कोल्हापूर : प्रतिनिधी : राजकोट येथील राजकुमार कॉलेजवर ‘फोर्टी इयर्स ऑफ द राजकुमार कॉलेज’ हा सात खंडात्मक ग्रंथ मिळाले असून राजर्षी शाहू महाराजांचे दुर्मिळ फोटो, माहिती प्रथमच उपलब्ध झाली आहेत, अशी माहिती इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. (40 years of a Rajkumar collage)
रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराज यांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे आणि माहिती असणाऱ्या पुस्तकांचे एकूण अत्यंत दुर्मिळ असे सात खंड उपलब्ध झाले आहेत. १९११ मध्ये प्रकाशित झालेले हे खंड अत्यंत दुर्मिळ असून भारतामध्ये याच्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत कॉपीज शिल्लक आहेत. यातील मिंट कंडिशनच्या या ग्रंथांच्या सातही खंडांच्या प्रति कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या संग्रहात दाखल झाल्या आहेत. (40 years of a Rajkumar collage)
भावनगरचे भावसिंहजी महाराज हे शाहू महाराजांचे परममित्र, जिवाभावाचे स्नेही होते. राजकोट अध्यासन कालापासूनचे ते सहाध्यायी. पुढे शाहूंनी त्यांचे कायम स्मरण व्हावे म्हणून कोल्हापुरातील जुना राजवाडा ते नवीन राजवाडा या राजमार्गाला भावसिंहजी रोड असे नाव दिले. भावसिंहजी यांनीही महुआ येथे बांधलेल्या राजवाड्यास शाहू पॅलेस असे नाव दिले. १८९६ ला भावनगरच्या गादीवर आलेल्या भाऊसिंहजींनी आपल्या संस्थांनच्या कारभारात वैयक्तिक व कर्तव्य निष्ठेने लक्ष घालून राज्य चालवले. ते पुरोगामी राज्यकर्ते होते. अनेक लोकोपयोगी कामे आणि शिक्षण प्रसार यासाठी पुष्कळ पैसा खर्च केला. वैयक्तिक त्याग आणि गरिबांबद्दल त्यांना वाटणारी कणव यामुळे त्यांची कारकीर्द लोकप्रिय झाली होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे सुसंस्कृत व कलाप्रिय होते. ते अनेक कवींचे व गायकांचे आश्रयदाते असून स्वतः ते ‘बी. टी. या नावाने कवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना तीन मुले व एक कन्या होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या इच्छेप्रमाणे शाहूंनी त्यांच्या मुलांच्या संबंधातील आपली कर्तव्य शेवटपर्यंत पार पाडली. (40 years of a Rajkumar collage)
भावसिंहजी महाराजांनी आपल्या राजकोट येथील राजकुमार कॉलेजवर ‘फोर्टी इयर्स ऑफ द राजकुमार कॉलेज’ हा सात खंडात्मक ग्रंथ लिहिला. यासातही खंडांचे प्रकाशन १९११ मध्ये झाले. यातून भावसिंहजी महाराजांची प्रचंड विद्वत्ता जशी दिसते तशीच आपल्या कॉलेज बद्दलची आस्थाही दिसते. १८७० सालापासूनचा या कॉलेजचा प्रवास यामध्ये दिलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक वडील छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांचे शिक्षण ही येथेच झाले होते. त्यांचेही अनेक दुर्मिळ असे फोटो या ग्रंथात दिले आहेत. आपल्या शाहू महाराजांचे आणि भावसिंहजी महाराजांचे मैत्र संबंध तर सर्वांना ज्ञात आहेतच. या राजकोट कॉलेजमध्ये १८८५ ते १८८९ पर्यंत शाहू महाराजांचे वास्तव्य होते. महाराजांनी या ठिकाणी शालेय शिक्षणाबरोबर कवायत, तालीम, घोडेस्वारी, नेमबाजी या मर्दानी खेळासह क्रिकेट, फुटबॉल यासारख्या मैदानी खेळाचे ही प्रशिक्षण घेतले. (40 years of a Rajkumar collage)
१९११ पर्यंतचा या कॉलेजचा इतिहासच या सात खंडातून भाऊसिंहजी महाराजांनी प्रकाशित केला होता. बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील सर्व संस्थानातील राजकुमार येथे शिक्षण घेत. सन १८७० ते १९११ या काळात येथे शिक्षण घेत असणाऱ्या सर्व संस्थानातील राजकुमारांचे अनेक दुर्मिळ फोटो, त्या काळातील शिक्षण पद्धती, खेळ, गॅदरिंगचे फोटो, नकाशे यामध्ये उपलब्ध आहेत. शाहू महाराज यांचे आजपर्यंत माहित नसणारे, अनेक दुर्मिळ फोटो यामध्ये उपलब्ध आहेत. पत्रकार परिषदेला हर्षल सुर्वे, किरणसिंह चव्हाण, अमित आडसुळे, ओंकार कोळेकर उपस्थित होते.