कोल्हापूर : प्रतिनिधी : चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ संघ पराभूत झाला. वेताळमाळ तालीम मंडळाने त्यांचा टायब्रेकरमध्ये ३-१ असा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Vetalmal)
शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी आघाडीसाठी जोरदार प्रयत्न केले. पण त्यामध्ये शिवाजी संघाला यश आले. त्याच्या खुर्शीद अलीने ३२ व्या मिनिटाला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच स्थिती मध्यंत्तरापर्यंत कायम राहिली. (Vetalmal)
उत्तरार्धात परतफेड करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेताळमाळ संघाला अवघ्या दुसऱ्याच मिनिटात यश मिळाले. ४२ व्या मिनिटाला राहूल पाटीलने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघांनी सामन्यात परत आघाडी घेण्यासाठी जोरदार चढाया केल्या. पण अचूक समन्वयाअभावी दोन्ही संघ गोल करु न शकल्याने पूर्णवेळेत सामना बरोबरीत राहिला. (Vetalmal)
सामना बरोबरीत राहिल्याने मुख्य पंचानी टायब्रेकरचा अवलंब केला. त्यामध्ये वेताळमाळ संघाने बाजी मारली. त्यांच्या श्रीकांत माने, प्रणव कणसे, मणीकंदन यांनी अचूक पेनल्टी मारल्या. तर शिवाजी संघाच्या बसंता सिंग, योगेश कदम, दिग्विजय सुतार यांचे फटके वेताळमाळच्या गोलरक्षक विशाल कुरणेने रोखले. देवराज मंडलिकने शिवाजी संघाकडून एकमेव पेनल्टी मारली. टायब्रेकरमध्ये वेताळमाळ संघाने ३-१ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तीन पेनल्टी रोखणारा वेताळमाळ संघाचा गोलरक्षक विशाल कुरणे याची सामनावीर म्हणून निवड झाली. (Vetalmal)
रेडकार्डचा फटका शिवाजीला बसला
उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात शिवाजी आणि पाटाकडील तालीम मंडळ संघाच्या खेळाडूमध्ये जोरदार राडा झाला. मुख्य पंचांनी या सामन्यात दोन्ही संघाच्या नऊ खेळाडूंना रेडकार्ड दाखवले होते. त्यामध्ये शिवाजी संघाच्या पाच खेळाडूंचा समावेश होता. पाचही खेळाडू आजच्या सामन्यात मैदानात उतरु न शकल्याने शिवाजी संघाला आजच्या सामन्यात फटका बसला. (Vetalmal)
सोमवारचा सामना : खंडोबा तालीम मंडळ वि. सम्राटनगर स्पोर्टस्, दुपारी ४ वा.
हेही वाचा :