वर्धा: वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ संशोधक, विचारवंत डॉ.सुनीलकुमार लवटे ( कोल्हापूर ) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा.ल.भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी सरफराज अहमद (सोलापूर),शुभदा देशमुख (कुरखेडा-गडचिरोली), डॉ.सोमिनाथ घोळवे (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ व यशवंतराव दाते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली.
या पुरस्काराचे वितरण पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधराव पटवर्धन सभागृहात २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष , ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.
डॉ. यशवंत सुमंत कुटुंबियांच्या वतीने पाच वर्षापासून ज्येष्ठ अभ्यासकासाठी जीवनगौरव पुरस्कार सुरु केला आहे. यावर्षीच्या पाचव्या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने नुकतेच प्रकाशित केलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वांड्ग्मय १८ खंडाचे संपादक ज्येष्ठ संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे.
यशवंतराव दाते स्मृती संस्था व डॉ. भा. ल . भोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार्या भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सरफराज अहमद (सोलापूर) यांची ‘राष्ट्रवादआणि भारतीय मुसलमान’ या ग्रंथासाठी निवड करण्यात आली आहे.
भोळे कुटुंबीय व दाते संस्थेच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या डॉ. भा. ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख (कुरखेडा-गडचिरोली) यांची निवड करण्यात आली आहे. डॉ . यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा पुरस्कारासाठी शेती प्रश्नांचे अभ्यासक, संशोधक डॉ. सोमिनाथ घोळवे (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे .
वरील पुरस्काराचे स्वरूप डॉ.भा.ल. भोळे स्मृती पुरस्कार प्रत्येकी वीस हजार व डॉ.यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र असे आहे.
पुरस्कार निवड समितीमध्ये प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे, प्रा. हाशम शेख (वर्धा ), डॉ . अशोक चौसाळकर ( कोल्हापूर ), डॉ.चैत्रा रेडकर, विजयाताई भोळे,हिरण्यमय भोळे ,माधुरी सुमंत( पुणे ) व किशोर बेडकिहाळ ( सातारा ) आदी मान्यवरांनी काम केले अशी माहिती दाते स्मृती संस्थेचे संजय इंगळे तिगावकर व डॉ. राजेंद्र मुंढे यांनी दिली. माधुरी सुमंत , विजयाताई भोळे व दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या योगदानाद्वारे गेले अनेक वर्षांपासून हा उपक्रम महाराष्ट्रातील वैचारिक, साहित्यक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात रावबिण्यात येत आहे .