Home » Blog » विलासकाका उंडाळकरः `चव्हाण स्कूल’चा लास्ट स्टुडंट..! (Vilaskaka Undalkar)

विलासकाका उंडाळकरः `चव्हाण स्कूल’चा लास्ट स्टुडंट..! (Vilaskaka Undalkar)

विलासराव पाटील- उंडाळकर यांना जाऊन (४ जानेवारी २०२१) चार वर्षे झाली. त्यांची राजकीय कारकीर्द पन्नास वर्षांहून अधिक आहे. उंडाळकरांच्या दोन/तृतीयांश कारकीर्दीचा मी प्रत्यक्ष साक्षीदार. त्यामुळे आठवणींचा पट झरझर मागे गेला. (Vilaskaka Undalkar)

by प्रतिनिधी
0 comments
  • प्रशांत पवार

१९८० – ते दिवस लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचे होते. केंद्रातले जनता पक्षाचे सरकार पडले होते. पण त्याआधी काँग्रेस पक्षाची दोन शकले झाली होती. दोन्ही काँग्रेस एकमेकांच्या विरोधात उभ्या. एक इंदिरा काँग्रेस, दुसरी अरस काँग्रेस. (कर्नाटकातील देवराज अरस हे या प्रक्षाचे प्रमुख त्यामुळे अरस काँग्रेस). इंदिराजींच्या पक्षात सारे आणि मुरब्बी काँग्रेसजन. तर अरस काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavhan) यांचे नेतृत्व मानणारे पुढारी. सोप्या भाषेत आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वसुरी. त्यावेळच्या कराड लोकसभा मतदारसंघात इंदिरा काँग्रेस विरुद्ध अरस काँग्रेस, असा सामना झडला. इंदिरा काँग्रेसकडून यशवंतराव मोहिते (Yashwantrao Mohite) तर अरस काँग्रेसकडून विलासराव उंडाळकर (Vilasrao Patil Undalkar) मैदानात.

त्यावेळी कराड लोकसभा मतदारसंघ कराड, पाटण, वाळवा, शिराळा, महाबळेश्‍वर, जावळी आणि सातारा तालुक्यात पसरला होता. ती लढाई तोडीस तोड होती. एक बाजू म्हणायची ‘भाऊं न् अप्पा, मारत्यात गप्पा’, ‘अलीबाबा अलीबाबा चाळीस चोर, पक्ष बदलणार हरामखोर’, दुसरी बाजू म्हणायची ‘सह्याद्रीचा पत्थर आता फोडायचाच.’ मोहिते यांच्या बाजूला प्रेमलाकाकी, विलासराव शिंदे, अभयसिंहराजे आणि इतर. तर उंडाळकरांच्या बाजूला पी.डी.पाटील, भिलारे गुरुजी, विक्रमसिंह पाटणकर, प्रतापराव भोसले, बाबासाहेब चोरेकर, आबासाहेब पार्लेकर, दादासाहेब जगताप. ही यादी तशी मोठी आहे.

सामना जोरात झडला. ४४ वर्षांचे तडफदार विलासराव उंडाळकर यांची ही पहिलीच संसदीय लढत. यशवंराव मोहिते हे त्यावेळचे मोठे पुढारी. त्यांच्या विरुद्ध लढणे, ही सोपी बाब नव्हती. या निवडणुकीत उंडाळकरांचा केवळ पंचवीस हजार मतांनी पराभव झाला. पण या पराभवातच त्यांच्या राजकीय सुरुवातीची बीजे रोवली होती. या निवडणुकीत त्यांनी कराड उत्तर आणि दक्षिण या विधानसभेच्या दोन्ही मतदारसंघातून आघाडी घेतली होती. दोन चार महिन्याच्या फरकानेच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. उंडाळकर अलगदपणे चरखा या चिन्हावर विधानसभेत पोहोचले. पुढे ते ३५ वर्षे आमदार राहिले. सलग सातवेळा निवडून येणारे फार कमी आमदार महाराष्ट्राने पाहिले आहेत. पण हे काही एकाएकी घडले नव्हते. उंडाळकरांची त्यांच्या घराची आराधना, अनेक वर्षांची त्याचीच ही परिणती.

जिल्हा परिषदेची पायरी

उंडाळकरांच्या घरात शामराव, दिनकरराव, जयसिंगराव आणि विलासराव अशी चार मुले. शामराव लवकर निर्वतले. दिनकरराव राज्य सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. वडील दादा उंडाळकर सार्वजनिक सेवेचे भुकेले. घरात प्रश्‍न निर्माण झाला. आता हा वसा कोण चालविणार? लोकल बोर्ड संपून जिल्हा परिषद अस्तित्वात आली होती. दादा उंडाळकरांना वाटले आपला खोंड सोडावा चाकोरीत. तशी इच्छा त्यांनी यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavhan) यांच्याकडे व्यक्त केली. चव्हाणसाहेब म्हणाले, ‘थांबा, जरा कड काढा.’ १९६२ साली मिळू पाहणारी संधी हुकली. तोपर्यंत विलासराव पाटील यांचे शिक्षण पूर्ण झाले होते. १९६२ ला हुकलेली संधी पुन्हा टकटक करू लागली. १९६७ ला उंडाळकर बैलजोडीच्या चिन्हावर जिल्हा परिषदेत पोहोचले. (Vilaskaka Undalkar)

उंडाळकर जिल्हा परिषद सदस्य झाले. सातारला राहायला आले. त्यांचा निवास कमानी हौदाशेजारी होता. त्यावेळी सातार्‍यात काँग्रेसचे मोठे प्राबल्य होते. राजे तेव्हाही होतेच पण अदालत वाड्यात आणि अदालतवाड्यापुरतेच. सातारा शहराचे सार्वजनिक जीवन तेव्हा बन्याबापू गोडबोले, मनोहरपंत भागवत, अनंत कुलकर्णी (समर्थ साप्ताहिकाचे) यांच्या ताब्यात होते. दुसरी फळी होती ती कॉ. अ‍ॅड. व्ही. एन. पाटील यांची. सातारच्या काँग्रेसला तेव्हा अन्या, मन्या अन् बन्याची (कुलकर्णी, भागवत, गोडबोले) काँग्रेस म्हटले जायचे. चांगली व सभ्य माणसे होती ती. जिल्ह्यात एकाच नावाचा दबदबा किसन वीर यांचा. यशवंतराव मोहिते, दादासाहेब जगताप, बाळासाहेब देसाई हे स्वतंत्र व राखीव खेळाडू.

किसन वीर जिल्ह्याची पटावरची रचना अशी काही करायचे, की सारे वजीर प्याद्यांच्या गर्दीत अडकवून ठेवायचे. दादासाहेब जगताप डोईजड होताहेत, असे वाटले की वीरांनी घातलाच पायकूट. यशवंतराव मोहिते कराड दक्षिणेत अजिंक्य होते. (तसे भाऊ त्यांच्या आयुष्यात कोणतीच निवडणूक हरले नाहीत.) ते प्रसंगी यशवंतराव चव्हाण यांना प्रश्‍न विचारते व्हायचे. त्यांच्यापुढे प्रश्‍न निर्माण करायचे. त्यांना म्हणजे मोहित्यांना आव्हान निर्माण करील, असा एकही पुढारी कराड दक्षिणेत नव्हता. स्वातंत्र्यसैनिकाच्या घराची परंपरा असणारा विलासराव किसन वीरांच्या हाती लागला. त्यांनी उंडाळकरांना जिल्हा परिषदेत घेतले. जिल्हा मध्यवर्ती बँकेत घेतले आणि तिशी-पस्तशीत असतानाच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षही केले. ‘येरा पाव, दोरा चिठ्ठी’ ५०-५५ वर्षे सुरू राहिले …

रयत संघटनेची बांधणी

विलासराव पाटील (Vilaskaka Undalkar) १९८० सालीच आमदार झाले. पण त्याआधी त्यांनी काय काय सोसले. १५ वर्षे उमेदवारी करताना घरचे खावून लष्कराच्या खूप भाक-या भाजाव्या लागल्या. उंडाळकर तेव्हा राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करीत. एवढेच कशाला; १९८५ साली विधानसभेचा अर्ज भरायच्या दिवशी त्यांनी बोलावलेली गाडी वेळेवर आली नाही, म्हणून त्यांना सातारा ते खोडशी हा प्रवास मालवाहू ट्रकच्या केबिनमधून करावा लागला होता. साधनांची प्रचंड कमतरता, शिल्लक रकमेची वानवा अशा परिस्थितीत त्यांचे राजकारण सुरू होते. १९६७ ते १९८० या काळात गावोगावी त्यांनी स्वत:चे असे नेटवर्क तयार केले.

