बलुचिस्तान : बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) मंगळवारी (११ मार्च) प्रवासी रेल्वे हायजॅक केली. पाकिस्तान सरकारला या घटनेमुळे धक्का बसला आहे. बलुची बंडखोरांनी नैऋत्य पाकिस्तानातील एका मोक्याच्या ठिकाणी जाफर एक्स्प्रेस रोखली. तत्पूर्वी ट्रेनवर गोळीबार करण्यात आला. यात रेल्वेचालक जखमी झाला. टाइम्स ऑफ इंडियाने रॉयटर्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, २० लष्करी जवान ठार झाले असून, १८२ जणांना बंडखोरांनी ओलीस ठेवले आहे. (Train Hijack)
बंडखोरांनी शेकडो प्रवाशांना ओलीस ठेवल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे. बंडखोरांचा प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात काही लष्करी कर्मचारी ठार झाले. या घटनेत १०० हून अधिक प्रवाशांना ताब्यात ठेवले आहे, असे बलुच लिबरेशन आर्मीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
नऊ बोग्यांची ही जाफर एक्स्प्रेस सुमारे ४०० प्रवाशांना घेऊन बलुचिस्तानमधील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वा येथील पेशावरला जात होती. त्यावेळी बलुची बंडखोरांना गाडीवर हल्ला केला. (Train Hijack)
‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, पाकिस्तान रेल्वेने दीड महिन्याहून अधिक काळ निलंबित ठेवली होती. त्यानंतर क्वेटा आणि पेशावर दरम्यानची रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेला हा हल्ला पाकिस्तान सरकारसाठी धक्कादायक मानला जात आहे.
बीएलएच्या निवेदनानुसार, दहशतवादी गटाने १०० हून अधिक प्रवाशांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे कर्मचारी आहेत. ‘‘अपहरणकर्त्यांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवादविरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) चे सक्रिय कर्मचारी आहेत. हे सर्वजण रजेवर पंजाबला जात होते. या सैन्याने लष्करी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर सर्व ओलिसांना ठार करण्यात येईल,’’ असा इशाराही बीएलएने दिला आहे. (Train Hijack)
या कारवाईदरम्यान, बीएलएने महिला, मुले आणि बलुच प्रवाशांना सोडले आहे. उर्वरित सर्व ओलिस सैन्याचे कर्मचारी आहेत, असा त्यांचा दावा आहे.
जबाबदारी कोणी घेतली?
बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) या फुटीरतावादी गटाने एक निवेदन जारी करत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या गटाने सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ट्रेनमधून ओलिस ठेवल्याचा दावाही केला आहे.
बलुचिस्तान सरकारने आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या आहेत. ‘‘परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले आहे,’’ असे सरकारी प्रवक्ते शाहिद रिंद यांनी म्हटले आहे. (Train Hijack)
बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी गटांकडून दीर्घकाळापासून बंड सुरू आहे. त्यांनी सरकार, लष्कर आणि चिनी हितसंबंधांवर हल्ले केले आहेत. या गटांना या प्रांतातील वायू आणि खनिज संसाधनांमध्ये मोठा वाटा हवा आहे. या गटांपैकी सर्वांत मोठा असलेल्या ‘बीएलए’ची स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी आहे.
हेही वाचा :
भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठवली