महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बांगला देशविरूध्द होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी शनिवारी (दि.२८) भारतीय निवड समितीने १५ सदस्यांचा संघ जाहीर केला. यामध्ये भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तर, वेगवान गोलंदाज मयांक यादव आणि फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांचे संघात पुनरागमन झाले आहे. बांगला देशविरूद्धच्या टी-20 मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय निवड समितीने जाहीर केलेल्या संघात अभिषेक शर्माची सलमीवीर म्हणून निवड झाली आहे. त्याच्यासोबत संजू सॅमसनला सलामीला येण्याची संधी मिळेल अशी शक्यता आहे. तर मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार सूर्यकुमार यादव, रिंकू सिंगही, नितिश कुमार रेड्डी, रियान पराग यांच्या खांद्यावर आहे. (IND vs BAN T20 Series)
हार्दिक अनुभवी अष्टपैलू खेळाडू
या मालिकेत हार्दिक पंड्याकडे सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. परंतु, हार्दिकला यावेळी शिवम दुबेकडून चांगलीच स्पर्धा आहे. त्याचबरोबर संघात वॉशिंग्टन सुंदरसारख्या अष्टपैलू खेळाडूला स्थान मिळाले आहे.
मयांक यादवला संधी
मयांक यादवने आयपीएलमधील वेगवान गोलंदाजीच्या सर्वांना प्रभावित केले होते. परंतु, दुखापतीमुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता. त्याने बंगळूरच्या एनसीएमध्ये उपचार घेतले. यानंतर प्रभावी कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले आहे.
वरुण चक्रवर्ती-जितेश शर्मा यांचे पुनरागमन
कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर म्हणून समोर आलेला वरुण चक्रवर्तीला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळाले आहे. गेल्या सीझनमध्ये कोलकातासाठी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने पुन्हा संधी मिळवली आहे. याचबरोबर जितेश शर्माचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुसरा यष्टिरक्षक म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. (IND vs BAN T20 Series )
मुख्य खेळाडूंना विश्रांती
बांगला देशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे. भारताला आगामी काळात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. याचबरोबर यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनाही विश्रांती दिली आहे. पुढील कसोटी सामने लक्षात घेता या खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटसाठी विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय इशान किशनला पुन्हा संधी मिळालेली नाही. त्याने अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती; तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 प्रकारातून विश्रांती घेतली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
हेही वाचा :
- झी मराठीवर `सावळ्याची जणू सावली`
- Kolhapur Politics : धनंजय महाडिक यांनी मुलाला समजून सांगावे: राजेश क्षीरसागरांचा सल्ला
- Rankala lake : रंकाळा तलावात म्युझिकल फाउंटन उभारणार : राजेश क्षीरसागर