चित्रपटांसाठी फार मोठ्या प्रमाणावर पार्श्वगायन केलेले नसूनही गायक म्हणून लोकप्रियता मिळवण्याबरोबरच आपला एक चाहता वर्ग तयार करणा-या गायकांमध्ये मुकुंद फणसळकर यांचे नाव घ्यावे लागते. देखण्या व्यक्तिमत्त्वाला तेवढ्याच गोड गळ्याची साथ लाभलेले मुकुंद फणसळकर मराठी संगीताच्या क्षेत्राबरोबरच एकूण सांस्कृतिक क्षेत्रात लोकप्रिय होते. `नक्षत्रांचे देणे` या झी टीव्हीवरील लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या कार्यक्रमाचा ते भाग होते आणि त्या कार्यक्रमाद्वारे ते मराठी संगीत रसिकांच्या घराघरात पोहोचले होते. `नक्षत्रांचे देणे` या कार्यक्रमाने दोन दशकांपूर्वी मराठी भावसंगीताच्या रसिकांना वेगळी मेजवाणी दिली होती. आरती प्रभू, मंगेश पाडगावकर, शांता शेळके अशा एकेका कवीच्या किंवा विशिष्ट संगीतकाराच्या रचना घेऊन त्यावर आधारित हा कार्यक्रम असायचा. केवळ गाणी नव्हे, तर त्या गाण्यांमागच्या कथाही उलगडत जायच्या. अशा कार्यक्रमाची उंची वाढवण्यात मुकुंद फणसळकर यांचा मोठा वाटा होता. गीतगायन करताना काव्याला न्याय देणारे फार कमी गायक असतात, त्यात त्यांचा समावेश होता. अभ्यासपूर्ण अशा रसाळ निरूपण शैलीमध्ये ते काव्याचा अर्थ उलगडून दाखवत. कविवर्य ग्रेस यांच्या कवितांवर आधारित ‘साजणवेळ’ हा असाच एक रसिकप्रिय कार्यक्रम होता आणि त्यातील मुकुंद फणसळकर यांचा सहभागही महत्त्वाचा होता. ‘एक होता विदूषक’ आणि ‘दोघी’ चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांतील स्पर्धक ते सूत्रसंचालक आणि गायक अशा सर्व भूमिका त्यांनी नेटकेपणाने पार पाडल्या.
ज्येष्ठ गायक पं. शंकरराव व्यास यांच्या कन्या डॉ. रोहिणी चांदेकर यांच्याकडे फणसळकर यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. १९८० च्या दशकामध्ये त्यांनी गायनाचे कार्यक्रम सुरू केले. सुरुवातीला ते शास्त्रीय संगीत गात असत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतरचना ऐकून ते सुगम संगीताकडे वळाले. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भावसरगम’च्या अनेक कार्यक्रमांमध्ये फणसळकर यांचा सहभाग असे. प्रारंभीच्या काळात त्यांचा ‘स्मरणयात्रा’ हा सुगम संगीताची वाटचाल उलगडणारा कार्यक्रम गाजला होता. झी टीव्हीच्या ‘सारेगमप’ कार्यक्रमाचे ते विजेते ठरले होते. त्यांना लता मंगेशकर शिष्यवृत्ती मिळाली होती, तसेच स्वरानंद प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. उषा अत्रे-वाघ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
जुन्या गाण्यांच्या मैफलींना आपल्याकडे नेहमीच प्रतिसाद मिळत आला आहे. फणसळकर यांनी अशा मैफिलींच्या माध्यमातून रसिकांना समृद्ध केले. जुन्या हिंदी चित्रपटगीतांच्या त्याच्या कार्यक्रमाचं नाव होतं, ‘नॉस्टॅल्जिया’. हा कार्यक्रम नेहमीच हाउसफुल होत असे. गाणे अर्थासह उलगडून दाखवण्याबरोबरच चालीतील बारकावे सांगत ते गाऊन दाखवत. गाण्यांच्या कार्यक्रमात गाण्याच्या पलीकडचे काही देण्याचा त्यांचा प्रयत्न रसिकांना खूपच भावला, त्याचमुळे त्यांच्या कार्यक्रमांना रसिक नेहमी गर्दी करीत असत. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.