इस्लामपूर; प्रतिनिधी : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे पण महाराष्ट्र विकला जाणार नाही. मतमोजणीच्या दिवशी कळेल की महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचे स्वाभिमानी विचार जपणारे राज्य आहे. लोकांनी भाजपला ओळखले आहे. हा पक्ष खोट बोलणाराही आहे आणि पक्ष फोडणाराही आहे. भाजपचे लोक असे वागतात हे दुर्दैवी आहे आशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
आ. जयंत पाटील म्हणाले की, या मतदारसंघाने मला नेहमीच भरघोस मतांनी निवडून दिले आहे. यावेळीही माझे लोक मला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील. तसेच महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून येतील. मोठ्या बहुमताने महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, काल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरार येथे पैशांसह पकडण्यात आले आणि देशभरात एकच खळबळ माजली. ही खळबळ थांबवण्यासाठी सुप्रियाताईच्या ऑडियो क्लिपचे कुंबाड रचले गेले. लोकांनी भाजपला ओळखले आहे. हा पक्ष खोटा बोलणाराही आहे आणि पक्ष फोडणाराही आहे. भाजपचे लोक असे वागतात हे दुर्दैवी आहे.
भाजपचा राष्ट्रीय नेता पैशांसोबत सापडतो याने सिद्ध होते की भाजप या निवडणुकीत काय करत आहे. हे महाराष्ट्राला खरेदी करायला निघाले आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे महाराष्ट्र विकणार नाही. २३ तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा कळेल की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान जपणारा आहे.
जयंत पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांनी सकाळी ११ वाजता सहकुटुंब साखराळे येथील बुध्द विहारातील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ.शैलजादेवी पाटील, त्यांचे जेष्ठ चिरंजीव,युवा नेते प्रतिक पाटील,धाकटे चिरंजीव राजवर्धन पाटील होते.