वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘जन्मसिद्ध नागरिकत्व’ संपुष्टात आणण्याचा वटहुकूम जारी केला. या वटहुकूमाचा धसका तेथील भारतीय गर्भवतींनी घेतला आहे. वटहुकुमानुसार, ग्रीनकार्डधारक नसणाऱ्या पालकांच्या २१ फेब्रुवारीनंतर जन्मणाऱ्या आपत्यांना ‘जन्मसिद्ध नागरिकत्त्व’ मिळणार नाही. त्यामुळे आताच आमचे सिझेरियन (सी-सेक्शन) करा, अशी विनंती तेथील अनेक गर्भवती करत आहेत. (US citizenship)
धक्कादायक म्हणजे सी-सेक्शनची निवड करणाऱ्या या स्त्रिया प्रामुख्याने आठ किंवा नऊ महिन्याच्या गर्भवती आहेत. काही सात महिन्यांच्या गर्भवती आहेत. प्रसूतीला काही आठवडे बाकी आहेत, अशाही काही महिला सी सेक्शन करण्याची विनंती करत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. न्यू जर्सी येथील प्रसूती क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या डॉ. एस. डी. रामा यांनी सांगितले, ‘मुदतीआधी प्रसूती करण्यासाठी अनेक महिला विनंती करत आहेत. नुकतीच सात महिन्यांची एक गर्भवती पतीसोबत आली होती. तिची प्रसूती मार्चमध्ये अपेक्षित आहे. मात्र सिझेरियन करण्याची विनंती या महिलेने केली.’ आणखी एक फायनान्स प्रोफेशनल एच१-बी व्हिसाधारक आहे. ‘आम्हाला या मुदतीनंतर मूल झाल्यास सगळे काही विस्कळीत होईल. आम्ही येथे येण्यासाठी आधीच खूप काही सोसले आहे, त्याग केला आहे. या वटहुकुमाने आमची दारे बंद झाल्यासारखे वाटते,’ अशी भीती त्याने व्यक्त केली.(US citizenship)
टेक्सासमधील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. एस. जी. मुक्काला यांनी मुदतपूर्व प्रसूती करणाऱ्या जोडप्यांना आरोग्यविषयी इशारा दिला आहे. ‘ही मोठी जोखीम आहे. कारण पूर्ण वाढ न झालेल्या मुलांची फुफ्फुसे अविकसित असतात. कमी वजन, न्यूरोलॉजिकल गुंतागुंत आणि स्तनपानाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती करू नका, असा माझा सल्ला आहे. गेल्या दोन दिवसांत मी १५ ते २० जोडप्यांशी याबाबत बोललो आहे,’ असे मुक्काला यांनी सांगितले. (US citizenship)
काय आहे वटहुकूम?
एका पालकाकडे अस्थायी स्वरूपाचा व्हिसा असेल व दुसरा पालक ग्रीनकार्डधारक नसेल, तर जन्मणाऱ्या अपत्यास जन्मसिद्ध नागरिकत्व मिळणार नाही. वटहुकूमाच्या तारखेपासून एका महिन्यानंतर जन्मणाऱ्या अपत्यांनाही हा नियम लागू होणार आहे. सध्या अमेरिकेतील नोकरीदात्या कंपनीमार्फत ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी दशकभराहून अधिक काळ प्रतीक्षा करणाऱ्या अनिवासी भारतीयांना या वटहुकुमाचा फटका बसणार आहे. अशाप्रकारच्या अनिवासी भारतीयांची संख्या सध्या अमेरिकेत दहा लाखांहून अधिक आहे. एच-१ बी, एल (इंट्रा-कंपनी), एफ (विद्यार्थी) या प्रकारचे व्हिसाधारकांचाही समावेश असणार आहे.
ट्रम्प यांच्या या वटहुकुमामुळे परदेशातून अमेरिकेत आलेल्या अस्थायी व्हिसाधारकांच्या मुलांना २१ वर्षे पूर्ण होताच देश सोडावा लागू शकतो. अन्यथा त्यांना दुसऱ्या प्रकारच्या, उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. (US citizenship)
हेही वाचा :
ट्रम्प यांचा अनिवासी भारतीयांना दणका