कर्जत जामखेड : प्रतिनिधी : अहिल्यानगर येथे झालेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या वेताळ शेळकेने मुंबई उपनगरच्या पृथ्वीराज पाटीलचा पराभव करत मानाची चांदीची गादी पटकावली. कर्जतचे आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्ती संघाच्यावतीने ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. खासदार शरद पवार यांच्या हस्ते वेताळ शेळकेला चांदीची गदा देण्यात आली. यावेळी आमदा रोहित पवार आणि मान्यवर उपस्थित होते. (Vetal Shelake)
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत गादी विभागातून पृथ्वीराज पाटील तर माती विभागातून वेताळ शेळके अंतिम फेरीत दाखल झाले. रविवारी सायंकाळी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही मल्लांमध्ये सलामी देण्यात आली. दोन्ही मल्लांनी सुरवातीपासून गुण वसूल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पृथ्वीराज पाटील आणि वेताळ शेळके या दोघांनी सुरवातीला एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. वेताळ शेळकेने नकारात्मक खेळ केल्याने पंचांनी पृथ्वीराज पाटीलला पंचांनी एक गुण बहाल केला. (Vetal Shelake)
पृथ्वीराजने १-० अशी बढत घेतल्यानंतर वेताळ आक्रमक झाला. दोघांची कुस्ती सोडवल्यानंतर बेसावध असलेल्या पृथ्वीराजला बाहेर ढकलत वेताळने दोन गुण वसूल केले. पंचांच्या निर्णयावर पृथ्वीराजने आक्षेप घेतला. त्यानंतर पुन्हा कुस्ती सुरू झाली. वेताळने पृथ्वीराजचा ताबा मिळवत दोन गुण वसूल करत ४-१ अशी घसघशीत आघाडी घेतली. बरोबरी साधण्यासाठी पृथ्वीराजने वेताळचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण वेळेत वेताळने बचाव करत पृथ्वीराजला गुण वसूल करुन देण्याची संधी दिली नाही. पूर्णवेळेत ४-१ अशी आघाडी मिळवत वेताळ शेळकेने महाराष्ट्र केसरीच्या गदेवर नाव कोरले. वेताळ शेळके हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे टेभुर्णी गावचा आहे. प्रशिक्षक काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो. (Vetal Shelake)
अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या उपांत्य लढतीत गादी विभागात पृथ्वीराज पाटीलने नांदेडच्या शिवराज राक्षेचा पराभव केला. तर माती विभागात वेताळ शेळकेने अकोल्याच्या प्रशांत जगतापचा पराभव केला. (Vetal Shelake)
हेही वाचा :