Home » Blog » स्वतःचाच संघर्ष अनुभवण्यासाठी…

स्वतःचाच संघर्ष अनुभवण्यासाठी…

स्वतःचाच संघर्ष अनुभवण्यासाठी...

by प्रतिनिधी
0 comments
struggle file photo

-यशोधरा काटकर

तुम्ही अजून ‘या गोष्टीला नावच नाही’ बघितला की नाही? नसेल पाहिला तर लगेच बघून घ्या. सामाजिक आशयसघनता आणि कलात्मकता यांचा उत्तम समन्वय साधणारे चित्रपट निर्माण करणारे जब्बार पटेल, सुमित्रा भावे, उमेश कुलकर्णी ज्यांचं काम आपण अभिमानाने आणि आदराने दाखवू शकतो असे जे मोजके चित्रकर्मी मराठी चित्रपटसृष्टीत आहेत, त्यातलं संदीप सावंत हे महत्त्वाचं नाव आहे. या प्रत्येकाची कलाविषयक फिलॉसॉफी, दृष्टी आणि विशिष्ट अशी शैली आहे, संदीप त्यात इतका वेगळा आहे की या मांदियाळीमध्ये तो त्याच्या अनोख्या स्टोरीटेलिंग शैलीमुळे उठून दिसतो. त्याच्या अद्वितीय शैलीचं वर्णन – विश्लेषण माझ्या लेखी अशक्य, कारण मुळात ती अनुभवायची गोष्ट आहे.

त्याच्या चित्रपटात सामान्य माणसांची कथा सांगितली जाते हे तर खूपच सरळसोट विधान झालं पण तो ती कशी सांगतो हे बघणं महत्त्वाचं आहे. इथे तरीत बसून शहराच्या ठिकाणी कॉलेज शिक्षणासाठी आलेल्या, नवख्या वातावरणात बुजलेल्या मुकुंदचा एक वेगळाच संघर्ष आहे, तो अनेक परीने माझाही संघर्ष होता हे कदाचित तुम्हालाही आठवेल. संदीपच्या चित्रपटातले ‘अभिनेते’ हे अभिनेते नसतात, तर तुमच्याआमच्यासारखी कुठलाही स्टार व्हॅल्यू नसणारी नवखी माणसं तिथे उत्तम अभिनय करून जातात. ‘या गोष्टी’ मध्ये चित्रपटसृष्टीतला कोणीही अभिनेता नाही, पण कोल्हापूरच्या पोट्यानी काय काम केलंय म्हणून सांगू? मुक्याबरोबर असणारी रोहित, सचिन,  अमृता आणि बाकी कॉलेजियन्सची टोळी एकदम सही आणि खरी आहे. तसंच गावाकडच्या घरात असणारी त्याची आई आणि भाऊ यांनीही त्यांच्या परीने उत्तम कामगिरी केली आहे. चंद्रमौळी घरात पदर खोचून काम करणाऱ्या आईला माझा सलाम. आजारी लेकाकडे बघताना, अंधारलेल्या घराला कुलूप लावून निघताना त्यांच्या एकेका लुकसाठी आणि एका खास वाक्यासाठी हा चित्रपट पुन्हा बघावासा वाटतो. ते वाक्य कोणतं ते मी इथे सांगणार नाही. चित्रपट बघा, तुम्हीही दाद द्याल. मुक्याच्या भावाची व्यक्तिरेखाही अतिशय सुंदर लिहिली गेली आहे. या रांगड्या भावाच्या नुसत्या येण्यानेच कसा थरार निर्माण होतो ते बघा, त्याला दाद देण्यासारखे अनेक क्षण संदीपने जे काही पेरले आहेत ते थोरच आहेत. संदीपच्या चित्रपटातलं छायाचित्रण आणि पार्श्वध्वनी, फक्त पार्श्वसंगीत नव्हे पार्श्वध्वनीदेखील चित्तवेधक असतात. माझ्यासारखे लोक ते पार्श्वध्वनी एन्जॉय करण्यासाठी त्याचे ‘नदी वाहते ‘सारखे चित्रपट पुनःपुन्हा बघत-ऐकत असतात. ‘या गोष्टीला’ ही मी परत बघणार आहेच, कोई शक?

या चित्रपटाबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत पण त्या सगळ्या बाजूला ठेवा आणि थिएटरमध्येच चित्रपट बघा. ओटीटीवर यायची वाट बघू नका. हा ओटीटीचा चित्रपट नाहीये. मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्या दिशेने पुढे घेऊन जाणाऱ्या या अनोख्या कलाकृतीसाठी एवढा प्रतिसाद तर आपण दिलाच पाहिजे. तेव्हा बाजूला ठेवा ते भरजरी मनोरंजनाचे निर्बुद्ध चित्रपट आणि संदीप सावंत लिखित दिग्दर्शित ‘ या गोष्टीला नावच नाही’ बघायला धाव घ्या. उत्तम कलाकृतीचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला तिच्याकडे जावं लागतं, ती आपल्या दारात येऊन उभी राहत नसते,राव !तेव्हा नक्की बघा.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00