पदरमोड करून त्यांच्यासाठी संघटना बांधणारे पाच- पंचवीस कार्यकर्ते अहोरात्र राबायचे. तेव्हा कुठे ती त्यांची रयत संघटना उभी राहिली. या रयत संघटनेवर बक्कल होते ते काँग्रेस पक्षाचे. त्यापुढे चिन्ह बैलजोडी असो, चरखा असो, हाताचा पंजा असो आणि कालघटवाचा नारळ सा-या  निवडणुकांत खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी होत असे. अपवाद २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीचा. (त्याचा उल्लेख पुढे येईल.) काँग्रेस पक्षात राहून सारी व्यवधान सांभाळून सलग पस्तीस वर्षे आपली चिमुटभराची का असेना दौलत सांभाळणे फार कमी लोकांना जमले आहे.

फक्त यशवंतरावांचे कार्यकर्ते

१९५२ ते १९८० या काळात काँग्रेस पक्षात राहून राजकारण करणे, सत्तेचे पद मिळविणे, ते पद टिकवणे ही काही फार अप्रुप वाटावी, अशी गोष्ट नव्हती. त्या काळात अनेक गडबडगुंडे, नर्मदेचे गोटे पवित्र झाले. पण आणीबाणीनंतर काँग्रेस पक्षात राहून आपले वैयक्तिक महत्त्वाकाक्षेचे राजकारण करणे ही आजच्याएवढीच कठीण गोष्ट होती. विलासराव उंडाळकर (Vilasrao Patil Undalkar) अशा व्यक्तीपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या संसदीय राजकारणाच्या काळात अनेक उन्हाळे- पावसाळे बघितलेच. पण अवकाळी पाऊस आणि दुष्काळी झळाही अनुभवल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षात यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांचे नेतृत्व स्वीकारले.

पण १९८० नंतर अरस काँग्रेसचे अस्तित्व गैरलागू झाल्यावर ते एकाकीच यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavhan) यांना सोडून इंदिरा काँग्रेस पक्षात परतले. ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या चरखा चिन्हाच्या पक्षात होते खरे. पण त्यांनी शरद पवार यांचे नेतृत्व तेव्हाही स्वीकारले नाही आणि आजही. काही काळ (१९८५ च्या निवडणुकीत) त्यांचे नेते वसंतदादा पाटील होते, पण ते त्यांना कार्यकर्ता मानायला तयार नव्हते आणि हे त्यांना मनापासून नेता मानत नव्हते. १९८४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रेमलाकाकी चव्हाण आणि विलासराव उंडाळकर यांच्या गावोगावी सभा झाल्याचे अनेकांना आठवत असेल. पण तो एकोपा फार दिवस राहिला नाही.

उंडाळकरांच्या उमेदीच्या काळात ते शंकरराव चव्हाण यांचे समर्थक म्हणून राज्यात ओळखले जात. पण तोही एक भ्रमच. कारण उंडाळकर यांना पहिल्यांदा मंत्रीपद दिले ते सुधाकरराव नाईक यांनी. दुस-यांदा माधवराव शिंदे यांनी. तिस-यांदा सुशीलकुमार शिंदे यांनी. त्यांचे आमदारकीचे पहिले तिकीट फायनल केले ते शरद पवार यांनी (असे पवारांनीच वाठार मुक्कामी सांगितले) अशी सारी जंत्री पाहिल्यावर त्या-त्या परिस्थितीत उंडाळकर कुणाचेतरी समर्थक भासतात खरे, पण अगोदर सांगितले त्याप्रमाणे आहे तो भ्रमच. उंडाळकर यशवंतराव चव्हाण सोडले तर कुणाचेच कार्यकर्ते नव्हते. ते स्वत:ला स्वयंभू नेता मानतात. रयत संघटना ही या स्वयंभू नेत्यापुढची आरास…!

