बेळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये आपण काही गोष्टींवर अधिक विसंबून राहू लागलो आहोत. दुकानांपेक्षा ऑनलाइन खरेदीवर भरवसा ठेवू लागलो आहोत. प्रवासासाठी नेहमीच्या टॅक्सीपेक्षा ओला-उबर अधिक विश्वासार्ह वाटू लागली आहे. आणि प्रवास करताना कुणाला रस्ता विचारत बसण्यापेक्षा गूगल मॅपच्या (Google Maps) आधाराने वाटचाल करू लागलो आहोत. परंतु गूगल मॅपवर एका मर्यादेपेक्षा अधिक विसंबून राहणे जिवावर बेतू शकते, हे अलीकडच्या दोन उदाहरणांवरून दिसून आले आहे. एरव्ही वाटाड्या ठरणारा गूगल मॅप काहीवेळा संकटात टाकू शकतो, याचे भान ठेवायला हवे.
ताजी घटना आहे, बेळगावजवळची. बिहारहून एक कुटुंब गोव्याला निघालं होतं. निघाल्यापासून ते गुगल मॅप्सच्या सहाय्यानं प्रवास करीत होतं. अर्थात गुगल मॅप्सने त्यांना बेळगावपर्यंत सुखरूप आणि व्यवस्थित आणले. पण तिथून पुढे घोळ झाला आणि गोव्याला नेण्याऐवजी त्यांना एका जंगलात नेऊन सोडलं. त्या कुटुंबाला सारी रात्र जंगलात काढावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब बिहारहून गोव्याला निघालं होते. त्यांनी संपूर्ण प्रवासात गुगल मॅप्सची मदत घेतली. बेळगावजवळ पोहोचल्यानंतर त्यांना गुगल मॅप्सने एक छोटासा रस्ता दाखवला. जो खानापूरच्या भीमगड जंगलातून जात होते. त्या रस्त्याने आठ किलोमीटर आत गेल्यावर त्या कुटुंबाला रस्ता चुकल्याचा अंदाज आला. आपण चुकीच्या रस्त्याने आल्याचे त्यांच्या लक्षात आले. ओबडधोबड रस्ता आणि जंगलात खूप आत आल्यामुळे मोबाइलचे नेटवर्कही गायब झालं होते. नेटवर्क गेल्यामुळे गुगल मॅप्सची साथही सुटली. रात्रीची वेळ. किर्र झाडी. नेटवर्क गायब. (Google Maps)
त्यांना जंगलातून बाहेर पडण्याचा रस्ताही दिसेना. त्यामुळं त्या कुटुंबाला ती संपूर्ण रात्र जंगलात काढावी लागली. सकाळी उठल्यानंतर त्या कुटुंबाने नेटवर्कचा शोध घेत चार किलोमीटरची पायपीट केली. एका जागी त्यांना नेटवर्क मिळालं. तिथून त्यांनी तातडीने ११२ हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या कुटुंबाला जंगलातून बाहेर काढले. जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी होते, सुदैवाने त्यासंदर्भानं काही अघटित घडलं नाही.
गूगल मॅपमुळं बरेलीत तिघांचा मृत्यू
गुगल मॅप्सने दाखवलेल्या रस्त्यानं गेल्यामुळं तीन लोकांचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या महिन्यातच घडली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील तिघांना जीव गमावावा लागला होता. गुगल मॅप्सने त्यांच्या कारला चुकीचा रस्ता दाखवला. एका बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा रस्ता गुगल मॅप्सने दाखवला आणि पुढं पुलाचं बांधकाम अर्धवट होतं. तिथून त्यांची कार थेट नदीत कोसळली. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. गुरुग्राम येथून हे लोक एका लग्न समारंभासाठी बरेलीला निघाले होते. गुगल मॅप्सने त्यांना अपूर्ण फ्लायओव्हरवर नेले आणि त्यांची कार पन्नास फूट उंचीवरून रामगंगा नदीत पडली.
हेही वाचा :
- सोमवारी कोल्हापूरात पाणीपुरवठा बंद
- सॅम पित्रोदा यांचा स्मार्टफोन, लॅपटॉप हॅक
- गर्लफ्रेंडसमोर कानशिलात; मुलाने पित्यासह कुटुंबाला संपवले