-
रिचर्ड महापात्रा
चितापूर गावातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात थोडा का होईना पण चिंचेच्या झाडाचा अंश आहे. छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यातल्या या गावात चिंचेचं झाड म्हणजे जणू पैशाचे झाड असून तेच माणसाचे नशीब ठरवतं. चिंचेचं झाड हे तिथल्या लोकांसाठी कल्पवृक्षासारखं आहे.
गावातल्या कुणाला जीडीपी म्हणजे काय कळत नाही, पण बहुतेक लोकांना हे ठाऊक आहे की, बाजारात चिंचेचा भाव काय आहे, यावर गावाचा जीडीपी म्हणजे सकल घरेलू उत्पादन अवलंबून असते.
गावात आठशे घरं आहेत. आणि चिंचेची झाडं आहेत १७००. कुणाच्या मालकीची किती चिंचेची झाडं आहेत यावरून संबंधित कुटुंबाची गरिबी आणि श्रीमंती ठरत असते. गावात पारावर किंवा कट्ट्यावरच्या बैठकांमध्ये चिंचेच्या झाडांचीच चर्चा असते. म्हणजे कुणाच्या झाडाला किती चिंचा लागल्यात, कुणी लावलेली रोपं चांगली वाढताहेत किंवा कुणाची वाढत नाहीत वगैरे. चिंचेच्या झाडांची स्थिती जाणून घेण्यासाठी कधीकधी ग्रामसभेचे आयोजनही केले जाते.
तरुणही चिंचेच्या उत्पादनात
एका सकाळी गावातील तरुणांचा एक गट गावातील चिंचेच्या झाडांची स्थिती जाणून घेण्यासाठी बाहेर पडला आहे. यातल्या बहुतांश तरुणांनी केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू अशा राज्यांमध्ये स्थलांतरित मजूर म्हणून काम केलं आहे. स्थलांतरित मजुराचं दुःख त्यांच्या चेह-यावर कोरलंय. मधल्या करोना काळातल्या लॉकडाऊन दरम्यान हे सगळे गावात परत आले. गावातल्या चिंचेच्या झाडांनी या तरुणांना आपलं जगणं नव्यानं सुरू करण्यासाठी प्रेरणा दिली.
इथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की, ज्यावर्षी झाडांना आंबे जास्त लागतात, त्यावर्षी चिंचा कमी येतात. वर्षानुवर्षांच्या अनुभवातून लोकांचं हे मत बनलं आहे.
सर्वसाधारणपणे फेब्रुवारीमध्ये चिंचेच्या झाडांना कळ्या उमलायला लागतात. नेहमीसारख्या कळ्या दिसल्या नाहीत, तर लोक चिंताक्रांत होतात. यंदा अर्थकारण बिघडणार म्हणून काळजीत पडतात.
धनी करकाचं झालं चितापूर
चितापूर गावाची भौगोलिक परिस्थिती काही वैशिष्ट्यपूर्ण घटनांची साक्षीदार आहे, ज्यांनी गावाच्या अस्तित्वालाच आव्हान दिलं होतं. अशीच एक घटना गावक-यांच्या काळजावर कोरली आहे. त्याचमुळं इथले लोक चिंचेच्या झाडाला आपल्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू मानतात.
खूप वर्षांपूर्वी या गावाचं नाव होतं धनी करका. नंतर ते बदलून चितापूर करण्यात आलं. ब्रिटिश राजवटीच्या काळात गावात एक पोलिस ठाणेही होते. एकावर्षी गावात मोठ्या सख्येनं बिबटे आले, ज्यामुळं गावक-यांना गाव सोडावं लागलं. काही वर्षांनी गावकरी गावात परत आले आणि आपल्या पूर्वजांच्या गावाला त्यांनी नवं नाव दिलं – चितापूर. म्हणजे चित्त्यांचं, बिबट्यांचं गाव.
त्यानंतर गावक-यांना चिंचेचं महत्त्व कळलं. काही लोकांना आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी आठवतात. त्यात काही गोष्टी अशा आहेत, ज्यामध्ये चिंचेचे झाड अक्षासारखं दिसतं, ज्याच्या भोवतीनं धुरवा जमातीचे लोक पुन्हा जिवंत होतात.
चिंचेच्या झाडांचाच आधार
लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून देणारी शेती इथं नव्हती. परंतु चिंचेच्या झाडांनी लोकांना आधार दिला. चिंच हेच त्यांचं प्रमुख अन्न बनलं. शेती करण्याच्या स्थितीत येईपर्यंत चिंचेचा कोळ आणि चिंचेची नाजूक पानं हाच त्यांचा आहार होता. ब्रिटिश व्यापा-यांसाठी काम करणा-या स्थानिक ठेकेदारांनी जंगलातील इतर खाण्यायोग्य वस्तू आणि चिंचेची अदला बदल सुरू केली. म्हणजे आजच्या भाषेत बार्टर सिस्टिम. स्थानिक आठवडी बाजारातही चितापूरच्या चिंचेचं आगमन झालं. एक म्हणजे विक्रीसाठी उत्पादन म्हणून. आणि दुसरं म्हणजे अन्य वस्तूंच्या खरेदीसाठीचे चलन म्हणून. गावक-यांसाठी चिंचेचंच चलन बनलं.