मी स्वयंभू नेता

‘मी स्वयंभू नेता आहे’, ही भावना उंडाळकरांच्या मनात खोलवर रुजली होती. त्यांच्या उमेदीच्या काळात ही भावना खरीही होती. त्यामुळेच या स्वयंभू भावनेने त्यांनी आपल्या भोवतीची प्रभावळ निर्माण केली. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा काँग्रेस, काँग्रेसची मार्केट कमिटी, दूध संघ, खरेदी- विक्री संघ, पंचायत समिती आणि आमदारकी, असा त्यांच्या सर्वव्यापी वावर एखाद्या स्वयंभू नेत्यासारखा होता. या वाटचालीतून पक्षाला ते प्रसंगी बाजुलाही ठेवत.  सारे काही आपल्या भोवती फिरले पाहिजे, याची ते काळजी घेत.

आपले स्वयंभूपण टिकले पाहिजे, यासाठी ते कुणाचीही मदत घेत, कुणालाही नडत. १९७० च्या दशकात भीमराव धोंडी पाटील कराडचे सभापती असताना त्यांना जागोजागी नडत असत. त्यांना रोखण्यासाठी त्यांनी यशवंतराव मोहिते आणि पी.डी.पाटील यांची मोट बांधली होती आणि यटाक झाली त्यांची रयत संघटना! येणेप्रमाणेच त्यांनी यशवंतरावांच्या हयातीत त्यांचा भाचा असणा-या बाबुराव कोतवाल यांच्या १९७८ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव करण्याच्या स्वपक्षी प्रयत्नात यथायोग्य सहभाग नोंदविला. तसेच आपले स्वयंभूपण टिकवताना त्यांनी यशवंतराव मोहिते, पी.डी.पाटील, प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, रामराजे नाईक- निंबाळकर यांचा विरोधही केला आणि स्वीकारही.

पूर्वी मैदानी खेळात हाडकी गोट्यांचा खेळ होता. त्या खेळाचे एक सूत्र असते, गद कधी सोडायची नाही. गदीवरचा नर माद्यांना प्रसंगी गट्टी कोपराने ढोपरायला लावतो. विलासराव उंडाळकर यांनी कराड दक्षिणच्या गदीवरून जिल्ह्यात अनेकांना ‘ताड्या’ दिले. हेच ते उंडाळकर त्यांना २००८ पासून दक्षिणच्या गदीपासून वेगाने दूर व्हावे लागले. गादीवर असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना ताड्या दिला. पण हे काही एक- दोन वर्षात घडले नव्हते. खूप अगोदर ही प्रक्रिया घडत होती.

भागाकारापासून दहा हात दूर

वक्तशीर बोलणे म्हणजे लागू पुरता उतारा, कार्यकर्त्यांची उतरंड परफेक्ट, कोणते मडके कुठं ठेवायचं याचं उत्तम भान, राजकीय व्यवहाराची एक स्वनिर्मित आचारसंहिता, पैशाचा वापर जवळजवळ नाहीच, पण प्रभावाचा वापर चलनासारखा, सरकारी अधिका-याची नस अचूक पकडणार. राजकीय मित्र- समर्थक- विरोधक या पटाची मांडणी अगदी व्यवस्थित, विरोधकापर्यंत पोहोचेल असा संपर्क सेतू, संयमी भाषणकला, हे भाषण करताना कुणाचा उल्लेख करायचा आणि कुणाचा अनुल्लेख करायचा याचे व्याकरण मुखोद्गत, छोट्या निवडणुकीत काहीही करून काठावर पास होण्याची कला, बेरजेला सतत तयार, गरज पडत्यास वजाबाकीही करणार. पण भागाकारापासून चार नव्हे दहा हात दूर. राजकीय मित्र उद्या शत्रू होणार आहे, हे गृहीत धरून म्हणजे हातचा राखून वर्तन, तर राजकीय विरोधक उद्या मित्र होणार आहे, हे गृहीत धरून अगोदरच त्याच्यासाठी आरक्षण (यशवंतराव मोहिते, पी.डी.पाटील व इतर) साम, दाम, दंड आणि भेद या चारही अस्त्रांचा गरजेनुसार वापर.

