वॉशिंग्टन : अमेरिकेच्या मुक्ती दिनाची घोषणा करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करधोरणाकडे साऱ्या जगाचे लक्ष होते. त्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेचा व्यापारी भागीदार असलेल्या देशांचे त्यांच्या या घोषणांकडे लक्ष होते. त्याच्या बातम्या भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी (३ एप्रिल) सकाळी जाहीर झाल्या. मात्र आता या करासंबंधीची एक बातमी लक्ष वेधून घेत आहे ती हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेटांवर लावलेल्या कराची.(Trump tariffs)
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक अमेरिकन व्यापार भागीदारांसाठी ज्यांच्यावर परस्पर शुल्क जाहीर केले त्यामध्ये ऑस्ट्रेलियन बाह्य प्रदेश असलेल्या हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेटांचा समावेश आहे. मात्र येथे मानवी वस्तीच नाही. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस रोझ गार्डनमधून भाषणादरम्यान करासंबंधीचा चार्ट जाहीर केला. या यादीत या बेटांचा समावेश आहे. या बेटांवर १०% शुल्क आकारण्यात आले आहे. (Trump tariffs)
हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेटे ही दक्षिण महासागरातील निर्जन अशी उपअंटार्क्टिक बेटे आहेत. येथे कायमस्वरूपी मानवी वस्तीच नाही. ती ऑस्ट्रेलियाद्वारे प्रशासित आहेत.
ट्रम्प यांच्या ‘या’ करधोरणाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. एका यूजरने म्हटले आहे : ‘ट्रम्प प्रशासनाने हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेटांवर १० टक्के कर लावला आहे…. जिथे लोकसंख्या शून्य आहे आणि तेथे केवळ पेंग्विन राहतात.’
“ट्रम्प प्रशासनाने हर्ड आयलंड आणि मॅकडोनाल्डवर १० टक्के कर लावला आहे, जिथे लोकसंख्याच नाही. फक्त पेंग्विन राहतात,” असे ‘एक्स’ वर आणखी एकाने म्हटले आहे. (Trump tariffs)
दुसऱ्या एका यूजरने, “हर्ड आणि मॅकडोनाल्ड बेटे पूर्णपणे निर्जन आहेत. लोकसंख्या शून्य आहे. मला वाटते की आपण सीगलवर कर लावणार आहोत?” असे ट्विट केले आहे.
दरम्यान, ट्रम्प प्रशासन किंवा व्हाईट हाऊसने हर्ड आयलंड आणि मॅकडोनाल्ड बेटांवर लावण्यात आलेल्या करांबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही. (Trump tariffs)
हर्ड आयलंड आणि मॅकडोनाल्ड बेटे अंटार्क्टिक खंडापासून अंदाजे १,७०० किमी अंतरावर आणि पर्थपासून ४,१०० किमी नैऋत्येस आहेत. ती ज्वालामुखीयदृष्ट्या सक्रिय उपअंटार्क्टिक बेटे आहेत. “जगातील दुर्मिळ नैसर्गिक बेट परिसंस्थांपैकी एक असलेली हर्ड आणि मॅकडोनाल्ड ही बेटे आहेत. येथे बाहेरील वनस्पती, प्राणी तसेच मानवी प्रभावाचा पूर्णपणे अभाव आहे,” असे ‘युनेस्को’च्या वेबसाइटने म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि चीनसह अनेक व्यापार भागीदारांवर लक्षणीय कर लादण्याचा निर्णय जाहीर केला.
हेही वाचा :
भारतातील टेक्स्टाईल, जेम्स ॲण्ड ज्वेलरी उद्योगांना फटका
मोदी मित्र, तरीही भारतावर २६ टक्के कर