नवी दिल्ली : विक्रमी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयने ५८ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ९ मार्च रोजी रंगलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते. (Team India)
“लागोपाठ आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद पटकावणे हे विशेष आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाची गुणवत्ता आणि समर्पितवृत्ती यांचा गौरव करण्यासाठी हे बक्षीस आहे,” असे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिनी यांनी सांगितले. भारतीय संघातील प्रत्येकाने पडद्यामागे घेतलेल्या मेहनतीची बीसीसीआयला जाणीव आहे. २०२५ मध्ये १९ वर्षांखालील महिला वर्ल्ड कपपाठोपाठ हे देशाचे दुसरे आयसीसी विजेतेपद आहे. यावरून आपल्या देशातील क्रिकेटपूरक वातावरण अधोरेखित होते, असेही बिनी म्हणाले. (Team India)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यापूर्वीच भारतीय संघाला २२.४ लाख डॉलर्सचे बक्षीस दिले आहे. त्याबरोबरच, या स्पर्धेच्या साखळी फेरीतील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघास ३४,००० डॉलर्सचे बक्षीस मिळाले. या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ६९ लाख डॉलर्स इतकी होती. उपविजेत्या न्यूझीलंड संघास ११.२ लाखांचे, तर उपांत्य फेरीतील ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघास प्रत्येकी ५.६ लाख डॉलर्सचे बक्षीस मिळाले. सहभागी झालेल्या सर्व आठ संघांना प्रत्येकी १.२५ लाख डॉलर्स मिळाले. (Team India)
मागील दीड वर्षांमध्ये भारतीय संघ हा आयसीसी स्पर्धांमधील सर्वांत यशस्वी संघ असून भारताने याकाळात २४ पैकी २३ सामने जिंकले आहेत. २०२३च्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यातील पराभव वगळल्यास भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप व चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अपराजित राहात विजेतेपद पटकावले.
हेही वाचा :
धावपटू अर्चना जाधववर बंदी