Home » Blog » जनतेचा कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? अजित पवार

जनतेचा कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? अजित पवार

‘ईव्हीएम’वरचे आरोप फेटाळले

by प्रतिनिधी
0 comments
Ajit Pawar Twitter

पुणेः जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार, असा सवाल अजित पवार यांनी केला. ‘ईव्हीएम’ विरोधात विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासमोरच फेटाळले.

आढाव हे पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. विधानसभा निवडणुकीत सरकारी पैशांचा वापर झाला असून ‘ईव्हीएम’बाबत संशय घेण्यास जागा असल्याचे आढाव यांनी म्हटले आहे. आज सकाळी शरद पवार यांनी डॉ. आढाव यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार हेदेखील आंदोलनाच्या स्थळी पोहोचले. या वेळी त्यांनी बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

ते म्हणाले की, संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे बाबा आढाव यांनी आपले मत मांडले. काही गोष्टी या निवडणूक आयोगाशी तर काही सर्वोच्च न्यायालयाशी संबधित आहेत. त्यामुळे त्यांना जे योग्य वाटते, त्यानुसार त्यांनी निकाल दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३१ जागा आल्या. आमच्या १७ जागा आल्या. हा जनतेचा कौल असल्याचे आम्ही मान्य केले. त्या वेळी ‘ईव्हीएम’बद्दल कुणी बोलले नाही. बारामतीमध्ये मी जो उमेदवार उभा केला होता, तो ४८ हजार मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच सात महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीत मीच ४८ हजारांची भर काढून एक लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनताच म्हणत होती, लोकसभेला ताईला आणि विधानसभेला दादाला. त्यामध्ये जनतेने कुणाचे ऐकले नाही.

“१९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीत लोकांनी वाजपेयी यांना मतदान केले आणि विधानसभेला विलासराव देशमुख यांना केले. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. मतदार लोकसभेला शरद पवार यांना आणि विधानसभेला मला मतदान करत होता, तरीही शरद पवार यांना ८५ हजार तर मला ५० हजारांचे मताधिक्य मिळाले. त्या वेळी मी असे म्हटले नाही, की मला २५ हजार मते कमी का पडली. हा लोकांचा कौल होता आणि तो मान्य केला पाहिजे,” असे अजित पवार म्हणाले. “काही पराभूत उमेदवार मला सांगतात, की आमचा पराभव झाला. मी त्यांना सिद्ध करून दाखवा असे सांगतो. नाना पटोले परवा म्हणाले, की संध्याकाळी कसे मतदान वाढले. साडेचार आणि पाचच्या पुढे लोक रांगेत आले मग त्यांना आतमध्ये घेतले. माझ्या इथे सकाळी सात ते नऊ पाच टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदान संपेपर्यंत टक्केवारी १५ टक्क्यांनी वाढली. त्याला आमचा काय दोष आहे. मतदारांनी कधी रांगेत यायचे आणि कधी मतदान करायचे तेच ठरवणार,” असे ते म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00