दिवाळीमध्ये अंगणात दिवा लावत असताना प्रत्येकाने मनातही जाणिवेचा एक दिवा तेवत ठेवायला हवा, त्यातूनच दिवाळीच्या प्रकाशपर्वात आपले माणूसपण अधिक उजळून निघेल. कोणताही सण उत्सव साजरा करताना ही जाणीव महत्त्वाची असते. गणेशोत्सव आणि दसरा मोठ्या उत्साहाने साजरा झाला. लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आणि तोंडावर विधानसभा निवडणूक असल्यामुळे या दोन्ही सणांचा उत्साह द्विगुणित झाला होता. विधानसभा निवडणुकीचा जल्लोष टिपेला पोहोचला असताना त्या उत्साहात दिवाळी साजरी होत आहे. निवडणुका हा पैशाचा खेळ बनला असल्यामुळे मतदारांची ख-या अर्थाने दिवाळी साजरी होणार यात शंका नाही. निवडणुका असल्या, नसल्या तरी दिवाळीचा उत्साह असतोच. गणपतीपाठोपाठ येणारा दसरा शेतकरी वर्गाच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत असतो. पावसाळा संपलेला असतो. पिकांची कापणी होऊन धान्य घरात आले असते. समृद्धी ओसंडून वाहात असते. अशा वातावरणात दसरा साजरा केला जातो. दसरा उत्साहात झाला, परंतु अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतक-यांची दिवाळी अंधःकारमय बनली आहे. तरीही जगरहाटी म्हणून कमीअधिक प्रमाणात सगळेच दिवाळी साजरी करतात. गणपतीपासून सुरू झालेला धार्मिक माहोल दसरा संपेपर्यंत कायम राहतो. दिवाळीला मात्र हा धार्मिक ज्वर ओसरून निखळ सणाचा आनंद भरभरून वाहात असतो. दिवाळीच्या याच वैशिष्ट्यामुळे दिवाळीला सणांचा राजा म्हटले जाते. धार्मिक प्रथा, परंपरांच्या पलीकडे जाऊन सर्वधर्मीय लोक दिवाळीच्या उत्साहात सामील होत असतात. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. पारंपारिकरित्या शुभकार्यासाठीचा उत्तम दिवस म्हणून त्याचे महत्त्व असते. बहीण भावांच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणून भाऊबीजेचे महत्त्व आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, गुजरात गोवा आदी राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नोकरी, व्यवसाय किंवा कौटुंबिक व्यवधानांमुळे व्यस्त असलेले कुटुंबीय यानिमित्ताने एकत्र येत असतात.
`इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो` अशी प्रार्थना दिवाळी पाडव्याला केली जाते. बळीराजाची पुराणातील कथा त्यादृष्टिने खूप महत्त्वाची असून अलीकडच्या काळात पुराणांचे नवे संदर्भ पुढे आणताना ही कथा केंद्रस्थानी ठेवली जाते. आपला देश कृषिप्रधान देश आहे आणि बळीराजा हा या कृषिपरंपरेचा अग्रदूत मानला जातो. बहुजनांच्या संस्कृतीवर आक्रमण करून ती पाताळात गाडण्याचे प्रयत्न म्हणजेच नष्ट करण्याचे प्रयत्न केले गेले. त्याची प्रातिनिधिक कथा म्हणून बळीराजाची कथा सांगितली जाते. आजही शेतक-याला बळीराजा असे संबोधले जाते, यावरून त्याचे कृषिसंस्कृतीतील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. अत्यंत दानशूर असा हा राजा होता. त्याच्याकडे विष्णूने वामन अवतारात जाऊन तीन पावले जमीन दान मागितली. एक पाऊल धरतीवर ठेवले, दुसरे पाऊल आकाशात ठेवले. तिसरे पाऊल कुठे ठेवायचे, असे विचारल्यावर बळीराजाने आपले मस्तक पुढे केले. वामनाने तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात गाडले. शेतक-यांची काळजी घेणा-या या राजाचे राज्य पुन्हा यावे यासाठी `इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो` असे आजही म्हटले जाते. याचा सरळ साधा अर्थ असतो, की शेतक-यांची काळजी घेणारे राज्यकर्ते सत्तेवर यावेत. आजवर महाराष्ट्राच्या सत्तेत आलेल्यांपैकी ऐंशी टक्क्यांहून अधिक शेतक-यांचीच मुले होती. आपण शेतक-यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करतो, असे ढोल सगळेच वाजवत असतात, परंतु प्रत्यक्ष व्यवहार मात्र व्यापारी आणि कंत्राटदार धार्जिणा असतो. राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असले तरी शेतकरी हा त्यांच्यासाठी राजकारणाचा विषय असतो. परंतु निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा त्यांचे प्राधान्यक्रम बदलतात आणि शेतकरी मागे ढकलला जातो. शेतक-यांची पिळवणूक कोणत्याही टप्प्यावर थांबलेली दिसत नाही. शेतकरी दिवसेंदिवस कंगाल होत चाललेले दिसतात आणि त्यांना कुणी वालीच उरलेला नाही असे चित्र समोर येते. यंदा दिवाळीचा उत्साह शहरांमधून, बाजारपेठांमधून दिसत असला तरी खेडोपाडी फारशी उत्साहजनक परिस्थिती नाही. परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे अनेक भागांमध्ये शेतक-यांची दिवाळी काळवंडून टाकली आहे. पिके कापणी करून घरात येण्याच्या वेळातच हा तडाखा बसल्यामुळे शेतक-यांची पुरती वाताहत झाली आहे. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी करताना अवतीभवतीच्या या परिस्थितीचे भान ठेवायला हवे.