Home » Blog » Dragon Landed Safely: मिशन सक्सेस! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले!!

Dragon Landed Safely: मिशन सक्सेस! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले!!

by प्रतिनिधी
0 comments
Dragon Landed Safely

वॉशिंग्टन : भारताचे अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि अ‍ॅक्सिओम-४ क्रू यांना घेऊन गेलेले ड्रॅगन अंतराळयान मंगळवारी (१५ जुलै) पृथ्वीवर पोहोचले. भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०७ च्या सुमारास त्याने सुखरूप लँडिंग केले. यानाच्या दिशेने तंत्रज्ञाची टीम रवाना झाली असून, सर्व क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Dragon Landed Safely)

सोमवारी (१४ जुलै) ड्रॅगनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. शुभांशू शुक्ला आणि अ‍ॅक्सिओम-४ मिशनवरील अन्य अंतराळवीरांना घेऊन ते पृथ्वीच्या दिशेने निघाले होते. सुमारे तीन आठवडे अंतराळ स्थानकावर राहून हे अंतराळवीर मंगळवारी पृथ्वीवर सुखरूप परतले.

२५ जून रोजी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून फाल्कन-९ रॉकेटने प्रक्षेपित करण्यात आलेले अ‍ॅक्सिओम-४ हे यान २६ जून रोजी आयएसएसशी जोडले गेले. १८ दिवसांत, या पथकाने मानवी आरोग्य, अवकाशातील शेती, मानसिक आरोग्य आणि अंतराळ सूट साहित्यावरील अभ्यासांसह ६० हून अधिक प्रयोग केले आहे. हे अभियान ५८० पौंडांपेक्षा जास्त साहित्य घेऊन यानाने परतीचा प्रवास सुरू केला. यामध्ये वैज्ञानिक उपकरणे आणि संशोधन नमुन्यांचा समावेश आहे. (Dragon Landed Safely)

गगनयान मोहिमेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा : नरेंद्र मोदी

दरम्यान, तप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशू शुक्ला यांचे अभिनंदन केले आणि म्हटले की, ‘‘ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला त्यांच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेतून पृथ्वीवर परतत आले. मी आणि आपण सर्व भारतीयांच्यावतीने त्यांचे स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून, त्यांनी त्यांच्या समर्पण, धैर्य आणि समर्पित भावनेने अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली आहे. हा गगनयान या भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने गाठलेला आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि तीन आंतरराष्ट्रीय क्रू मेटस् ना घेऊन ॲक्सिओम-४ चे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे यशस्वीरित्या प्रक्षेपण झाले होते. राकेश शर्मा यांच्यानंतर ४० वर्षांनी अवकाशात जाणारे कॅप्टन शुक्ला हे पहिले भारतीय आहेत. (Dragon Landed Safely)

अनेक अडथळ्यानंतर अ‍ॅक्सिओम-४ (अ‍ॅक्स-४) मोहीम सुरू झाली होती. शुक्ला यांच्यासोबत अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन (अमेरिका) कमांडर म्हणून, पोलिश अभियंता स्लावोस उझनान्स्की, हंगेरियन संशोधक टिबोर कापू  आहेत.

चार दशकांपूर्वी भारताने आपले पहिले अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा यांना अवकाशात पाठवले होते, परंतु शुक्ला यांच्या माध्यमातून भारताने एक मोठी झेप घेतली आहे. ते केवळ अवकाशात उड्डाण करत नाहीत तर ते आयएसएसच्या आतापर्यंतच्या सर्वात संशोधन-केंद्रित व्यावसायिक मोहिमांपैकी एकावर पायलट म्हणून काम करत आहेत.

गगनयान मोहिमेतही शुक्ला यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे अवकाशात माणूस पाठवणाऱ्यांच्या देशाच्या यादीत भारताला स्थान मिळणार आहे.

भारतासाठी गौरवाचा क्षण : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

भारतासाठी हा गौरवाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रीया केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.

“भारताला आज खरोखरच अंतराळ जगतात एक शाश्वत स्थान मिळाले आहे. आपल्या एका सुपुत्राने यशस्वी अंतराळ प्रवास पूर्ण केला आहे. हा भारतासाठी गौरवाचा क्षण आहे,” असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान, अ‍ॅक्सिओम-४ ड्रॅगन अंतराळयान सुखरूप परत आल्याने ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या कुटुंबाने जल्लोष केला.

You may also like

error: Content is protected !!