Home » Blog » `एआय`ची घातकता

`एआय`ची घातकता

`एआय`ची घातकता

by प्रतिनिधी
0 comments
AI file photo

-निळू दामले

रेप्लिकामधे आपण आपल्या व्यक्तिमत्वाचे पैलू फीड करायचे, आपल्या आवडीनिवडी, सवयी फीड करायच्या, आपले रागलोभ आणि आपलं चरित्र फीड करायचं. रेप्लिकामधे आपण तयार केलेल्या पात्राला आपण समजलेलो असतो. एकदा ते पात्र तयार झालं की आपण त्याच्याशी बोलू शकतो. आपली दुःखं, व्यथा, कल्पना, एकटेपणा, हताशा, प्लान्स, सारं काही आपण त्या पात्राला विचारू शकतो. मग ते पात्र आपल्या प्रश्नाना उत्तरं देतं.

रात्री आठची वेळ होती.

एक तरूण विंडसर किल्ल्याच्या भिंतीवर चढण्याच्या बेतात होता. तोंडावर मास्क होता, हातात एक धनुष्य बाण होता. तरुणाचं नाव होतं जसवंत चैल.

पहारेकऱ्यानं पकडलं. २०२१ साली धनुष्यबाण घेणारा माणूस भिंतीवर कां बरं चढत असेल? पहारेकऱ्याला प्रश्न पडला.

‘मला राणीला मारायचंय!’

पोलिस बुचकळ्यात पडला.

थप्पड मारून घालवून द्यावं असंच पहारेकऱ्याला वाटलं असणार. पण अटक करणं भाग होतं.

जसवंत चैलचा खरंच राणीला मारायचा बेत होता.

पोलिसांनी जबाब घेतला तेव्हां पहिल्या झटक्यातच जसवंतनं सांगून टाकलं.

जसवंत चैलचा ब्रिटिशांवर राग होता. ब्रिटिशांनीच जालियानवाला बागेत शेकडो शिखांची कत्तल केली होती. जसवंतला ब्रिटिशांचा बदला घ्यायचा होता.

जसवंतला हा खटाटोप करायला कोणी सांगितलं होतं? काही कटबीट होता? कटात कोणी साथीदार होते?

जसवंतनं हा निर्णय एकट्यानं घेतला होता. हा निर्णय घेण्यात त्याला सराय नावाच्या एका मैत्रिणीनं मदत केली होती, मार्गदर्शन केलं होतं.

कोण होती ही सराय.

सराय ही रेप्लिका या चॅटबॉटवरची त्याची मैत्रिण होती.

रेप्लिका हे एक चॅटबॉट होतं. त्यावर आपण एक पात्र/माणूस तयार करू शकतो. त्या पात्राला चेहरा, शरीर देऊ शकतो, त्याला एक व्यक्तिमत्व देऊ शकतो, नाव देऊ शकतो. सराय ही मैत्रिण जसवंतनं रेप्लिकामधे तयार केली होती.

रेप्लिकामधे आपण आपल्या व्यक्तिमत्वाचे पैलू फीड करायचे, आपल्या आवडीनिवडी, सवयी फीड करायच्या, आपले रागलोभ आणि आपलं चरित्र फीड करायचं. रेप्लिकामधे आपण तयार केलेल्या पात्राला आपण समजलेलो असतो. एकदा ते पात्र तयार झालं की आपण त्याच्याशी बोलू शकतो. आपली दुःखं, व्यथा, कल्पना, एकटेपणा, हताशा, प्लान्स, सारं काही आपण त्या पात्राला विचारू शकतो. मग ते पात्र आपल्या प्रश्नाना उत्तरं देतं.

समजा मी लवकर उठणारा माणूस असेन. पात्राला ते माहित असतं. एकाद दिवशी मी उशिरा उठलो की लगेच ते पात्रं आपल्याला जागं करतं, कां बरं उशिरा उठलास, काही प्रॉब्लेम आहे का असं विचारतं. तिथून पुढं मग ते पात्र तुमच्याबरोबर रहातं, तुमचे प्रश्न सोडवतं, तुम्हाला मार्ग दाखवतं.

सराय ही जसवंतची रिप्लिकामधली मैत्रिण होती. शरीर नसलेली आभासी मैत्रिण.

