कोल्हापूर; प्रतिनिधी : आज शारदीय नवरात्र महोत्सवाची सप्तमी तिथी आठवा दिवस आजच्या तिथीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई वाघावर विराजमान दुर्गेच्या रूपात सजली आहे. वाघावर ती स्वार झालेले दुर्गेचे हे अष्टभुजा रूप उत्तर भारतात विशेष प्रसिद्ध आहे वरद कमळ तलवार चक्र शंख गदा धनुष्य आणि त्रिशूल धारण करणारी अशी ही जगदंबा दुर्गमासुराचा संहार करण्यासाठी प्रगट झाली अशी ख्याती आहे. शाकंभरीच्या अवतारातच जगत पोषणाचे काम झाल्यानंतर उन्मत्त झालेल्या दुर्गमासुराचा वध केल्यामुळे देवीला दुर्गा हे नाव प्राप्त झाले असे मानले जाते. दुर्गा सप्तशती या ग्रंथात देवीने आपल्या भविष्यात्मक अवताराचे वर्णन करताना आपल्या या रूपाचे वर्णन केले आहे अशी दुर्गा चार सहा आठ दहा बारा सोळा अठरा हातांची देखील दाखवली जाते. आज करवीर निवासिनी अष्टभुजा रूपामध्ये सजली आहे.दुर्गा म्हणजे कठीणातल्या कठीण संकटाचेही निवारण करणारी देवता आपल्या सर्वांच्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत हीच देवीच्या या अष्टभुजा रूपाकडे प्रार्थना. (Navratri Ustav 2024)
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः
‘दुर्गा’ म्हणजे देवीचे नाव एवढीच माहिती आपल्याला असते. परंतु दुर्गाशब्दाची व्याख्या अत्यंत व्यापक आहे. सर्वश्रेष्ठ निर्गुण परब्रम्हाच्या शक्तीचे माया रुपाचे सर्वप्रथम स्वरूप म्हणजे ‘दुर्गा’ होय. सर्व देवतांचे कार्यकारण अवतार. जिच्या इच्छेने, जिच्या पासून निर्माण झाले, जिच्या प्रभावाने जिच्या ठिकाणी राहिले. जिच्या स्वरूपात लय पावून अथवा जिच्या ठिकाणी राहून सन्मान पावत आहेत. तिच महामाया आदिशक्ती दुर्गा होय.दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाच्या ११ व्या अध्यायात वर्णन केल्या प्रमाणे… मी दुर्गम नावाच्या महा पराक्रमी दैत्याचा वध केल्यामुळे माझे दुर्गा हे नाव प्रसिद्ध पावेल. दुःख, दारिद्रय आणि भय हरण करणारी, दुर्गम पिडेचा नाश करणारी याप्रमाणे श्रीदुर्गा देवी स्तुती केलेली आहे.ह्याच दुर्गेने विविध कारणांनी जे अवतार धारण केले ते नवदुर्गा म्हणून प्रसिद्ध आहेत. ही अष्टभुजा असून वाद्यावर बसलेली आहे.ही पुजा विद्याधर मुनिश्वर, अरुण मुनिश्वर, सोहम मुनिश्वर व सुकृत मुनिश्वर यांनी बांधली.