जिल्ह्याच्या लोकल चॅनलला स्थानिक घटनांचे फुटेज पाठवणारा तरुण व्हिडिओग्राफर लकमू नाग सांगतो की, इथल्या प्रत्येकाला वारसाहक्कानं चिंचेचं झाड मिळतं. त्याचे पूर्वज गरीब होते की श्रीमंत याचा इथे संबंध येत नाही. जर झाडाला भरपूर चिंचा लागल्या तर माणूस श्रीमंत होतो. जो कुणी अधिक झाडं लावतो आणि वाढवतो त्याची भरभराट होते. कुणी झाडांकडं दुर्लक्ष केलं तर त्याला स्थलांतरित मजुरीचा रस्ता धरावा लागतो.
लकमू स्वतः टीव्ही पत्रकार असला तरी चिंचा गोळा करतो. तो सांगतो, `आमच्या गावात आणि परिसरात चिंचेच्या झाडांशी संबंधित कामांनाच महत्त्व आहे. चॅनलवर प्रसारित होतील, असे कार्यक्रम इथं होत नाहीत त्यामुळं मला त्यातून फारसे पैसे मिळत नाहीत.` त्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीवर चिंचेची वीस झाडं आहेत. आपल्या पुढच्या पिढीसाठी त्यानं स्वतः पाच झाडं लावली आहेत. या चिंचेच्या झाडांमुळंच आपण लखपती बनल्याचं तो सांगतो.
चितापूर सारख्या गावांनी बस्तर जिल्ह्याला चिंचेच्या जागतिक व्यापाराचं प्रमुख केंद्र बनवलं आहे. जगदलपूर या जिल्ह्याच्या गावी आशिया खंडातला सर्वात मोठा चिंचेचा बाजार भरतो. वनविभागाकडील आकडेवारीनुसार या बाजारात दरवर्षी सुमारे पाचशे कोटींची उलाढाल होते. इथून ५४ देशांमध्ये चिंचा पाठवल्या जातात.
बस्तरच्या कृषी विज्ञान केंद्रानं २०१९मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार चिंचेचं उत्पादन घेणा-यांमधील सुमारे ४३ टक्के लोक ३५ वर्षांच्या आतील आहेत. यातल्या बहुतेकांना या कामाचा दीर्घ अनुभव आहे. तरुणांनीही स्थलांतरित मजुरीचा मार्ग पत्करण्याऐवजी चिंचेच्या उत्पादनाला प्राधान्य दिल्याचं यावरून दिसून येतं.
नीती आयोगाच्या गरीबी निर्देशांकात बस्तरची ४७ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्या खाली आहे. जिल्ह्यातील ७० टक्के लोकसंख्या अनुसूचित जमातीशी संबंधित असून हे लोक जंगलांच्या आसपासच राहतात. त्यांचं सत्तर टक्के उत्पन्न वन उत्पादनांच्या माध्यमातून मिळतं. देशातील ११५ मागास जिल्ह्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश असून १९५० च्या दशकापासून सर्वाधिक गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.
पैसे कमावण्याचे तीन पर्याय
काळाबरोबर चिंचेनं चितापूरच्या अर्थव्यवस्थेला आकार दिला आहे. इथं पैसे कमावण्याचे तीन पर्याय आहेत – एक चिंच आणि मधासारख्या अन्य वन उत्पादनांची विक्री, दोन गरजेपेक्षा अधिक पिकलेलं धान्य विकणं किंवा रोजगार हमीच्या कामावर जाणं आणि तिसरं म्हणजे गाव सोडून शहरात जाऊन मजुरी करणं.
चिंचेच्या झाडांची देखभाल करणारे कश्यप चिंचेमुळं गावाची अर्थव्यवस्था सुधारल्याचं सांगतात. एक चिंचेचं झाड वर्षाला बारा हजार रुपयांचं उत्पन्न देतं. म्हणजे गावाचा चिंचेचा वार्षिक व्यापार दोन कोटी चार लाख रुपयांहून जास्ती होतो. कधी कमी उत्पादन होतं, त्यावेळीही दोन कोटींच्या निम्म्याहून थोडा अधिकच असतो.
चिंचेच्या झाडांपासून मिळणा-या उत्पन्नाच्या आधारेच प्रत्येक कुटुंबात खर्चाचं नियोजन केलं जातं. लग्न समारंभ, अन्य निमित्तांनी गावजेवण घालायचं असेल किंवा शेतीसाठी अवजारे खरेदी करायची असतील तर त्याचंही नियोजन केलं जातं. चिंचेच्या झाडांपासून अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही तर काय करायचं, याचाही विचार करतात. चितापूरमध्ये याचा दुसरा अर्थ असा असतो की, तरुणांना पुन्हा रोजगारासाठी बाहेर जावं लागणार.
(`डाऊन टू अर्थ`च्या सौजन्याने)
स्फूर्तिदायी शिवपुतळ्याचा सुवर्णमहोत्सव
संभल प्रकरणी कारवाईला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
झारखंडमध्ये प्रेयसीचे केले ५० तुकडे