मायामी : मायामी ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात जर्मनीच्या अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेवला चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. फ्रान्सच्या आर्थर फिल्सने झ्वेरेवला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला एकेरीमध्ये ब्रिटनच्या एमा रॅडुकॅनूचे आव्हानही संपुष्टात आले. (Zverev)
या स्पर्धेमध्ये २० वर्षीय फिल्सला १७ वे मानांकन आहे. झ्वेरेवविरुद्ध त्याने तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात ३-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवला. या सामन्याचा पहिला सेट जिंकून झ्वेरेवने चांगली सुरुवात केली होती. मात्र, फिल्सने निर्णायक क्षणी सामन्यामध्ये जोरदार पुनरागमन करत पुढचे सलग दोन सेट जिंकले. उपांत्यपूर्व फेरीमध्ये फिल्सचा सामना चेक प्रजासत्ताकच्या जेकब मेन्सिकशी होईल. दरम्यान, पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये अर्जेंटनाचा फ्रान्सेस्को सेरुन्डोलो आणि बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्ह यांच्यातील सामनाही चुरशीचा झाला. या सामन्यामध्ये दिमित्रोवने ६-७(६-८), ६-४, ७-६(७-३) असा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. (Zverev)
महिला एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीमध्ये अमेरिकेच्या चतुर्थ मानांकित जेसिका पेग्युलाने रॅडुकॅनूला ६-४, ७-६(७-३), २-६ असे नमवले. या सामन्यामध्ये रॅडुकेनूने पहिला सेट गमावल्यानंतर कडवी लढत देत दुसरा सेट टायब्रेकरमध्ये जिंकून सामन्यात बरोबरी साधली होती. तिसऱ्या सेटमध्ये मात्र पेग्युलाच्या वेगवान खेळासमोर तिचा प्रतिकार तोकडा पडला. उपांत्य फेरीमध्ये पेग्युलासमोर फिलिपिन्सच्या १९ वर्षीय अलेक्झांड्रा एआलाचे आव्हान आहे.
भांबरी-बोर्जेस पराभूत भारताचा टेनिसपटू युकी भांबरी आणि त्याचा पोर्तुगालचा जोडीदार ननो बोर्जेस यांना पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. लॉइड ग्लासपूल-ज्युलियन कॅश या ब्रिटनच्या नवव्या मानांकित जोडीने सुपर टायब्रेकरपर्यंत रंगलेल्या लढतीत भांबरी-बोर्जेस जोडीला ७-६(७-१), ३-६, १०-८ असे हरवले. पहिला सेट टायब्रेकरमध्ये गमावल्यानंतर भांबरी-बोर्जेस जोडीने दुसरा सेट जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसरा गेम खेळवण्याऐवजी सुपर टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यामध्ये, ग्लासपूल-कॅश जोडीने १०-८ अशी बाजी मारत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
हेही वाचा :
भारताला कुस्तीत दोन ब्राँझ
अर्जेंटिनाची ब्राझीलवर मात