ठाणे; जमीर काझी : गेल्या अडीच वर्षांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आलेल्या ठाणे जिल्हा विरोधकांपेक्षा सत्ताधारी महायुतीतील सुप्त संघर्षामुळे चर्चेत आला आहे. राज्यात व केंद्रात भाजपा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना गळ्यात गळे घालून काम करत असली तरी ठाण्यात अनेक ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांतील उघडपणे झालेली हाणामारी, वाद रोखण्यात शिंदे व फडणवीस यांना अडीच वर्षांत यश आलेले नाही. किंबहुना आपले गड व कार्यकर्ते सांभाळण्यासाठी त्यांच्यातील ही धगधग कायम ठेवण्यावरच त्यांचा भर राहिला.
आता पुन्हा सत्तेत येण्यासाठी एकेक पाऊल मागे घेत त्यांची मने जुळविण्याचा प्रयत्न केला असला तरी सहा विधानसभा मतदारसंघात त्यांच्यातील बंडखोरांमध्येच उघड लढाई होत आहे. त्याशिवाय अन्य ठिकाणी थेट निवडणुकीच्या रिंगणात नसले तरीही नाराजी कायम ठेवून परस्पराचा काटा काढण्याचेही प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात एकूण १८ विधानसभा मतदारसंघ असून एकूण २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडी, कल्याण पूर्व, मुंब्रा कळवा, भिवंडी पूर्व ,मीरा-भाईंदर,ऐरोली बेलापूर, डोंबिवली यासह सर्वच मतदारसंघातील लढती रंगतदार होणार आहेत.
केदार दिघे, जितेंद्र आव्हाड, रवींद्र चव्हाण, नाईक पिता-पुत्र, मंदा म्हात्रे यांचे भवितव्य पणाला लागले आहे. अनेक ठिकाणी काट्याची टक्कर असून बंडखोर, मनसे, एमआयएम व वंचितच्या उमेदवारांना मिळणारी मते महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाचे गणित निश्चित होणार आहे.
कोपरी- पाचपाखाडीत शिंदे यांची ‘सेफ पॉलिसी’
शिवसेना फोडून मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे सलग पाचव्यांदा या मतदार संघातून नशीब आजमावत आहेत. त्यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे केदार दिघे यांनाच ठाकरे गटाने त्यांच्या विरोधात रिंगणात उतरवित या लढ्याला भावनिक किनार दिली आहे. मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्र्यांना ‘बाय’ मिळाला आहे. त्यामुळे केदार दिघे यांचे भावनिक आवाहन व्यर्थ ठरण्याची शक्यता आहे.
कल्याण पूर्व: भाजपाला बंडखोराचा फटका?
पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार करणारा भाजपचा आमदार गणपत गायकवाड अद्याप जेलमध्ये असल्याने त्याची पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना गोळीबारातील जखमी महेश गायकवाडने बंडखोरीने आव्हान दिले आहे. युतीचा धर्म म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी सुलभा गायकवाड यांच्यासाठी सभा घेतली असली तरी शिंदे गटाची मते त्यांना मिळतील असे वाटत नाही. ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडरे यांना त्यांच्यातील मतविभागणीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. याठिकाणी एकूण १७ उमेदवार रिंगणात आहेत.
डोंबिवली मतदारसंघात रविंद्र चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला
या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना ठाकरे गटाचे दीपक म्हात्रे यांचे आव्हान आहे. शिंदे गटातील सुप्त नाराजीमुळे चव्हाण यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे.
ओवळा-माजिवड्यात सरनाईक यांना मणेरांचे आव्हान
मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रताप सरनाईक हे चौथ्यांदा रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या नरेश मणेरा या नवीन चेहऱ्याने आव्हान उभे केले आहे. मनसेचे संदीप पाचगे, वंचितचे लोकसिंग राठोड यांच्यासह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत.
कळवा-मुंब्र्यात मुस्लिम मते कोणाला?
मुस्लिम मतांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मुस्लिम उमेदवार देण्याची खेळी महायुतीने केली आहे. नजीब मुल्ला हे अजित पवार गटाकडून उमेदवार असून आव्हाडांना विधानसभेत प्रवेश करू द्यायचा नाही, यासाठी त्यांची सर्वबाजूंनी नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला जात असलातरी मुस्लिम समुदाय त्यांच्या पाठीशी असल्याचे सध्यातरी चित्र आहे. मनसेच्या सूर्यकांत सूर्यराव आणि एमआयएमच्या सरफराज खान यासह एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत.
