Home » Blog » Walmik Karad : वाल्मिक कराडची शरणागती

Walmik Karad : वाल्मिक कराडची शरणागती

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गेले तीन आठवड्यापासून चर्चेत असलेला वाल्मिक कराड मंगळवारी सकाळी पुणे येथे सीआयडीच्या कार्यालयात शरण आला.

by प्रतिनिधी
0 comments

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गेले तीन आठवड्यापासून  वाल्मिक कराड चर्चेत होता. मंगळवारी सकाळी वाल्मिक कराड पुणे येथे सीआयडीच्या कार्यालयात शरण आला. शरण येण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ शेअर केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा त्यात त्याने केला आहे. (Walmik Karad) वाल्मिक कराड सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी सकाळी सीआयडीसमोर हजर होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी तो सीआयडीच्या पुणे कार्यालयात हजर झाला.

राजकारण तापले

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणाचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचे (Walmik Karad) नाव घेतले जात होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून तिघे अद्याप फरारी आहेत. याप्रकरणी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची घोषणा केली होती. अपहरण आणि खुनाच्या घटनेला तीन आठवडे उलटून गेले. त्यानंतरही मुख्य संशयित वाल्मिक कराड याला अटक होत नसल्यामुळे उलट सुलट चर्चा होत होती.

वाल्मिक कराड (Walmik Karad) हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा उजवा हात मानला जातो. त्यामुळे त्याला सरकारकडून अभय दिले जात असल्याची चर्चा होती. २८ डिसेंबरला बीड येथे सर्वपक्षीय मोर्चा काढून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर करण्याची मागणी करण्यात आली होती. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या आशीर्वादाने वाल्मिक कराडने उभारलेल्या अनैतिक साम्राज्याचा पाढा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हजारोंच्या मोर्चासमोर वाचला होता. सरकारच्या ढिलाईबद्दल राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. प्रकरणाने गंभीर राजकीय वळण घेतल्यामुळे सत्तेवर आल्याआल्या महायुतीचे सरकार अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले होते. अखेर मंगळवारी सकाळी वाल्मिक कराड हजर झाला.

वाल्मिक कराडचा व्हिडिओ

सीआयडीच्या कार्यालयात हजर होण्यापूर्वी वाल्मिक कराडने (Walmik Karad) एक व्हिडीओ शेअर केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा त्यात त्यााने केला आहे. त्याने म्हटले आहे की,

केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोषभैय्या देशमुख यांचे जे कुणी मारेकरी असतील त्यांना अटक व्हावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. तपासात मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवता मला जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे.

याप्रकरणी चर्चेत असलेल्या धनंजय मुंडे यांनीही यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, असे म्हटले होते. मात्र या प्रकरणात एकूण पोलिसांची आणि सरकारचीही भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत होते.

तपासासाठी सीआयडीची नऊ पथके

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीची नऊ पथके कार्यरत होती. सीआयडीचे सुमारे दीडशेहून अधिक अधिकारी कर्मचारी तपासात होते. त्यांनी वाल्मिक कराडशी संबंधित शंभरहून अधिक लोकांची चौकशी केली. या प्रकरणातील आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली, तसेच त्यांच्यासंपत्ती जप्तीची कारवाईही सुरू करण्यात आली होती.

वाल्मिक कराडचा प्रवास

संतोष देशमुख हत्या घडल्यानंतर अनेक दिवस वाल्मिक कराड खुलेआम घुमत होता, परंतु त्यावेळी त्याला ताब्यात घेण्याबाबत पोलिसांनी कार्यवाही केली नव्हती. अकरा डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतरही वाल्मिक कराड हा सोशल मीडियावर सक्रीय होता. (Walmik Karad)
वाल्मिक कराड नऊ डिसेंबरला रोजी परळीमधून बाहेर पडला. दहा आणि अकरा डिसेंबरला तो उज्जैनमध्ये दर्शनासाठी मंदिर परिसरात होता. त्यासंदर्भातील छायाचित्र त्याने अकरा तारखेला सोशल मीडियावर पोस्ट केले. बारा डिसेंबरला गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली. चौदा डिसेंबरला वाल्मिक कराडने दत्त जयंती निमित्त पोस्ट टाकली. पंधरा डिसेंबरला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देणारी पोस्ट सोशल मीडियावर केली. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.

हेही वाचाः

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00