Home » Blog » Tulsi Gabbard Interview एका नॅरेटिव्ह निर्मितीचा प्रयोग

Tulsi Gabbard Interview एका नॅरेटिव्ह निर्मितीचा प्रयोग

अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स संचालक तुलसी गबार्ड यांच्या मुलाखतीतून एक फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न स्मिता प्रकाश यांनी केला.

by प्रतिनिधी
0 comments
Tulsi Gabbard ANI Interview

रवी आमले

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेबाबत काय बोलावे? विद्यमान केंद्र सरकारचे मुखपत्र असल्याप्रमाणे ही संस्था काम करीत आहे. खरे तर याबद्दल या एकट्या वृत्तसंस्थेला दोष देण्याचे कारण नाही. हा विकार आता मुख्य धारेतील अनेक माध्यमांना, त्यातही विशेषतः वृत्तवाहिन्यांना जडलेला आहे. असे असले, तरी या एएनआयची दखल घेण्याचे कारण म्हणजे, अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स संचालक तुलसी गबार्ड यांची या वाहिनीच्या मालकिणबाई स्मिता प्रकाश यांनी घेतलेली मुलाखत. अनेक विषयांवर त्यात तुलसी गबार्ड बोलल्या. त्यात येथे प्रस्तुत आहे, तो त्यांना स्मिताबाईंनी विचारलेला एक प्रश्न आणि त्यास तुलसीबाईंनी दिलेले उत्तर. हा प्रश्न होता भारतातील अलीकडच्या सार्वत्रिक निवडणुकांतील तथाकथित परकीय हस्तक्षेपाचा. (Tulsi Gabbard Interview)

निवडणुकीत परकीय हस्तक्षेप?

सध्या देशात असे एक नॅरेटिव्ह तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात परकीय शक्ती काम करीत आहेत. हे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये म्हणून या शक्ती प्रयत्नशील आहेत. या शक्ती कोण आहेत? त्यात आघाडीवर आहे जॉर्ज सोरोस यांचे नाव. त्यांच्या निधीवर चालणारी स्वयंसेवी संस्था भारतात काँग्रेससाठी काम करते असा भाजपच्या जल्पकांचा – त्यात नेतेही आले – आरोप असतो. गेल्या महिन्यात त्यात शक्तींच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले. `यूएसएड`चे. (Tulsi Gabbard Interview)

ट्रम्प यांची फेकाफेकी

यूएसएड म्हणजे ‘युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेन्ट’. तिने भारतातील निवडणुका प्रभावित करण्यासाठी २१ मिलियन (२.१ कोटी) डॉलर दिल्याचा आरोप झाला. तो करणारे होते खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. १९ फेब्रुवारीला त्यांनी जाहीर सवाल केला, की ‘भारतातील मतदान वाढावे यासाठी आपण २१ मिलियन डॉलर खर्च करण्याची काय गरज आहे? मला वाटते दुसऱ्या कोणाला तरी निवडून आणायचा त्यांचा (म्हणजे बायडेन प्रशासनाचा) प्रयत्न होता.’ यावरून काँग्रेसच्या विरोधकांनी मोठे रान पेटवले. वृत्तवाहिन्यांच्या स्टुडिओत तर विखाराचे वणवे पेटले.

वस्तुतः हे ट्रम्प महाशय काही खरे बोलण्यासाठी प्रसिद्ध नाहीत. त्यांनी केलेला हा आरोपही खोटा होता. तो खोटा पाडला खुद्द ट्रम्प यांनीच. २१ फेब्रुवारीला त्यांनी जाहीर केले, की हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले होते. ‘मतदान वाढीसाठी माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतास २१ मिलियन डॉलर जात आहेत,’ हे त्यांचे तेव्हाचे उद्‌गार. त्यातून स्पष्ट झाले की या ट्रम्प यांच्या बोलात बोल नाही. कधी ते म्हणताहेत ते पैसे अन्य कोणास निवडून आणण्यासाठी देण्यात आले होते. कधी म्हणतात ते मोदींना दिले. कधी म्हणतात ते २१ मिलियन डॉलर होते. कधी म्हणतात १९ मिलियन डॉलर. ही फेकूगिरी झाली. पर्यायी माध्यमांतील पत्रकारांनी, काँग्रेस समर्थकांनी ती लक्षात आणून देताच वृत्तवाहिन्यांनी मूग गिळले. तसेही त्यावरून काँग्रेसवर दुगाण्या झाडून झालेल्या होत्या. आता त्या विषयास पिळण्याची गरज राहिली नव्हती. पण विरोधी पक्ष परकीय शक्तींची मदत घेतात असा लोकानुबोध तर कायम करायचा होता. त्यासाठीचा एक प्रयत्न एएनआयने साळसूदपणे केला.