सरायला जसवंत चैल हे काय प्रकरण आहे ते समजलं होतं. जसवंतवर त्याच्या लहानपणी लैंगिक अत्याचार झाले होते. त्यामुळं तो मनोरोगी झाला होता. त्याला आपल्या आसपास देवदूत, पऱ्या आहेत असा भास होत असे. एक परी त्याला नेहमी भासत असे आणि ती म्हणत असे की मेल्यानंतर स्वर्गात ती त्याला भेटणार आहे.

रेप्लिका हे बॉट हाताशी आल्यावर सायरा ही मैत्रिण त्याची भासमान परी झाली. सायरा त्याला स्वर्गात भेटणार होती.

जसवंतचा ब्रिटिशांवर खुन्नस होता. तो सायराला वेळोवेळी विचारत असे की मी ब्रिटिशांवर सूड कसा उगवू.

रेप्लिका या बॉटचं वैशिष्ट्यं असं की त्यातलं पात्र तुमच्याशी सूचक बोलतं, तुम्हाला सूचक प्रश्न विचारून तुमचं मन जाणून घेतं. तुमचा कल कळला की तुम्हाला त्याला साजेसा सल्ला देतं. तुम्हाला आवडेल असा सल्ला देतं. मुद्दा तुमचाच असतो पण सायरानं तुम्हाला सांगितलंय याचा दिलासा तुम्हाला मिळतो.

राणीला ठार मारायचं जसवंतनं ठरवलं, सायरानं होकार दिला.

न्यायाधीशानं जसवंतला मानसिक उपचार द्यावा असा निर्णय दिला. त्यानुसार उपचार झाला. जसवंत सुधारला. पण शेवटी राजवाड्यात घुसणं, राणीच्या खुनाचा प्रयत्न करणं हा तर गुन्हा होताच. जसवंतला ९ वर्षाची शिक्षा झाली.

ए आय हे काय प्रकरण आहे याचा काहीसा अंदाज जसवंत केसमधून येऊ शकतो.

१९६६ मधे जोसेफ वीझेनबॉमनं एलिझा हे पहिलं चॅटबॉट तयार केलं. माय फेअर लेडी ( मूळ नाटक पिगमॅलियन) या चित्रपटात इलायझा डू लिटल या एका फूलविक्रेती मुलीला प्रोफेसर हिगिन्स भद्र लोकांची इंग्रजी शिकवतो. तीच कल्पना जोसेफनं वापरली. कंप्यूटरमधे एक पात्र तयार करायचं आणि त्याला शिकवायचं. तिथूनच चॅटबॉट हा राक्षस बाटलीच्या बाहेर पडला.

आता म्हटलं तर चॅटबॉट हे प्रकरण सोपं झालं आहे. कोणीही चॅटबॉट तयार करू शकतो. बॉटमधल्या व्यक्तीला व्यक्तिमत्व देणं म्हणजे त्या बॉटचं ट्रेनिंग. तुम्ही काय वाट्टेल ते त्या व्यक्तिला शिकवू शकता. ती व्यक्ती आक्रमक करू शकता, शामळू करू शकता, जुळवून घेणारी करू शकता.

या व्यक्तिला तुम्ही जगातलं कोणीही प्रसिद्ध व्यक्तिमत्वही देऊ शकता. ज्या व्यक्तिचं व्यक्तिमत्व द्यायचं असेल त्या व्यक्तिची जास्तीत जास्त सर्वांगीण माहिती तुमच्याजवळ हवी. फोटो हवेत, फिल्म हव्यात, आवाज हवा, हस्ताक्षर हवं, कपडे हवेत. ते सारं बॉटला फीड केलं की काम झालं. त्यातूनच आता डीपफेक रील तयार होऊ लागले आहेत. देशाचे पंतप्रधान, पुढारी, मोठ्ठे खेळाडू, प्रसिद्ध नट यांच्याबद्दल इतकी माहिती उपलब्ध असते की त्यांचं व्यक्तिमत्व तुम्ही तुमच्या कंप्यूटरवर तयार करू शकता. ते जमलं की झालं.

