Home » Blog » सोनम वांगचुक यांना फरफटत नेले

सोनम वांगचुक यांना फरफटत नेले

by प्रतिनिधी
0 comments
Police detained Sonam Wangchuk

नवी दिल्ली : गेले वीस दिवस केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत जंतरमंतर येथे उपोषणास बसलेले पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ नेते सोनम वांगचुक यांना उपोषणास्थळावरुन प्रचंड पोलिस बंदोबस्तात उचलून नेले. शनिवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पोलिसांनी सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करत फरफटत नेले असा आरोप केला. दिल्ली हायकोर्टाचे आदेश आणि त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तर पोलिसांच्या कारवाईवर विरोधी पक्षांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. (Police detained Sonam Wangchuk)

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर केंद्र सरकारने परीक्षा रद्द केली. त्यानंतर मानसिक तणावामुळे देशातील वीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अनेक विद्यार्थी व पालक हवालदील झाले. पेपरफुटीवर देशात संतापाची लाट उसळली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सोशल मिडियावर स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशभर आंदोलन सुरू केले आहे. लडाखमधील ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते सोनम वांगचूक यांनी जंतरमंतवर उपोषणाला सुरुवात केली. (Police detained Sonam Wangchuk)

उपोषणामुळे वांगचुक यांचे वजन आठ किलोंनी घटले

वांगचुक यांच्या आंदोलनाला देशातील विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळाला. देशातही वांगचुक यांच्या मागे जनतेने रहावे असे आवाहन करण्यात आले. गेले वीस दिवस वांगचुक उपोषणाला बसले असताना सरकारकडून कोणतीही चर्चा केली नाही. उपोषणामुळे वांगचुक यांचे आठ किलो वजन घडले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आदेश सरकारला दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी पोलिसांनी अचानक कारवाई केली. पोलिस बळाचा वापर करत वांगचुक यांना ताब्यात घेऊन दिल्लीतील सफरजंग रुग्णालयात नेले असल्याचे दिल्लीचे पोलिस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितले.

पोलिस आरएसएसचे गुंड, मोदी हुकुमशहा

वांगचुक यांना बळजबरीने उपोषणास्थळावरुन उचलून नेल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिस आरएसएसचे गुंडे आहेत असा आरोप करत देशात लोकशाही नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकुमशहा आहेत अशी टीका केली. वांगचुक यांच्या अटकेवर ज्येष्ठ नेते शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी, यांच्यासह देशभरातील नेत्यांनी टीका केली आहे. (Police detained Sonam Wangchuk)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!