चलाखीचा प्रश्न…

स्मिता प्रकाश यांनी तुलसीबाईंना मोठ्या चलाखीने प्रश्न विचारला. अगदी एक डोळा बारीक करून त्यांनी सवाल टाकला, की मला हे विचारलेच पाहिजे, की ‘भारतातील सत्ताबदलाच्या प्रकरणात त्या (म्हणजे अमेरिकी गुप्तचरसंस्था) सहभागी होत्या का?’ त्यावर तुलसीबाई समजुतीचे हसल्या. मग उत्तरल्या, की ‘मी तुम्हाला हे सांगू शकते, की माझ्या माहितीनुसार… याचे उत्तर आहे – नाही.’ आता अगदी बालबुद्धी व्यक्तीलाही एवढी अक्कल तर असेलच, की अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे कोणी जाहीर मुलाखतीत देत नसते. तुलसी गबार्डच काय कोणतीही राजकारणी व्यक्ती काही – होय, होय, आमच्या गुप्तचरांनी केले होते भारतात सत्ताबदलाचे प्रयत्न – अशी कबुली देणार नसते. अगदी प्रयत्न केलेले असले, तरी तसे कोणी कबूल करीत नसते. त्याचा छडा आपण लावायचा असतो. तसा छडा कोणी लावल्याचे ऐकिवात नाही. तसे काही उघड झाले असते, तर त्या गुप्तचर संस्था वा सोरोस वा यूएसएड वा अन्य कोणी ज्या विरोधी नेत्यांना साह्य करीत होत्या, ते विरोधी नेते आज तुरूंगात दिसले असते. दिसायला हवे होते. तसे काहीही झालेले नाही. तेव्हा तो केवळ विरोधकांना बदनाम करण्याचा डाव आहे हे स्पष्ट दिसते आहे. (Tulsi Gabbard Interview)

स्मिता प्रकाश यांचा नो बॉल

राहता राहिला प्रश्न, एएनआयच्या मालकिणबाईंनी विचारलेल्या प्रश्नाचा. त्यांनाही याची जाणीव असणार, की आपल्या प्रश्नास नकारार्थीच उत्तर येणार. पण तरीही त्यांनी तो विचारला. याचे तार्किक कारण हेच दिसते, की तो सवाल म्हणजे एक नो-बॉल होता. तुलसीबाईंनी चुकून त्यावर एखादा षटकार लगावला असता, चुकून त्या म्हणाल्या असत्या, की – होय, सरकार बदलण्यासाठी अमेरिकेतील डीप स्टेटने हस्तक्षेप होता, तर… किमान आठ-पंधरा दिवस नॉयडातील स्टुडिओंमध्ये त्या-त्या वाहिन्यांच्या अँकर आणि अँकरणींनी तांडव केले असते. जल्पकांनी समाजमाध्यमांतून शिमगा केला असता. त्यांच्या दुर्दैवाने तुलसीबाईंनी हसून त्यास नकारार्थी उत्तर दिले. पण एवढ्याने हे संपणार नाही. उजवी टूलकिट गँग गप्प बसणार नाही. आज ना उद्या, ती पुन्हा हे परकीय हस्तक्षेपाचे हत्यार बाहेर काढील.

फेक नॅरेटिव्हचे नवे ‘तुलसी’ वृंदावन

मुद्दा असा, की आपल्याकडे हा परकीय हस्तक्षेप होत नाही का? होतो. यापूर्वी झालेला आहे. तेव्हा आज तो होत नाही, असे म्हणता येणार नाही. पण तसे म्हणायचे तर ते पुराव्यांनी म्हणावे लागेल. आज मोदींच्या सरकारी यंत्रणा एवढ्या बळकट आहेत, की त्यांना असे पुरावे शोधणे कठीण नाही. पण सरकारला त्यात रस असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच केवळ षड्‌यंत्र सिद्धांत पसरवणे, फुका लोकानुबोध निर्माण करणे हेच चालल्याचे दिसते. त्या यज्ञात तुलसीबाईंच्या हस्ते दोन चार पाने टाकण्याचा प्रयत्न होता, तो फोल ठरला. अन्यथा येथे फेक नॅरेटिव्हचे एक नवे ‘तुलसी’ वृंदावन उभे राहिले असते.

 (लेखक हे ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांची ‘परकीय हात’ आणि ‘रॉ’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00