Home » Blog » Urine power: या खेड्यात लोक करतात मूत्रदान!

Urine power: या खेड्यात लोक करतात मूत्रदान!

गावातील मूत्र एकत्र करून त्याचा वापर…

by प्रतिनिधी
0 comments
Urine power

व्हरमाँट (अमेरिका) : बेट्सी विल्यम्स या गेली दोन दशकांहून अधिक काळ एक निसर्गस्नेही उपक्रम राबवतात. तो म्हणजे आपले मूत्र त्या वाया जाऊ देत नाहीत. तो काळजीपूर्वक एकत्र करतात. त्यांचे शेजारीही विल्यम्स यांचाच कित्ता गिरवतात. आता अमेरिकेच्या व्हरमाँटमध्ये ही एक चळवळ झाली आहे. या खेड्यातील शेतकरीही आता तसेच करू लागले आहेत. त्यांचे मूत्र काळजीपूर्वक गोळा करतात. त्यासाठी त्यांनी साठवण टाक्याही तयार केल्या आहेत…(Urine power)

ही मूत्रदानाची चळवळ कशासाठी आणि कशी गतिमान झाली?…

त्याला कारण एकच… या परिसरातील शेतकऱ्यांना आपली शेती वाचण्याबरोबरच ती उत्तम प्रकारे पिकवायची आहे. शाश्वत शेतीच्या दिशेने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. मानवी मूत्राचा वापर ते आता पिकांसाठी खत म्हणून करीत आहेत. त्याचे परिणामही चांगले येत आहेत.

‘‘आपल्या मूत्रामध्ये पिकांसाठी अनेक पोषक घटक आहेत. ते आम्ही वाया घालवत होतो. आता त्यासंबंधीची जाणीव लोकांमध्ये निर्माण झाली आहे. म्हणून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी आम्ही पावले उचलली,’’ असे विल्यम्स सांगतात. मानवी मूत्रातील पोषक घटक आपल्यासाठी आणि प्राण्यांसाठी अन्न तयार करण्यासाठी मदत करतात. म्हणून माझ्या मते, ते तार्किक आहे, असे त्या सांगतात. (Urine power)

साठवण प्रक्रिया

विल्यम्स व्हरमाँटमधील रिच अर्थ इन्स्टिट्यूट (REI) या ‘ना-नफा ना तोटा’ तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या युरिन न्यूट्रिएंट रिक्लेमेशन प्रोग्राम (UNRP) मधील कार्यकर्ती आहेत. त्या आणि विंडहॅम काउंटीमधील त्यांचे २५० सहकारी दरवर्षी एकूण १२,००० गॅलन (४५,४०० लिटर) मूत्र या कार्यक्रमासाठी जमा करतात, दान करतात. जेणेकरून पिकांसाठी त्याचा पुनर्वापर केला जाऊ शकेल किंवा ‘‘प्रयोग’’ केले जाऊ शकतील. (Urine power)

विंडहॅम काउंटीत मूत्र जमा करण्यासाठी एक लॉरी ठेवण्यात आली आहे. त्यात मूत्र जमा केले जाते. त्यानंतर ते एका मोठ्या टाकीमध्ये नेले जाते. तिथे ते ८०C (१७६F) वर ९० सेकंदांसाठी गरम करून पाश्चराइज केले जाते. नंतर ते पाश्चराइज्ड टाकीमध्ये साठवले जाते. त्यानंतर ते स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकांसाठी योग्यवेळी खत म्हणून वापरण्यासाठी किंवा शेतजमिनीवर फवारण्यासाठी दिले जाते. (Urine power)

प्राचीन चीन आणि प्राचीन रोममध्ये पिकांच्या जोमदार वाढीसाठी मूत्राचा वापर केला जात असे, अशा नोंदी आहेत. पिकांसाठी मूत्रांचा वापर केल्यामुळे खत न घालताही किंवा अगदी कमी कस असलेल्या जमिनीतही पिके चांगली येतात, उत्पादनही चांगले येते, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

मूत्र आणि कृत्रिम नायट्रोजन

मूत्रामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरसही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पिकासाठी ते महत्त्वाचे साधन आहे. अनेक पारंपारिक पद्धतीत कृत्रिम खतांमध्ये तेच पोषक घटक असतात. परंतु ही कृत्रिम खतामुळे पर्यावरणाची हानी होते. नायट्रोजन जीवाश्म इंधन-केंद्रित हॅबर-बॉश प्रक्रियेचा वापर करून तयार केले जाते. फॉस्फरसच्या उत्खननातून हानिकारक प्रमाणात विषारी कचरा निर्माण होतो. उलट, मानवी मूत्र मुक्तपणे उपलब्ध आहे. विल्यम्स म्हणतात त्यानुसार, ‘‘प्रत्येकजण लघवी करतो. (ते) एक न वापरलेले संसाधन आहे.’’ (Urine power)