मराठा समाजातल्या व त्यातल्या त्यात राजकीय परंपरा असणार्‍या घरातील व्यक्तिला रांगेत उभे करून कुणबी, रयत- मराठा आणि तत्सम साधर्म्य असणार्‍यांचीच मोठी गर्दी करणे, संघटनेत दोनच पदे एक नेता (हे पद अर्थातच उंडाळकरांकडे) दुसरे कार्यकर्ता. उपनेता औषधालाही नाही. अगदी घरातलाही नाही. ही सारी वैशिष्ट्ये विलासराव उंडाळकरांना (Vilaskaka Undalkar) कमी अधिक प्रमाणात चिकटली. खास उल्लेख करायचा म्हणजे राजकारणातील ‘यशवंतराव चव्हाण स्कूल’चीही तीच वैशिष्ट्ये. उंडाळकर चव्हाण स्कूलचे ‘लास्ट फेलो’…!

सतत आणि सातत्य ठेवून प्रभाव कायम कसा राखावा, याचा अभ्यास करावयाचा झाला, तर राज्यशास्त्राच्या एखाद्या विद्यार्थ्यांने त्यांच्या राजकारणाचा अभ्यास करावा. संशोधन करावे असेच उंडाळकरांचे राजकारण. त्यांच्या राजकारणात अपयश तसे दृष्टोत्पतीस नव्हते. पण ते आले. त्यांचे अनेक सहाध्यायी, मित्र पराभवाच्या अबीरात न्हाऊन निघाले. पण उंडाळकर बचावले होते. पण त्यांच्यातल्या सद्गुणांवर (की ज्यामुळे ते विजयी होत होते.) दुर्गुणांनी मात केली. त्यामुळेच त्यांच्या आमदारकीच्या सात-बारावर आळे झाले. कळत- नकळत पराभव त्यांच्यापर्यंत पोहोतच होता. पण तो जवळ आला आहे, याचा त्यांना पत्ताच नव्हता.

मोठ्या विजयापासून डाऊनफॉल

अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रस्तुत लेखक विलासराव उंडाळकर यांच्या दोन तृतीयांश राजकारणाचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. याचा अर्थ ज्ञात आहे, ते सर्वच लिहिता येते, असा नाही. असो. उंडाळकरांचं वय तेव्हा ६८ असावे. २००४ सालची ही गोष्ट. उंडाळकर राजकीयदृष्ट्या सर्वोच्च अशा बिंदूवर पोहोचले होते. सार्‍या एकजात संस्था ताब्यात होत्या. ते मंत्री होते. २००४ च्या निवडणुकीत ते राज्यात क्रमांक एकच्या मताधिक्याने विजयी झाले होते. (काहीजण म्हणतात, याच वेळी काकांनी थांबायला हवे होते. मुलाला संधी द्यायला हवी होती. कारण मतदारसंघ सेफ होता.) पण या विक्रमी विजयानंतर त्यांच्या राजकारणाचा ‘डाऊनफॉल’ सुरू झाला.

तसे ते होणारच होते. कारण कळत- नकळत विलासराव उंडाळकर यांच्या स्पष्टवक्तेपणावर तुच्छतावादाची काजळी चढली होती. कुणाजवळ, कुणाबद्दल, काय बोलावे याचे भान उरले नव्हते. काँग्रेसवाल्यांचे राजकारण वरकड पैशातून चालते. भाजपवाल्यांचे निधीतून आणि कम्युनिष्टांचे लेव्हीतून, हे वास्तव असताना उंडाळकर जमा आणि खर्च याचा समतोल विसरले. संघटनेत, संघटनेतल्या माणसांत जी गुंतवणूक केली आहे, तिच्या व्याजावर, कृतज्ञतेच्या भावनेने हे सारे चालावे, असे त्यांना वाटत असे. पण २००४ नंतर उतरण वेगाने होऊ लागली आहे. सर्वोच्च बिंदू गाठल्यानंतर तिथे मुक्काम थोडाच घडणार. उतरण ही अटळ होती.

