Home » Blog » Trump : ट्रम्प यांचा अनिवासी भारतीयांना दणका

Trump : ट्रम्प यांचा अनिवासी भारतीयांना दणका

‘जन्मसिद्ध नागरिकत्वा’विषयीच्या वटहुकुमाने मुलांचे भवितव्य अधांतरी

by प्रतिनिधी
0 comments
Trump

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी अनिवासी भारतीयांना दणका दिला आहे. ‘जन्मसिद्ध नागरिकत्व’ संपुष्टात आणण्याचा वटहुकूमच ट्रम्प यांनी जारी केल्यामुळे अनिवासी भारतीयांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांचेही भवितव्य अधांतरी आहे. (Trump)

‘अमेरिकन नागरिकत्वाचा अर्थ आणि मूल्य यांचे रक्षण करण्यासाठी’ हा वटहुकूम काढल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून प्रचार करतानाच ट्रम्प ‘जन्मसिद्ध नागरिकत्व’ संपवण्याविषयी बोलत होते. तथापि, तेव्हा केवळ अनधिकृतरीत्या अमेरिकेत स्थलांतरित झालेल्यांच्या मुलांनाच अशाप्रकारचे नागरिकत्व दिले जाणार नाही, असा समज होता. एच-१ बी, एल (इंट्रा-कंपनी), एफ (विद्यार्थी) या प्रकारचे व्हिसाधारक यांपासून मुक्त असतील, असे अनिवासी भारतीयांना वाटले होते. त्यामुळे, अध्यक्ष होताच ट्रम्प यांनी काढलेल्या वटहुकुमामध्ये कायदेशीर व्हिसाधारकांचाही समावेश करण्यात आल्याने त्यांच्या मुलांच्या नागरिकत्वावर टांगती तलवार आहे. (Trump)

या वटहुकुमानुसार, एका पालकाकडे अस्थायी स्वरूपाचा व्हिसा असेल व दुसरा पालक ग्रीनकार्डधारक नसेल, तर जन्मणाऱ्या अपत्यास जन्मसिद्ध नागरिकत्व मिळणार नाही. वटहुकुमाच्या तारखेपासून एका महिन्यानंतर जन्मणाऱ्या अपत्यांनाही हा नियम लागू होणार आहे. सध्या अमेरिकेतील नोकरीदात्या कंपनीमार्फत ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी दशकभराहून अधिक काळ प्रतीक्षा करणाऱ्या अनिवासी भारतीयांना या वटहुकुमाचा फटका बसणार आहे. अशाप्रकारच्या अनिवासी भारतीयांची संख्या सध्या अमेरिकेत दहा लाखांहून अधिक आहे. (Trump)

ट्रम्प यांच्या या वटहुकुमामुळे परदेशातून अमेरिकेत आलेल्या अस्थायी व्हिसाधारकांच्या मुलांना २१ वर्षे पूर्ण होताच देश सोडावा लागू शकतो. अन्यथा त्यांना दुसऱ्या प्रकारच्या, उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. हा वटहुकुम काढण्याबरोबरच ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या दिवशी आणखीही काही वादग्रस्त निर्णय घेतले. त्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेतून (डब्ल्यूएचओ) अमेरिकेने बाहेर पडणे, पॅरिस हवामान परिषदेच्या सामंजस्य करारातून बाहेर पडणे आदी निर्णयांचा समावेश आहे. (Trump)

हेही वाचा :

अमेरिकेतील साडेसात लाख भारतीयांवर कुऱ्हाड

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00