क्वालालंपूर : एकोणीस वर्षांखालील महिला क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचे वर्चस्व अबाधित असल्याचे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. भारताच्या मुलींच्या संघाने एकही सामना न गमावता सलग दुसऱ्यांदा १९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कपच्या विजेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ९ विकेटनी सहज मात केली. दक्षिण आफ्रिकेचा डाव ८२ धावांत संपवून भारताने बाराव्या षटकात १ बाद ८४ धावा केल्या. (World Champion)
या स्पर्धेच्या साखळी फेरीपासूनच भारतीय संघाने विजेत्यांप्रमाणे खेळ केला. संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या मर्यादा उघड केल्या आणि अवघ्या ८२ धावांत त्यांचा डाव गुंडाळला. आफ्रिकेच्या कोणत्याच फलंदाजास वैयक्तिक २५ धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. मिकी व्हॅन वूर्स्टने आफ्रिकेकडून १८ चेंडूंमध्ये ३ चौकारांसह सर्वाधिक २३ धावांची खेळी केली. भारतातर्फे गोंगाडी त्रिशाने तीन, वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि परुणिका सिसोदिया यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (World Champion)
भारतासाठी ८३ धावांचे लक्ष्य हे आव्हानात्मक नव्हतेच. केवळ एक विकेट गमावून भारताने हे लक्ष्य ११.२ षटकांत पार केले. सलामी फलंदाज जी. कमलिनी ८ धावा करून बाद झाल्यानंतर त्रिशा आणि सानिका चाळके यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ४८ धावांची भागीदारी रचली. त्रिशाने ३३ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह नाबाद ४४, तर सानिकाने २२ चेंडूंमध्ये ४ चौकारांसह नाबाद २६ धावा केल्या. त्रिशा ही सामन्यातील, तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. तिने या स्पर्धेत ७७.२५ च्या सरासरीने एका शतकासह ३०९ धावा करतानाच ७ विकेटही घेतल्या. या स्पर्धेत सर्वाधिक १७ विकेट भारताच्या वैष्णवी शर्माने घेतल्या, तर तिच्यामागोमाग भारताचीच आयुषी शुक्ला १४ विकेटसह दुसऱ्या स्थानी राहिली. (World Champion)
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका – २० षटकांत सर्वबाद ८२ (मिकी व्हॅन वूर्स्ट २३, फे कॉलिंग १५, जेमा बोथा १६, गोंगाडी त्रिशा ३-१५, आयुषी शुक्ला २-९, परुणिका सिसोदिया २-६) पराभूत विरुद्ध भारत – ११.२ षटकांत १ बाद ८४ (गोंगाडी त्रिशा नाबाद ४४, सानिका चाळके नाबाद २६, कायला रेनेके १-१४).
हेही वाचा :
भारत पुन्हा ‘वर्ल्ड ग्रुप-१’मध्ये