोकप्रिय आहे.दसरा चौकात साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मोठ्या थाटामाटात होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाने तीन ऑक्टोबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शाही दसऱ्याचा मुख्य सोहळा आज शनिवार १२ रोजी संध्याकाळी दसरा चौकात साजरा होणार असून याचे प्रमुख आकर्षण म्हणून छत्रपती घराण्यातील मेबॅक कार सर्वसामान्यांना पहायला मिळणार आहे. (Kolhapur Shahi Dasara)
दसरा पाहण्यासाठी लाखो लोक दसरा चौकात
परंपरेनुसार करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीची पालखी सायंकाळी ६ वाजे पर्यंत चौकात येणार आहे. याच ठिकाणी छत्रपती घराण्यातील मान्यवर देखील या शाही दसऱ्याला उपस्थित राहणार आहे. यामध्ये छत्रपती घराण्याचे मानकरी तसेच प्रशासनातील प्रमुख अधिकारी आणि कोल्हापूरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत. हा शाही दसरा पाहण्यासाठी लाखो लोक कोल्हापुरातील दसरा चौकात हजेरी लावतात. यावेळी छत्रपती घराणे मेबॅक या कारमधून येतात. ही कार दुर्मिळ असून विजयादशमी दसऱ्यादिवशीच ती बाहेर काढली जाते. आणि याच वाहनातून खा.छत्रपती शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे व अन्य राजघराण्यातील सदस्य दसरा चौकात येतात. या कारविषयी अनेकांच्या मनात कुतूहल असते.दसऱ्याच्या निमित्ताने या कारचा घेतलेला आढावा….
Kolhapur Shahi Dasara : जर्मन मेड कार….
करवीर संस्थानकडे असलेली ही मेबॅक कार जर्मन मेड आहे. तर छत्रपतींच्या मालकीची मेबॅक खास ऑर्डर देऊन बनवण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मेबॅक कंपनीवर हल्ला झाल्यामुळे कंपनी बंद झाली. त्यामुळे जगभरात मेबॅक अगदी मोजक्याच कार सध्या शिल्लक राहिल्या आहेत. त्यातीलच एक असणारी ही कोल्हापुरातील शाही मेबॅक कार आहे. जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर देखील अशीच मेबॅक कार वापरत होता. त्यामुळे या गाडीला ‘हिटलरर्स रोल्स’ असेही म्हंटले जाते.
छत्रपती राजाराम महाराज यांनी ही कार ऑर्डर देऊन बनवून घेतली होती. त्यामुळे या गाडीला करवीर संस्थानच्या ध्वजाचा केशरी रंग देण्यात आला आहे. गाडी बनवताना चढवलेला रंगच आजही गाडीवर आहे. गाडीवर पुढच्या बाजूला करवीर संस्थानचे मानचिन्ह देखील आहे. त्याच्या बाजूने ‘छत्रपती महाराज ऑफ कोल्हापूर’ असेही लिहिण्यात आले आहे. तर त्याच्याच वरच्या बाजूला शिवछत्रपतींना तलवार देणारी भवानीमाता कोरण्यात आली आहे. गाडीच्या बॉनेटवर भगवा ध्वजही लावण्यात आला आहे.
१ लीटर पेट्रोलमध्ये फक्त १ किलोमीटर धावते
गाडी १७ फूट लांब आणि ६ फूट रुंद असून गाडीत ६ ते ७ जण आरामात बसू शकतात. तर ही गाडी पूर्णतः ऑटोमॅटिक असून गाडीचे स्पीडमीटर हे किलोमीटर ऐवजी मैल परिमाण दाखवते. गाडीला मेकॅनिकल ब्रेक्स असून त्याला वॅक्कुम असिस्टंस आहे. गाडीचे छत हे हवे तसे उघडता किंवा बंद करता येत असून गाडीला टिंटेड फॉल्डेबल काचा आहेत. २०० लिटर क्षमतेचा पेट्रोल टँक असणारी ही गाडी १ लीटर पेट्रोलमध्ये फक्त १ किलोमीटर धावते. अगदी छोट्या छोट्या बाबतीत देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणारी ही गाडी अतिशय रॉयल दिसते. दरवर्षी कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात सर्वांसमोर छत्रपतींना घेऊन मेबॅकची शाही एन्ट्री होत असते. त्यामुळे कोल्हापूरकर नेहमीच या गाडीला पाहण्यासाठी उत्सुक असतात.
(सर्व फोटो- अर्जुन टाकळकर)
हेही वाचा
- आनंदाचा व मांगल्याचा सण : विजयादशमी दसरा
- शाही दसऱ्यासाठी ऐतिहासिक मेबॅक सज्ज
- दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय भूकंप