ऐरोली, बेलापूरमध्ये नाईक पितापुत्रांची खेळी
नवी मुंबईत अनेक वर्षापासून आपला वर्चस्व ठेवलेल्या गणेश नाईक यांनी यावेळी आगळी खेळी खेळली आहे. ऐरोली विधानसभा मतदार संघातून ते पुन्हा भाजपाकडून रिंगणात उभे आहेत तर त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी अखेरच्या क्षणी भाजपाची साथ सोडत ‘तुतारी’ हाती घेतली आहे. नाईक कुटुंबीयांवर नाराज असलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांनी या दोन्ही मतदारसंघातून बंडखोरी केली आहे. ऐरोलीमध्ये गणेश नाईक यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून एम. के. मडवी हे रिंगणात आहेत. तर शिंदे गटाचे विजय चौगुले यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने नाईक यांना विजयासाठी कष्ट करावे लागणार आहेत. शेजारच्या बेलापूरमध्ये त्यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी मंदा म्हात्रे या भाजपाकडून हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत असलेतरी संदीप नाईक यांच्यामुळे त्यांना कडवे आव्हान मिळाले आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते विजय नाहटा यांनी बंडखोरी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे या ठिकाणाहून रिंगणात आहेत.
भिवंडी पूर्वेत दुरंगी लढत
याठिकाणी गेल्या वेळी थोडक्या मतांनी विजयी झालेले सपाचे रईस शेख महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्याविरोधात शिंदें गटाचे उमेदवार संतोष शेट्टी रिंगणात असून यावेळी अटीतटीची लढत अपेक्षित आहे. मनसेकडून मनोज गुळवी व बसपाचे परशुराम पाल रिंगणात असून एकूण ११ उमेदवार आहेत.
उल्हासनगरात कलानी विरुद्ध आयलानी
या ठिकाणी एकूण १९ उमेदवार रिंगणात असले तरीही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ओमेश कलानी व भाजपाचे कुमार आयलानी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. मनसेचे भगवान भालेराव वंचितचे संजय गुप्ता यांच्यासह अपक्षांची मोठी गर्दी आहे.
मिरा-भाईंदरमध्ये तिरंगी लढत
याठिकाणी गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही विद्यमान आमदार गीता जैन, भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता, काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसैन यांच्यात लढत होत आहे. माहितीतून भाजपाच्या वाट्याला जागा गेल्याने शिंदे गटाला समर्थन केलेल्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी पुन्हा त्यांना आव्हान दिले आहे. याठिकाणी त्यांच्यातील मत विभागणीचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला मिळू शकतो.
ठाणे शहरामध्ये केळकर यांना विचारेंचे आव्हान
या मतदारसंघात महायुतीने पुन्हा एकदा भाजपचे आमदार संजय केळकर यांना संधी मिळाली आहे. शिंदे गटाच्या आरती भोसले यांनी बंडखोरी केली आहे तर ठाकरे गटाकडून लोकसभेत पराभव पत्करावा लागलेल्या राजन विचारे पुन्हा विधानसभेत जाण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. भोसले यांची बंडखोरी व मनसेचे उमेदवार अविनाश जाधव किती मते घेतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.
मुरबाडमध्ये कथोरे पुन्हा बाजी मारणार?
भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे सातव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुभाष पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. जिल्हा परिषदेचा अनुभव पवार यांच्या गाठीशी आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे इंजिन धोक्यात
मावळत्या विधानसभेत मनसेचे एकमेव आमदार असलेल्या या मतदार संघात मनसेचे प्रमोद पाटील यांना यांना पुन्हा सभागृहात जाण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी प्रतिष्ठेची लढाई केली आहे. पक्षाचे उमेदवार राजेश मोरे यांच्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर पुन्हा रिंगणात आहेत. गेल्या वेळी मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते मिळवण्यात पाटील यशस्वी ठरले होते. यावेळी ती ठाकरे गटाच्या उमेदवाराकडे वळण्याची शक्यता आहे
शहापूरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटात झुंज
शहापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दौलत दरोडा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांच्यात पुन्हा सामना रंगणार आहे. मनसेचे बांगो खडवी यांच्यासह एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत.
अंबरनाथ मतदारसंघात पारंपारिक लढत
येथे शिंदेंच्या सेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि ठाकरे गटाच्या उमेदवार राजेश वानखेडे यांच्यात झुंज होत आहे. २०१४ मध्ये झालेल्या लढतीत किणीकर दोन हजार मतांनी विजयी झाले होते. त्याची परतफेड करण्याची संधी वानखेडे यांना मिळाली आहे.
भिवंडी ग्रामीणमध्ये सेनेच्या दोन गटात झुंज
शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान आमद शांताराम मोरे व ठाकरे गटाने महादेव घाटाळ यांच्यात दुरंगी लढत होत आहे. एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत.
भिवंडी पश्चिमेत काँग्रेसमधील नाराजी नडणार?
मुस्लिम मतदार निर्णायक असलेल्या या ठिकाणी भाजपाने आमदार महेश चौगुले यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवारांची मागणी असताना दयानंद चोरघे यांना तिकीट मिळाली. त्यामुळे अल्पसंख्याक समाजात नाराजी आहे. हे दोन आणि अन्य एक अपक्ष उमेदवार वगळता मुस्लिम समाजातील ११ जण रिंगणात आहेत .