तासगाव : बुधवारी (दि. २) सायंकाळी तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना गारपिटीने झोडपले. मणेराजुरी, सावर्डे सह आसपासच्या भागात वादळी वा-यासह आलेल्या पावसात गारपीट झाली. गारपिट झाल्याने पीक चटणी घेतलेल्या द्राक्ष बागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे या आस्मानी संकटामुळे द्राक्ष बागायतदार हादरला आहे. (Sangli News)
काल सकाळपासून तालुक्यात उष्णता वाढली होती. दुपारनंतर पाऊस येईल असा अंदाज होता तो खरा ठरला. सायंकाळ च्या सुमारास तालुक्याच्या पूर्व भागात बहुतांशी गावांमध्ये वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पाऊस सुरु झाला, नंतर अनेक गावांना गारपिटीने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे आणि गारपिटीने मणेराजुरी आणि परिसरातील पीक छाटणी घेण्यात आलेल्या द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षाच्या वेलीवरील काड्या मोडून गेल्या असून या पावसामुळे द्राक्षघड रोगाला बळी पडण्याची शक्यता वाढली आहे. (Sangli News)
वादळी वाऱ्यामध्ये झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे मणेराजुरी सह सावर्डे गावातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. पीक छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागेतील घड आणि द्राक्ष वेलीवर गारांचा मारा बसल्यामुळे द्राक्ष बागा रोगाच्या विळख्यात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मणेराजुरीत सर्वाधिक फटका
या गारपिटीचा सर्वाधीक फटका हा मणेराजुरी गावातील द्राक्षबागायतदारांना बसला आहे. गावातील भोसले नगर, एरंडोले मळा, लांडगे मळा, अडके खोरे, रामलिंग नगर, आप्पा- गुणाजीचा मळा, जमदाडे वस्ती यल्लामा मंदिर भागामध्ये गारा सहित मुसळधार पाऊस झाल्याने द्राक्षबागांना धोका निर्माण झाला आहे.
तासगाव – कवठेमहांकाळ भागांत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. मणेराजुरी सह काही ठिकाणी गारपीट झाली. आधीच सरकारच्या धोरणांनी त्रस्त असलेल्या आणि तोट्यात गेलेल्या द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांना हा मोठा धक्का आहे. सुलतानी संकटातून कसेबसे सावरणाऱ्या माझ्या भागातील शेतकऱ्यांना आता अस्मानी संकटांतून वर काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. माझी कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांना विनंती आहे की याची गंभीरपणे दखल घेत प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सूचना देण्यात याव्यात तसेच माझ्या शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी.
-रोहित आर आर पाटील