कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील सत्ताधारी युतीतील पक्षाच्या ‘भाऊ’ने दसरा चौकात आयोजित केलेल्या प्रदर्शन आयोजकाकडे दोन लाखाची खंडणी मागितली. मात्र ती देण्यास आयोजकांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे या हँडलूम प्रदर्शनासाठी उभारलेल्या मंडपाचे खांब उचकटण्यात आले. त्यामुळे मंडप पडल्याची कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरू आहे. भाऊने खंडणीसाठी संयोजकांच्या आईबहिणींचा उद्धार केला. धमकीही दिली. तशी ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. एरव्ही फाळकूट दादांवर कारवाई करणारे पोलीस प्रशासन बड्या पक्षाचा नेता असलेल्या भाऊच्या गुंडगिरीवर गप्प असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. (Threats of extortion)
दसरा चौकात वर्षातून दोन ते तीन वेळा राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्लीतील कारागीर, विक्रेते, व्यापारी हँडलूम प्रदर्शन भरवतात. एकाच छताखाली विविध वस्तूंची विक्री या प्रदर्शनाच्या माध्यमातून केली जाते. पण ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे हँडलूम प्रदर्शनाकडे ग्राहकांचा ओढा कमी झाला आहे. प्रदर्शन भरवणाऱ्या आयोजकाचा खर्चही प्रदर्शनातून वसूल होत नाही. कसाबसा व्यवसाय करणाऱ्या या प्रदर्शन आयोजकांकडे भाऊने खंडणी मागितल्याची घटना उघड झाल्याने कोल्हापुरात संतापाची लाट उमटली आहे. (Threats of extortion)
सत्ताधारी राजकीय पक्षाच्या भाऊने प्रदर्शनाच्या आयोजकांकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणीसाठी भाऊने प्रदर्शनाच्या आयोजकाला फोन करुन धमक्या दिल्या. प्रदर्शनातून कमाईच नसल्याने काकुळतीला आलेल्या आयोजकाने आपल्याकडे खंडणी देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या भाऊने प्रदर्शनाच्या आयोजकाला अर्वाच्च शिविगाळ केली. हात, पाय तोडण्याची धमकी दिली. (Threats of extortion)
दरम्यान दोन दिवसापूर्वी प्रदर्शनाची मुदत संपल्यानंतर आयोजकांकडून मंडप काढण्याचे काम सुरू होते. प्रदर्शनात वस्तू मांडणारे विक्रेतेही ट्रक, टेंपोमध्ये वस्तू भरत असताना अचानक मंडपाना आधार देण्यासाठी जे लोखंडी क्रॉस लावतात ते काढण्यात आल्याने मंडप कोसळला. त्यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी वस्तूंची मोडतोड झाल्याने विक्रेते आणि आयोजकांचे मोठे नुकसान झाले. मंडप अचानक कसा कोसळला? याची चर्चा सुरू असतानाच भाऊच्या धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. धास्तावलेल्या व्यावसायिकांनी पोलिसांकडे कोणतीही तक्रार न देता कोल्हापुरात पुन्हा पाय न ठेवण्याचा निर्णय घेऊन शहरातून काढता पाय घेतला.
व्यावसायिक, उद्योजकांनाही त्रास
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात परप्रांतीय व्यावसायिक, उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांना राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून खंडणीसाठी, वर्गणीसाठी सातत्याने धमक्या दिल्या जातात. वर्गणी आणि खंडणीच्या त्रासाला उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक त्रासून गेले आहेत. धमकीचे कॉल सोशल मीडियावर व्हायरल होऊनही तक्रार नसल्याने पोलिसही कारवाई करत नाहीत. पोलिसांनी स्वत:हून धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
संबंधित घटना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे असे दिसून येते. धमकी आणि खंडणीबाबत तक्रार दाखल झालेली नाही. तरीही लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षकांकडून माहिती घेतल्यानंतर कारवाईसंदर्भात निर्णय घेतला जाईल.
– अजित टिके, डीवायएसपी
पोलिस अधीक्षकांनी कारवाई करावी : आमदार सतेज पाटील
दरम्यान] खंडणीच्या घटनेवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून अशा प्रकारांना आळा घातला पाहिजे, अशी मागणी केली. सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्याकडून खंडणी आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, असे पाटील म्हणाले.
हेही वाचा :