प्रा. नॅन्सी लव्ह गेली दशकभर ‘आरइआय’ टीमसोबत काम करतात. त्या मिशिगन विद्यापीठातील सिव्हिल आणि पर्यावरण अभियांत्रिकी विभागात काम करतात. त्यांना असे आढळून आले आहे की मानक कृत्रिम खताऐवजी मूत्र वापरल्याने हरितगृह वायू उत्सर्जन कमी होते. पाणीही जवळपास निम्म्या प्रमाणात कमी लागते.

जेव्हा मूत्रावर प्रक्रिया केली जाते तेव्हा त्यातील नायट्रोजन आणि फॉस्फरस सांडपाण्यापासून पूर्णपणे काढून टाकले जात नाहीत. जेव्हा हे पोषक तत्त्व नद्या आणि तलावांमध्ये जातात तेव्हा ते शैवाल शोषून घेतात. याचा परिणाम म्हणजे जलमार्गांना अडवून टाकणारे शैवाळ वाढते, त्यामुळे परिसंस्थेचे असंतुलन निर्माण होते आणि तेथील इतर प्रजातींसाठी मारक ठरते. (Urine power)

प्राचीन रोम आणि चीनमध्ये मूत्राचा वापर खत म्हणून केला जात असे. आता व्हरमाँटमधील शेतकरी पीक वाढवण्यासाठी आणि अधिक शाश्वत पीक पद्धतीकडे जाण्यासाठी ही पद्धत पुन्हा आणत आहेत.

पोषक घटक-तत्त्वे…

‘‘आपल्या शरीरात भरपूर पोषक तत्त्वे तयार होतात. सध्याच्या आपल्या लाईफस्टाईलमुळे ती केवळ वायाच जात नाहीत; तर प्रत्यक्षात अनेक समस्या निर्माण करत आहेत. आणि जलप्रवाहांना हानी पोहोचवत आहेत,’’ असे आरईआयच्या कार्यकारी संचालक जमिना शुपॅक सांगतात.

‘‘हे पोषक घटक शैवाळांबरोबरच पिकांसाठीही अन्न ठरतात. ‘‘तुम्ही जिथे नायट्रोजन टाकाल तिथे ते वनस्पती वाढण्यास मदत होते. म्हणून ते पाण्यात टाकले तर शैवाळ वाढण्यास मदत करेल. पण जर ते जमिनीवर टाकले तर वनस्पती (पिके) वाढण्यास मदत करेल,’’ असे शुपॅक स्पष्ट करतात. यामुळे, पोषक तत्वांनी समृद्ध मूत्र जलमार्गांत जाऊ देता कामा नयेत. ते साठवून त्याचा वापर शेतीसाठी केल्यास जलमार्गाचे प्रदूषण कमी होईल आणि शेतकऱ्यांना अन्न पिकवण्यास मदत होऊ शकेल, असे त्या सांगतात. (Urine power)

महत्त्वाचे म्हणजे, आरईआय टीम आणि त्यांच्यासोबत काम करणारे शेतकरी मूत्र वाया जाणार यासाठी पावले उचलत आहेत. मूत्र शेतीसाठी वापरले जाईल याची काळजी ते घेत आहेत जेणेकरून पिकांचे योग्य पोषण होईल. पिके अधिक जोमाने येण्याची वेळ असते त्यावेळी ते मूत्र फवारतात.

शेतकऱ्यांत जागृती

शेतकऱ्यांमध्ये यासंदर्भात चांगलीच जागृती झाली आहे, पण हे काम व्यापक प्रमाणात वाढवण्याचे आव्हाने आहेत. शुपॅक सांगतात की, व्हरमाँटमध्ये शेतकऱ्यांची पिकांसाठी मूत्राची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे. परंतु संकलन वाढवणे अवघड आहे. नियमन अडथळा निर्माण करू शकते. अर्थात यातूनही काही मार्ग निघेल, असे त्या सांगतात. त्यामुळे ही संस्था या व्यापक चळवळीविषयी खूपच आशादायी असल्याचे दिसते. (Urine power)

(सौजन्य : बीबीसी)

हेही वाचा :

न्यूयॉर्कला जाणारे विमान पुन्हा मुंबईकडे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00