मायामी : भारताचा टेनिसपटू युकी भांबरी आणि त्याचा पोर्तुगालचा साथीदार ननो बोर्जेस यांनी मायामी ओपनच्या पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये पोलंडची इगा स्वियातेक, ब्रिटनची एमा रॅडिकॅनू या खेळाडूंनी विजय नोंदवले. (Yuki Bhambri)
भांबरी-बोर्जेस यांनी चेक प्रजासत्ताकचा ॲडम पॅव्हलासेक व ब्रिटनचा जिमी मरे यांचा ७-६(७-४), ६-२ असा पराभव केला. हा सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये दोन्ही जोड्यांनी तुल्यबळ खेळ केल्यामुळे हा सेट टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये युकी-बोर्जेसने ७-४ अशी बाजी मारून सामन्यात आघाडी घेतली. दुसरा सेट जिंकताना भांबरी-बोर्जेस जोडीला फारसे प्रयास पडले नाहीत. हा सेट ६-२ असा जिंकून भांबरी-बोर्जेस यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत भांबरी-बोर्जेस जोडीचा सामना ब्रिटनच्या लॉइड ग्लासपूल-ज्युलियन कॅश या सहाव्या मानांकित जोडीशी होईल. (Yuki Bhambri)
महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये द्वितीय मानांकित स्वियातेकने युक्रेनच्या २२ व्या मानांकित एलिना स्विटोलिनाला ७-६(७-५), ६-३ असे नमवले. उपांत्यपूर्व फेरीत तिची लढत चेक प्रजासत्ताकच्या ॲलेक्झांड्रा इआलाशी होणार आहे. एमा रॅडिकॅनूने अमेरिकेच्या अमांडा ॲनिसिमोवावर ६-१, ६-३ अशी सरळ सेटमध्ये मात केली. उपांत्यपूर्व फेरीत रॅडिकॅनूसमोर अमेरिकेच्याच चतुर्थ मानांकित जेसिका पेग्युलाचे आव्हान आहे. (Yuki Bhambri)
पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीमध्ये फ्रान्सचा आर्थर फिल्स आणि अमेरिकेचा फ्रान्सेस तियाफो यांच्यातील सामना चुरशीचा झाला. तब्बल २ तास ५५ मिनिटे रंगलेला हा सामना २० वर्षीय फिल्सने ७-६(१३-११), ५-७, ६-२ असा जिंकला. चौथ्या फेरीमध्ये फिल्सची लढत जर्मनीच्या अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेवशी होणार आहे. २०१८नंतर इंडियन वेल्स आणि मायामी ओपन या लागोपाठच्या स्पर्धांमध्ये चौथ्या फेरीत आगेकूच करणारा फिल्स हा फ्रान्सचा पहिलाच पुरुष टेनिसपटू ठरला आहे. दरम्यान, चौथ्या फेरीत चतुर्थ मानांकित नोवाक जोकोविचचा सामना इटलीच्या १५ व्या मानांकित लोरेन्झो मुसेटीशी होईल.
हेही वाचा :
शफालीची ‘ग्रेड बी’ कायम