मुंबई : प्रतिनिधी : ‘लाडकी बहीण’ योजना सुरू राहणार असली, तरी या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते. महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ केली जाईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ही योजना सुरू ठेवताना सध्याची १५०० रुपये रक्कमच महिलांना मिळत राहणार आहे. या रक्कमेत लगेच वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
सध्याच्या निकषांनुसार एका कुटुंबात किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार यावर मर्यादा नाही; मात्र आगामी काळात एका कुटुंबातील केवळ दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, असा बदलही योजनेत केला जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणाअंतर्गत या योजनेते बदल केले जाणार आहेत. ‘लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्र सरकारने २८ जून २०२४ रोजी जाहीर केली. १ जुलै पासून योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. १८ ते ६० वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकरदाता नसावा, असे सध्याचे या योजनेचे निकष आहेत.