एखादी निवडणूक जिंकल्यानंतर जिंकणा-यांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहात असतो. जिंकलेल्यांच्या समर्थकांचा जल्लोष टिपेलो पोहोचतो. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांच्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. विरोधी महाविकास आघाडीची पुरती वाताहत झाली. एवढ्या मोठ्या विजयानंतर महायुतीच्या समर्थकांच्या उत्साहाला भरते यायला हवे होते आणि सगळीकडे उत्सवी वातावरण असायला हवे होते. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी केला असेल तेवढाच जल्लोष. बाकी सगळीकडे शांतता आहे. निवडणुका झाल्यात आणि एखाद्या पक्षाने किंवा युतीने एवढे घवघवीत यश मिळवले आहे, असे काही चित्र महाराष्ट्रात दिसले नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाल्यानंतर खरेतर त्याच दिवशी किंवा फारतर दुस-या दिवशी मुख्यमंत्र्यांची निवड होऊन सत्ता स्थापन व्हायला हवी होती. परंतु तसेही काही घडलेले नाही. निवडणूक निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले नाही. आणि अजित पवार वगळता जिंकलेल्या इतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या चेह-यावर आनंदाचा मागमूस दिसला नाही. त्याची कारणे महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आहेत. महायुती एकजुटीने लढल्यामुळे विजयी झाली, असा प्रचार महायुतीसमर्थक माध्यमे आणि त्यातले धुरिण करीत आहेत. परंतु ते खोटे असल्याचे महायुतीच्या नेत्यांच्या निकालोत्तर वर्तनातून दिसून येते. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांनी ज्या रितीने टोकाचा आग्रह धरला त्यामुळे १३२ जागा जिंकलेल्या भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये अस्वस्थता होती. निकाल जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली तेवढीच. सतत माध्यमांच्या संपर्कात राहणारे एकनाथ शिंदे त्यानंतर मात्र माध्यमांपासूनही दूर राहिले आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासूनही. २६ नोव्हेंबरच्या पोलीस दलाच्या कार्यक्रमासाठी शिंदे आणि फडणवीस एका मंचावर होते, परंतु दोघांनी एकमेकांकडे पाहिलेही नाही, इतका दुरावा त्यांच्यात दिसून आला. या परिस्थितीवरून महायुतीतील तिन्ही पक्ष किती एकोप्याने लढले असतील याची कल्पना केलेली बरी. निवडणुकीचा निकाल ही वेगळी गोष्ट आहे आणि त्याचे अन्वयार्थ विविध पद्धतींनी काढले जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया संशयाच्या भोव-यात अडकली असून विविध ठिकाणांहून विविध प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यासंदर्भातील शहानिशा होऊन सत्य बाहेर येईपर्यंत फार काही बोलणे इष्ट ठरणार नाही. परंतु बरेच काही संशयास्पद घडले आहे आणि ते दडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सगळ्याच्या दरम्यान मुख्यमंत्री पदासंदर्भात जे नाट्य सुरू होते, त्यावरही पडदा पडल्यात जमा आहे.
मुख्यमंत्रिपदासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील, तो निर्णय आपणास मान्य असेल, असे जाहीर करून एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याचेच जाहीर केले. खरेतर स्वतः शिंदे यांच्यासह त्यांच्या अनेक पाठिराख्यांना हा मोठा धक्का मानावा लागेल. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, थोडा काळ का असेना पण त्यांच्याच गळ्यात सुरुवातीला मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल. कारण विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या होत्या आणि भाजपच्या नेतृत्वानेही वारंवार तसे सांगितले होते. अर्थात निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील, असे कधीही भारतीय जनता पक्षाचा कुणी नेता बोलला नव्हता हेही लक्षात घ्यावे लागेल. परंतु शिंदे यांना त्यासंदर्भात विश्वास वाटत होता. तो त्यांचा भाबडा आशावाद होता, हे त्यांच्या लक्षात येईल आणि महाशक्तीच्या ख-या रुपाचे दर्शन त्यांना घडेल. किंबहुना एव्हाना ते घडले असेल आणि दोन वर्षांपूर्वीचे त्यांचे मत आणि आताचे मत यात फरक पडला असेल. दिल्लीत गुरुवारी रात्री महायुतीचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले तेव्हाचे शिंदे यांच्या चेह-यावरील भाव बरेच काही सांगून जातात. शब्दातून व्यक्त होणा-या भावना आणि प्रत्यक्षात व्यक्त न होता मनातच दडपून राहिलेल्या भावना यात बरेच अंतर असते. शब्द खोटे असले तरी चेहरा खोटे बोलत नाही. एकनाथ शिंदे यांचा चेहरा त्याअर्थाने बरेच काही सांगून जातो. त्यामध्ये निराशेची भावना आहे की फसवणुकीची हे मात्र स्वतः शिंदेच सांगू शकतील!