Home » Blog » अंबाबाई मंदिरात गळती; पुरातत्त्व विभागाने काय दिले स्पष्टीकरण

अंबाबाई मंदिरात गळती; पुरातत्त्व विभागाने काय दिले स्पष्टीकरण

by प्रतिनिधी
0 comments
Leakage in the Ambabai Temple

कोल्हापूर : प्रतिनिधी :  करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात राज्य शासनाच्या मंदिर संवर्धन, सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. पण हे काम सुरू असताना मंदिराच्या छतावरुन पाण्याची गळती होत असल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त होते. मंदिरातील सुशोभिकरणाचे काम शास्त्रशुद्ध पद्धतीने होत नसल्याची तक्रार अनेक बाविकांकडून होत आहे. यावर पुरातत्व विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.  मंदिराच्या मूळ वास्तुशैलीचे जतन, पारंपरिक साहित्याचा वापर आणि पुरातत्त्वीय तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. मंदिरातील काही भागात झालेली पाणीगळती ही नियोजित वॉटरप्रूफिंगचे काम पूर्ण होण्यापूर्वी पावसाळा सुरू झाल्यामुळे निर्माण झालेली तात्पुरती परिस्थिती असल्याचे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. (Leakage in the Ambabai Temple)

सरस्वती, महाकाली मंदिरावरील मोझॅक टाईल्स काढल्याने गळती

पुरातत्व विभागाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की,  पावसाळा सुरू होण्यापूर्वी कासव मंडपाच्या छताचे पाणीगळती प्रतिबंधक (वॉटरप्रूफिंग) काम पारंपरिक चुना-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या भागात कोणत्याही प्रकारची पाणीगळती आढळून आलेली नाही. महासरस्वती व महाकाली मंदिरांच्या छतावरील वॉटरप्रूफिंगच्या कामाच्या पूर्वतयारीसाठी जुन्या मोजॅक टाइल्स काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर वॉटरप्रूफिंगचे काम हाती घेण्याचे नियोजन होते. मात्र, दरम्यान पावसाळा सुरू झाल्यामुळे हे काम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे पहिल्या पावसात काही ठिकाणी पाणीगळती झाली. (Leakage in the Ambabai Temple)

मंदिराच्या छतावर ताडपत्री झाकली

पाणीगळती लक्षात येताच दोन्ही मंदिरावरील छत तातडीने ताडपत्रीने झाकण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या पावसात कोणतीही नवीन पाणी गळती आढळून आलेली नाही. पावसाळा संपल्यानंतर या भागातील उर्वरित वॉटरप्रूफिंगचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे.

पावसाळा सुरू झाल्याने कामास विलंब

सध्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत असलेली छायाचित्रे व व्हिडिओ हे ताडपत्रीची संरक्षणात्मक व्यवस्था करण्यापूर्वी, पहिल्या पावसाच्या वेळी चित्रित करण्यात आलेले आहेत. तसेच गेल्या चार दिवसांपासून पाऊस झालेला नसल्याने सध्या प्रसारित होणारी पाणी गळतीची छायाचित्रे काही दिवसांपूर्वीची असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. ज्या भागात पारंपरिक चुना-आधारित वॉटरप्रूफिंगचे काम पूर्ण झाले आहे, त्या भागात कोणतीही पाणी गळती झालेली नाही. पाणी गळती केवळ त्या भागात झाली, जिथे वॉटरप्रूफिंगच्या पूर्वतयारीसाठी मोजॅक टाइल्स काढण्यात आल्या होत्या; मात्र पावसाळा सुरू झाल्यामुळे पुढील काम पूर्ण करता आले नाही.

सोशल मिडियावर चुकीचा समज निर्माण करु नये

सोशल मीडियावरील बातम्यांमुळे जतन-संवर्धनाच्या कामाबाबत चुकीचा समज निर्माण होऊ नये. ही बाब जतन-संवर्धनाच्या गुणवत्तेशी संबंधित नसून नियोजित वॉटरप्रूफिंगच्या कामाशी संबंधित तात्पुरती परिस्थिती आहे. राज्य पुरातत्त्व विभाग मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून उर्वरित काम पावसाळ्यानंतर तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या पुणे विभागाच्या सहाय्यक संचालकांनी स्पष्ट केले आहे. (Leakage in the Ambabai Temple)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00