नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रांत एव्हीयन इन्फलुएंझा (एच१एन१) या विषाणूच्या बाधेमुळे तीन वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भीतीचे सावट पसरले आहे. सध्या या केंद्रांत १२ वाघ आणि २४ बिबटे आहेत. त्यांची तपासणी करण्यात आली आहे. ते सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गोरेवाड्यातील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने राज्यातील प्राणीसंग्रहालय आणि बचाव केंद्रांत या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Tiger’s death)
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकलातून ११ डिसेंबर २०२४ रोजी दोन वाघ आणि १६ डिसेंबला एक वाघ गोरेवाड्यातील बचाव केंद्रात स्थलांतरीत करण्यात आला. या तिनही वाघांचे पिंजरे एकमेकाला लागूनच होते. बिबट्या हा वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात होता. वाघांना स्थलांतरीत केल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी केली होती. त्यावेळी त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांच्यात एव्हीयन इन्फ्लुएंझा लक्षणेही दिसत नव्हती. मात्र ते थोडेफार लंगडत होते. त्यांचा आहारही कमी झाला होता. त्यानंतर त्यांच्या आरोग्य चाचण्या करण्यात आल्या. त्यांचे रिपोर्टही निगेटीव्ह आले होते. (Tiger’s death)
२०डिसेंबरला दोन वाघांचा आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून गेले. त्यानंतर २३ डिसेंबरला एका वाघाचा मृत्यू झाला. त्यानंतर गोरेवाड्यातील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात तपासणी करण्यात आली. त्यात वाघ आणि बिबट्याचा मृत्यू एव्हीयन इन्फ्लुएंझामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. मृत वाघ आणि बिबट्यांचे नमुने भोपाळ येथील आयसीएआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसिज येथे पाठवण्यात आले. त्यानंतर या संस्थेकडून २ जानेवारी २०२५ ला अहवाल आला. त्यातदेखील एव्हीएफ इन्फ्युएंझामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील सर्व प्राणीसंग्रहालय, बचाव आणि संक्रमण उपचार केंद्रात सतर्कतेचा इशारा दिला आहे.