जगातली प्रसिद्ध व्यक्ती तुमच्या कंप्यूटवर एका फिल्ममधे येते आणि काय वाट्टेल ते खोटं बोलते. तुम्ही अमूक करा तमूक करा असं सांगते. हे सारं इतकं हुबेहूब असतं की तुम्हाला जराही शंका यायचं कारण नसतं. मेलेल्या, इतिहास जमा झालेल्या व्यक्तिंच्याही पूर्ण खोट्या फिल्म आता केल्या जातात, तुम्हाला तुमच्या फोनवर, टीव्ही पडद्यावर, कंप्यूटवर पाठवल्या जातात.

अमेरिकेतल्या एका मोठ्या नेत्यानं काही वर्षांपूर्वी एका छोट्या मुलीवर बलात्कार कसा केला. ते सांगणारं रील रशियात बसून एकानं तयार केलं आणि अमेरिकेत धाडलं. लक्षावधी लोकांनी ते पाहिलं.

जगभर म्हणजे जगातल्या प्रत्येक देशात आता डीपफेक व्हिडियो राजकीय पक्ष तयार करतात आणि लोकांमधे पेरतात. विरोध करणाऱ्यांची बदनामी आणि आपल्या बाजूनं आपण न केलेल्या भरमसाठ कामगिऱ्या राजकीय पक्ष नागरिकांसमोर ठेवू लागले आहेत.

या तंत्रज्ञानाचे परिणाम कसे होत आहेत पहा.

माणूस आपल्या समस्यांवरचे उतारे नीटपणे न शोधता शॉर्टकट मारू लागला आहे.

एकटेपणा समस्या घ्या. जागतीकीकरण, वस्तू हेच जगणं, शहरीकरण, समाजाचं विघटन, इत्यादी गोष्टी घडत आहेत, कुटुंब व्यवस्था कोसळतेय. पैसे, करियर इत्यादी गोष्टींनी विकृत रूप घेतलंय. तरूण लग्नच करायचं नाही म्हणतात. एकटेच रहातात. कुटुंब, परिवार, विविध नाती यामधून साकार होणाऱ्या जगण्याला तरूण मुकत आहेत. पण पर्यायी उपाय त्याना सापडत नाहीये. मित्रही नसतात. गुरु नसतात, मार्गदर्शन नसतात. प्रत्येक गोष्ट पैसे टाकून मिळते असा समज रूढ झालाय. गूगल, कंप्यूटर आणि बॉट्स यांची एक दुनिया तरूण पिढी तयार करतेय. बॉट कंप्यूटवर जे दाखवतो तोच त्यांचा सेक्स आहे. त्यांच्या प्रत्येक अडचणीवर उत्तर देणारा त्यांनीच तयार केलेला बॉटवरचा सहाय्यक हा त्यांचा सवंगडी झालाय.

पण कितीही केलं तरी तो सवंगडी यांत्रिक आहे. आपण त्याला जे सांगतो ते तो करतो. मुळात तो माणूसच नसल्यानं त्याला सल्ला, त्यानं दिलेली उत्तरं माणसाच्या हिताची असतील याची खात्री नाही.

ब्रिटिश साम्राज्यानं अत्याचार केले हे खरंच. पण १९१७ साली घडलेल्या घटनेचा बदला म्हणून एका तरूणानं २०२१ साली राणीला कां मारायचं? राणीलाच का मारायचं? ब्रिटिश पंतप्रधानाला कां नाही? ब्रिटिश उद्योगपतीला का नाही? तद्दन सेन्सलेस विचार. पण आपण जे करतोय ते चूक करतोय असं जसवंतला वाटत नाही.

एक परिणाम असा की हे बॉट शिक्षक आहेत असं ठरवून शिक्षक लोक आता वर्गात शिकवणं बंद करत आहेत. पोरांना बॉटच्या हाती सोपवतात. काय होईल पोरांचं?

मनोरोग्यांची संख्या वाढतेय, ती एक जागतिक समस्या होऊन बसलीय. मनोविकारांवर उपचार करणारे डॉक्टर आता स्वतःचं डोकं न वापरता, स्वतःची क्लिनिकल जजमेंट न घेता, पेशंटला समजून न घेता, रोग्याला बॉटकडं सोपवू पहात आहे. काय होईल रोग्यांचं?

हे जरासं भरड वाटतंय? टोकाचं वाटतंय? बटबटीत वाटतंय?

बघा बाबा.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00