कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या प्रस्तावित १४३.९० कोटी रुपयांच्या आराखड्यास उच्चाधिकार समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी पालकमंत्री प्रकाश अबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश राजेश क्षीरसागर यांनी उच्चाधिकार समितीचे आभार मानले. (Ambabai Temple Development Plan)
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याचा रूपये १४४५.९७ कोटी किंमतीचा प्रस्ताव १५ जुलै २०२५ रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर सादर केला होता. त्यापैकी रुपये १४३.९० कोटीच्या प्रस्तावास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली. भूसंपादनाचे धोरण आणि कार्यपद्धती ठरविण्यासाठी अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित कामांना मान्यता देण्याची कार्यवाही होईल असे निर्देश दिले. त्यास अनुसरून शासन निर्णयान्वये भूसंपादनाचे धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या भूसंपादन समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित कामांना उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता घेण्यात येणार होती. त्यानुसार विकास आराखड्याच्या” प्रस्तावित रूपये १४३.९० कोटी किंमतीच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्या अंतर्गत कामांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना “संनियंत्रण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात आले आहे. (Ambabai Temple Development Plan)