कोल्हापूर : प्रतिनिधी
जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करावा व कंत्राटी शिक्षक नेमणुकीचा आदेश तत्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसह हजारो शिक्षकांनी शुक्रवारी, दि. २७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हयातील शैक्षणिक संघटनांनी शाळा बंद ठेवून यात सहभाग घेतला.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ, शिक्षण संस्था चालक संघ, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा महामोर्चा काढण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षणाचे कंत्राटीकरण रद्द करा, अशैक्षणिक कामे रद्द करा, शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करू नका, शिक्षणावरील बजेट वाढविलेच पाहिजे, आदी घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेत एस. डी. लाड, दादा लाड, अनिल लवेकर, भरत रसाळे, राजाराम वरुटे, प्रसाद पाटील, रवी पाटील, आर. वाय. पाटील, आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन उमेश देसाई यांनी केले.
या प्रसंगी चेअरमन राहुल पवार,बाळ डेळेकर, बी. जी. बोराडे, सुधाकर निर्मळे, खंडेराव जगदाळे, बाबा पाटील, प्रा. सी. एम. गायकवाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई, उदय पाटील, के. के. पाटील, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, गौतम वर्धन, मिलींद बारवडे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
शिक्षकांच्या प्रमुख मागण्या
अन्यायकारक संच मान्यता शासन आदेश रद्द करावा, कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा आदेश तत्काळ रद्द करावा, जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. विना अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे टप्पावाढ आदेश त्वरित काढावेत, आधारकार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी करावीत, प्राथमिक शाळेला अंगणवाडी जोडावीत, उपक्रमांचा भडीमार बंद करावा, पदवीधर शिक्षकांना वेतणश्रेणी लागू करा टप्पा अनुदान शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे तत्काळ मिळावेत, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावीत.