Home » Blog » झी-सोनी’कडून सामोपचाराने वादावर पडदा

झी-सोनी’कडून सामोपचाराने वादावर पडदा

उभयतांनी परस्परांविरोधातील सर्व दावे मागे घेण्यास उभयतांनी सहमती दर्शविली आहे.

by प्रतिनिधी
0 comments

झी आणि सोनी या मनोरंजन क्षेत्रातील दोन बड्या कंपन्यांनी फिस्कटलेल्या १० अब्ज डॉलरचे महाविलीनीकरण आणि त्याच्याशी संबंधित वाद सामोपचाराने मिटवल्याचे मंगळवारी जाहीर केले. उभयतांनी परस्परांविरोधातील सर्व दावे मागे घेण्यास उभयतांनी सहमती दर्शविली आहे.

दीर्घकाळ रखडलेले झी आणि सोनी यांचे महाविलीनीकरण सोनीकडून म्हणजेच सध्याच्या कल्व्हर मॅक्स एंटरटेन्मेंटकडून रद्द करण्यात आले होते. त्यावर आक्षेप नोंदवून झीने लवादाकडे धाव घेतली होती. दोन्ही कंपन्यांनी, सिंगापूर इंटरनॅशनल लवाद केंद्र (एसआयएसी) येथे सुरू असलेल्या निवाड्यामध्ये आणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) आणि इतर मंचावर सुरू केलेल्या सर्व संबंधित कायदेशीर कज्जांमध्ये एकमेकांविरोधातील सर्व दावे मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे. यासंबंधाने संयुक्त निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले.

झी आणि कल्व्हर मॅक्स एंटरटेनमेंट या दोघांनी डिसेंबर २०२१ मध्ये स्वाक्षरी केलेल्या विलीनीकरण कराराचे पालन न केल्याबद्दल एकमेकांकडून ९ कोटी डॉलरचे (सुमारे ७४८.७ कोटी रुपये) करार रद्दबातल शुल्क (टर्मिनेशन फी) मिळावे, असा दावा केला होता. झीने विलीनीकरणाच्या अटींची पूर्तता केली नसल्याचे सांगत कल्व्हर मॅक्स एंटरटेनमेंटने हे शुल्क द्यावे असे म्हटले होते. झीने या ९ कोटी डॉलरच्या मागणीसाठी सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राकडे धाव घेतली होती. सामंजस्य करारानुसार, कोणत्याही पक्षाकडे कोणतीही थकीत दायित्वे नसतील. भविष्यातील वाढीच्या संधींचा स्वतंत्रपणे पाठपुरावा करण्यासाठी आणि मनोरंजन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपन्यांनी परस्पर सामंजस्यातून तोडगा काढल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00