-अशोक वाजपेयी
हिंदी साहित्याच्या इतिहासातील भक्तिकाळ सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. या काळात जी एतद्देशीय आधुनिकता विकसित झाली, तिला अलिकडच्या काळात लक्ष्य केले जात आहे, तिच्यावर हल्ले चढवले जात आहेत. त्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते आहे ती अशी की, पश्चिमी मध्यकाळ अंधाराने ग्रासला होता तसा भारतीय मध्यकाळ नव्हता. तो सोनेरी काळ होता. भारतात या काळात जसे कबीरदास, तुलसीदास, मीराबाई, सूरदास यांच्यासारख्या महान विभूती जन्माला आल्या, तशा अन्यत्र आल्या का?
असंही मानलं गेलं आहे की भक्तियुगामुळे साहित्य, समाज, धर्माच्या लोकशाहीकरणास प्रारंभ झाला. भक्तिकाव्याने धर्मातील पारंपरिक कर्मकांडाला छेद देत एकदम नवे असे सर्वजनसुलभ, लोककेंद्री अध्यात्म विकसित केले. हिंदी प्रदेशात (उत्तर भारतात) त्याचा व्यापक प्रचार-प्रसार झाला. त्यातून सवर्णांच्या वर्चस्वास आव्हान दिले गेले. ते आव्हान विधायक होते. त्यातून वंचित वर्गातील अनेकांना अभिव्यक्तीची संधी मिळाली. संस्कृतपासून प्राकृत, अपभ्रंशसारख्या बोली निर्माण होऊन त्यातून अनेक भाषा जन्मल्या. प्रत्येकास आपल्या भाषेत व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालं. साररुपाने असे म्हणता येईल की, भक्तिकाव्यामुळे माया, संसार, कलियुग, ज्ञान, काम,क्रोध, सर्वांतील हिंसेच्या विरुद्ध एक सशक्त अहिंसक पर्याय निर्माण झाला. तो एका अर्थाने प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातील विद्रोहच होता.
तो असा काळ होता की तेव्हा चित्रकला, संगीत, नृत्य इत्यादींमध्ये परस्परपूरकता होती. निरंतर एकमेकांत देवाणघेवाण होत राहायची. कविता जीवनाचा उत्सव आणि इश्वराचं निखळ गुणगाण होती. कवितेत व्यक्तिगत आणि सामाजिक ताणतणावांचं चित्रण, सत्याच्या विविध रुपांचं वर्णन स्वाभाविक परंतु मार्मिकपमे होत राहायचं. संस्कृतच्या तुलनेत अवधी, ब्रज, भोजपुरी, राजस्थानी इत्यादी भाषांमध्ये व्यापक समाजजीवन चित्रीत झालं. या विस्ताराचं वर्तुळ आजही आपण रुंदावत जात असल्याचं अनुभवतो आहोत. उत्तर भारतात आजही कबीर नि तुलसीचंच राज्य आहे. करोडो लोक त्यांच्या कवितेतून सौंदर्य, नीती आणि अध्यात्माचे संस्कार आजही घेत आहेत.
तसे पाहिले तर संतांच्या काव्यात, विशेषतः तुलसी आणि कबीरामध्ये एक प्रकारची वैश्विक (कॉस्मिक) दृष्टी व शेजारधर्माची भावना प्रभावीपणे दिसून येते. असं दिसून आलं आहे की, वैश्विक दृष्टी कवितेत येते ती रोजच्या जगण्यातील सत्य आणि अंतरात्म्याच्या शेजारधर्माच्या सहिष्णू वृत्तीतून. भक्तिकाव्याने परमेश्वराला शेजारी बनवलं. तूच माझा सखा तूच माझा पिता. भक्तिकाव्यांनी परमेश्वराला पुरोहितांच्या तुरुंगातून मुक्त केलं, तसं मंदिर मशिदीतूनही. मला भुवनेश्वरमध्ये एका समारंभात तुलसीदासांनी लिहिलेल्या रामचरित मानस महाकाव्यावर बोलायचे होते, म्हणून मी त्याच्या शेवटच्या अध्यायाची पाने उलटीपालटी केली. त्यात दूध, घुसळणे, धार काढणे, दोरी (रवी नि गाईचे पाय बांधण्याची), रवी, कुदळ, प्रकाश, पणती, खुरपे, चंदन, अमृत अशी कितीतरी बिंब-प्रतिबिंबं आहेत.
तुलसीदास मानवी जीवनाचे भाष्यकार होते – बडे भाग मानुष तनु पावा l सूर दुर्लभ सब ग्रंथहि गावाll (माणसाचा जन्म ही दैवदुर्लभ घटना होय. ईश्वराला न मिळालेली ग्रंथाची देणगी त्याला लाभली आहे.) त्यांनी असेही म्हटले आहे की, बैर न विग्रह आस l न त्रास मुखभय ताहि सदा सब आस ll(ईश्वराचे नाव ओठी असले की वैर, भेदाभेद, ना सूचतो, ना त्याचा त्रास होतो). राममुखी त्यांनी हेही सांगितले आहे की, नहि अनीति, नहिं कुछ प्रभूताई (अनीतिचा प्रभाव, श्रेष्ठत्व तुम्हास कधीच,कोणत्या काळात दिसणार नाही) सुनहु करहु जो तुम्हहि सोहई (तुम्हास शोभेल असेच तुम्ही ऐका आणि कृती करा).