Home » Blog » Vidarbha : विदर्भाला मोठ्या आघाडीची संधी

Vidarbha : विदर्भाला मोठ्या आघाडीची संधी

मुंबईच्या पहिल्या डावामध्ये ७ बाद १८८ धावा

by प्रतिनिधी
0 comments
Vidarbha

नागपूर : विदर्भाच्या संघाला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये मुंबईविरुद्ध पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. मंगळवारी, विदर्भाचा पहिला डाव ३८३ धावांत आटोपल्यानंतर दुसरा दिवस संपेपर्यंत मुंबईची अवस्था पहिल्या डावामध्ये ७ बाद १८८ अशी झाली होती. मुंबईचा संघ अद्याप १९५ धावांनी पिछाडीवर आहे. (Vidarbha)

नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर सुरू असणाऱ्या या सामन्यामध्ये विदर्भाने पहिल्या दिवशी ५ बाद ३०८ धावा केल्या होत्या. मंगळवारी सुरुवातीच्या २० षटकांमध्ये विदर्भाने या धावसंख्येत ७५ धावांची भर घातली. यश राठोडने दुसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावताना ११३ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह ५४ धावा केल्या. मुंबईकडून शिवम दुबेने ४९ धावांत ५, तर रॉयस्टन डायस आणि शम्स मुलाणी यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. त्यानंतर, फलंदाजीस उतरलेल्या मुंबईला दमदार सुरुवात करता आली नाही. सलामीवीर आयुष म्हात्र केवळ ९ धावा करून परतला. आकाश आनंद आणि सिद्धेश लाड यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. (Vidarbha)

मुंबईने चाळीस षटकांअखेर २ बाद ११३ धावा केल्या होत्या. परंतु, ४१ व्या षटकात विदर्भाच्या पार्थ रेखाडेने तीन विकेट घेत मुंबईची स्थिती ५ बाद ११३ अशी केली. रेखाडेने या षटकातील पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे कर्णधार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांना बाद केले. यांपैकी रहाणेने १८ धावा केल्या, तर सूर्यकुमार व शिवम शून्यावर बाद झाले. पुढच्याच षटकात शम्स मुलाणीही ४ धावांवर बाद झाल्यामुळे मुंबईच्या ६ बाद ११८ धावा झाल्या होत्या. आकाश आनंदने शार्दुल ठाकूरसह सातव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचून मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दिवसाचा खेळ संपण्यास तीन षटके शिल्लक असताना शार्दुल ३७ धावांवर बाद झाला. खेळ थांबला, तेव्हा आकाश १७१ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह ६७, तर तनुष कोटियन ५ धावांवर खेळत होता. (Vidarbha)

दुसऱ्या सामन्यामध्ये केरळने गुजरातविरुद्ध दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावामध्ये ७ बाद ४१८ धावा केल्या आहेत. केरळतर्फे महंमद अझरुद्दीनने नाबाद शतक साजरे करताना ३०३ चेंडूंमध्ये १७ चौकारांसह १४९ धावांची खेळी केली. 

संक्षिप्त धावफलक : विदर्भ – पहिला डाव १०७.५ षटकांत सर्वबाद ३८३ (ध्रुव शौरी ७४, दानिश मालेवार, यश राठोड ५४, शिवम दुबे ५-४९, रॉयस्टन डायस २-४८) विरुद्ध मुंबई – पहिला डाव ५९ षटकांत ७ बाद १८८ (आकाश आनंद खेळत आहे ६७, शार्दुल ठाकूर ३७, सिद्धेश लाड ३५, पार्थ रेखाडे ३-१६, यश ठाकूर २-५६).

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00