-मुकेश माचकर
एका गावात नव्यानेच आलेल्या क्रोधविजय महाराजांची फार ख्याती पसरली होती. हे संन्यासी हिमालयात ४० वर्षं तप करून आले होते आणि त्यांनी क्रोधावर विजय मिळवल्याची चर्चा होती.
लहानपणापासून त्यांना ओळखणाऱ्या एका मित्राला त्यांची भेट घेण्याची इच्छा झाली. भल्या पहाटे तो त्यांच्या मुक्कामी पोहोचला. एका मंदिराबाहेर क्रोधविजय महाराज एका विझलेल्या शेकोटीशेजारी बसले होते. रात्र सरत आली होती. तांबडं फटफटलं होतं. शेकोटीमधली लाकडं जळून गेली होती, त्यांच्यावर राख धरली होती.
इतक्या वर्षांनी भेटलेल्या मित्राला महाराजांनी ओळखलं नाही. त्याने नमस्कार केला, तेव्हा कोणी भाविक भेटायला आलाय, म्हणून त्यांनी आशीर्वादपर हात उंचावले.
मित्राला मित्राची फिरकी घेण्याची हौस आली. तो म्हणाला, महाराज, सगळी आग विझून गेली का?
महाराज म्हणाले, हो. मघाशीच.
मित्र म्हणाला, पण, एवढी खात्री कशी तुम्हाला?
महाराज म्हणाले, राख पाहा ना किती धरलीये.
मित्र म्हणाला, राखेवरून काही निश्चित सांगता येत नाही. वर राख दिसली तरी खाली निखारा असू शकतो धगधगता.
महाराज आता थोडे वैतागले, म्हणाले, मी इथे खूप काळ शेकत बसलो होतो. मीच पेटवली शेकोटी. मला कळत असेल ना?
मित्र म्हणाला, ते बरोबरच आहे. पण, राखेखाली ना अनेकदा निखारे धुमसत असतात. राख फसवी असते. जरा ढोसलं की निखारे चटका देतात.
महाराज करवादून म्हणाले, मी काय वेडा म्हणून बसलोय का इथे मघापासून? तू आत्ता कुठूनतरी उगवलायस आणि मला निखाऱ्यांबद्दल शिकवण देतोयस? डोळे फुटलेले नाहीत ना तुझे? बघ ना मग डोळ्यांनी.
मित्र शांतपणे म्हणाला, महाराज, नुसत्या डोळ्यांनी पाहून काही उपयोग नसतो. चिमट्याने ढोसून तर बघा. मला वाटतं अजून निखारे विझलेले नाहीत.
महाराजांनी चिमटा उचलला आणि मित्रावर उगारून म्हणाले, तू मला शहाणपणा शिकवतोयस? मी कोण आहे, याची कल्पना तरी आहे का तुला? हिमालयात ४० वर्षं तपश्चर्या करून क्रोधावर विजय मिळवून आलोय मी, म्हणून बचावलास. नाहीतर या चिमट्याने डोकं फोडलं असतं आतापर्यंत तुझं.
मित्र हसून निरोप घेत म्हणाला, महाराज, मला वाटलं होतं फारतर एखादा निखाराच असेल शिल्लक, पण इथे तर भडकाच उडाला की हो?
क्रोधविजय महाराजांच्या हातातून चिमटा गळून पडला आणि त्यांची मान शरमेने झुकली.