काळाच्या सावध हाका

तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या राजकारणाचे संदर्भ बदलले होते. त्यांचे मित्र, त्यांचा मित्रपक्ष म्हणून लागला, ‘मांडव आमचा, व-हाडी आम्ही, रुखवत आमचा आणि तुम्ही वरबाप कसे? हा प्रश्‍न त्यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘अंतिम शब्द कोणाचा’, या अनुषंगाने विचारला गेला. तोपर्यंत राष्ट्रवादीला वाटणारी काँग्रेसबद्दलची भीती संपली होती. राष्ट्रवादीने त्यातल्या त्यात शरद पवार- अजित पवार यांनी आपलेच पीक, आपलेच खळे, आपलीच रास आणि आपलीच सुगी, अशी द्वाही फिरवली.

२००७ साली विलासराव उंडाळकर यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शह दिला. २००५ साली ‘मोक्का’च्या केसमधून मोकळे झालेल्या पैलवान संजय पाटील यांनी आवळ्या भोपळ्याची मोट बांधून २००८ साली बाजार समितीत पॅनेल उभे करून उंडाळकरांच्या पॅनेलचा पराभव घडवला. २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत विलासराव उंडाळकर जिंकले खरे पण तो त्यांचा शेवटचा विजय होता. ती पराभवाची सुरुवात होती. काळाच्या सावध हाका त्यांनी ऐकल्या असत्या, तर पुढचे बरेच काही न घडते. पण ते घडले. उंडाळकरांना त्यांच्या मित्रांनी-विरोधकांनी दाबत दाबत फक्त कराड दक्षिण मतदारसंघापुरते मर्यादित केले. त्यांची कोंडी केली. ही कोंडी एकट्या त्यांची नव्हती, ती यशवंतराव चव्हाण स्कूलची होती…

स्टेट पॉवर विरोधात

राजकारणात जर-तर ला वाव नसतो. असे घडले असते, तर आणि तसे घडले नसते तर, असे म्हणून चालत नाही. पण कशामुळे काय घडले, याचा धांडोळा घेता येतो. उंडाळकरांची धाटणी, प्रकृती तशी अपराजित श्रेणीतील. पण त्यांना पराभवाने शिवले. मर्यादेपुढची तडजोड अमान्य केल्यानेच असे घडले. फेब्रुवारी २०११ साली त्यांच्यापुढे तडजोडीचा प्रस्ताव आला होता. त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते पृथ्वीराज चव्हाण. त्यांना राज्यात येऊन दोन-तीन महिने झाले होते. ते विधिमंडळाच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते. तसे सदस्य त्यांना व्हायचे होते. त्यासाठी चव्हाण यांनी लोकांमधून निवडून येण्याचा पर्याय अजमावून पाहिले. कराड दक्षिण मतदारसंघ त्यांच्यामते योग्य होता. त्यासाठी उंडाळकरांशी बोलणी करण्यात आली. उंडाळकरांनी कराड दक्षिणचा राजीनामा द्यायचा. त्याबदलीत त्यांना विधान परिषदेवर घेवून मंत्रिपद देण्याचा शब्द होता. अगोदर उंडाळकरांनी या प्रस्तावास संमती दिली. पण नंतर शब्द पाळला जाण्याची खात्री त्यांना वाटत नव्हती. दुसरे असे; खळं कायमचेच पैरेक-याच्या मालकीचे होण्याचा धोका वाटत होता. उंडाळकरांनी या प्रस्तावाला नकार दिला आणि त्यानंतर उंडाळकरांच्या राजकीय इतिहासाच्या कारकीर्दीत प्रथम ‘स्टेट पॉवर’ त्यांच्या विरोधात गेली.

संजय पाटलांचा मुद्दा

त्यानंतरचा कटू घटनाक्रम त्यांच्या स्वत:च्या आणि समर्थकांच्या स्मरणात राहील, असाच आहे. जाणकार लोक म्हणतात, ‘विलासकाकांनी ती तडजोड केली असती, तर पुढचे काहीच न घडते. उंडाळकरांच्या वाटचालीत एवढे व्हायला हवे होते. पण ते झाले नाही. अशा घटनांची यादी फार मोठी नसली तरी त्यात या आणखी दोन गोष्टींचा जरूर समावेश करावा लागेल. त्यातली पहिली संजय पाटील यांच्या बाबतीतील.

संजय पाटील यांचे वडील तुकाराम पाटील हे चांगले हाडाचे कार्यकर्ते. अनेक वर्षे ते विलासराव पाटील यांच्यासाठीही राजकीय काम करीत होते. आटके गावातील उंडाळकरांच्या सभांना ते उपस्थित असत. त्यांचा मुलगा संजय हा राजकारणात त्याच्या पैलवानी स्वभावाप्रमाणे कार्यरत होता. त्याची नोंद उंडाळकरांनी ‘बॅड बुक’मध्ये न करता, ‘अ‍ॅडजस्ट बुका’मध्ये करायला हवी होती. शरद पवार यांनाच आव्हान देणारे अनेक उदयनराजे त्यांच्या पार्टीत ‘अ‍ॅबसोर्ब’ होतात. तर आणि अनेक पैलवान रयत संघटनेत सामविष्ट झाले असतील, तर संजय पाटील अ‍ॅबसोर्ब होण्यात काय अडचण आहे, याचा अदमास उंडाळकरांना आला नाही. पुढे तर मग त्या व्यक्तिमत्त्वाला आणि घटना घडामोडींचा इतिहासच घडला.

दुसरा मुद्दा रेठरेकरांचा १९९०, १९९५, १९९९, २००४ आणि २००९ या पाच निवडणुकांत रेठ-याची धाकटी आणि थोरली पाती सत्तेच्या ताटात कधी कोशिंबीरीची, कधी पापडाची जागा व्यापून होते. २०१४ च्या निवडणुकीत त्यापैकी एका पात्याचा वापर उंडाळकरविरोधी मतांचे विभाजन करण्यासाठी केला गेला, ही एक मोठी चूक आणि अंधश्रद्धा होती. निवडणुकीचे निकाल, आकडेवाडी त्यावर झगझगीत प्रकाश टाकते.

तिसरा मुद्दा कृष्णा कारखान्याचा. त्याच्या २०१० सालच्या ऐतिहासिक सत्तांतराचा. उंडाळकर आणि त्यांची संघटना म्हणे हे सत्तांतर आमच्यामुळे झाले. त्यांच्या सहभागाने झाले हे खरे. पण केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे हे घडले हे मात्र साफ चूक. तो केवळ आणि केवळ लोकांनी घडवलेला बदल होता. संजय पाटील यांना अ‍ॅबसोर्ब न करणे, रेठरेकरांबद्दल चुकीचे गृहीतक आणि कृष्णा कारखान्यातील सत्तांतर केवळ आणि केवळ रयत संघटनेमुळे झाले, या अंधश्रद्धेने अपराजित उंडाळकर पराजित झाले. हा पराभव त्यांचा एकट्याचा नव्हता, तर तो लोकांच्या संघटेनाचाही होता.

माणूस मोठा चिवट

उंडाळकर माणूस मोठा चिवट. ते फलटणचे कृष्णचंद्र भोईटे (1967 सालचे आमदार) नव्हते. केशवराव पाटीलही नव्हते (ते 1985 साली आमदारकीला खटावमधून पराभूत झाले. पुढची ३०-३२ वर्षे समाधानाचे आयुष्य जगले.) शामराव अष्टेकरसुद्ध नव्हते. (ते अनेक वर्षे माजी मंत्री आणि माजी आमदार. ‘चल मेरी स्कूटी’ ओळखले पाहिजे, अशी पोलिसांवरही सक्ती नव्हती.) हे विलासराव उंडाळकर. सुंभही तसाच आणि पीळही तसाच. राजकारणात सगळेच दिवस आपल्या सोयीचे आणि वाईटही नसतात. काळ हे त्यावरचे उत्तम औषध.

देशातली, राज्यातली, तालुक्यातील परिस्थिती झपाट्याने बदलेल. आपले मुद्दल अजून शिल्लक आहे. मग कच खाऊन कसे चालेल. ८ ते ९ हजार मतांचे रान नापायचे. त्यासाठी उंडाळकर यांची साधना-आराधना सुरू होती. अगोदर सांगितल्याप्रमाणे म्हणजे ते कृष्णचंद्र भोईटे नव्हते, केशवराव पाटील नव्हते, श्याम अष्टेकर नव्हते. त्यांच्यापुढे सा.रे.पाटील, गणपतराव देशमुख यांचे उदाहरण आणि आदर्श असावा. त्याचमुळे आपण अजून मैदान सोडलेले नाही, हा संदेश ते अखेरपर्यंत देत राहिले

(लेखक सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00