सूर्यकांत पाटणकर, पाटण : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पाटण विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विजयाची हॅटट्रिक करत दणदणीत विजय मिळवला. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर तसेच ‘मविआ’चे हर्षल कदम यांचाही त्यांनी दारुण पराभव केला आहे. तब्बल ३४ हजार ८३२ मतांनी शंभूराज देसाई विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत विजय साजरा केला.
पाटण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून शंभूराज देसाई यांच्यासमोर ‘मविआ’चे उमेदवार हर्षल कदम व त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले सत्यजित पाटणकर यांचे आव्हान होते. पाटण विधानसभा मतदारसंघातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, अशी अटकळ बांधली जात होती मात्र याला छेद देत शंभूराज देसाई यांनी विक्रमी मताधिक्याने विधानसभेची निवडणूक जिंकून पुन्हा पाटण तालुक्यावर ‘शंभू’राज प्रस्थापित केले आहे.
अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी बंडखोरी करून या निवडणुकीत आव्हान दिले होते. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले शंभूराज देसाई व सत्यजित पाटणकर यांच्यामध्येच खरी लढत होणार हे निश्चित मानले जात होते ते निकालावरून स्पष्ट झाले. शंभूराज देसाई यांना १ लाख २५ हजार ७५९ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांना ९० हजार ९३५ मते मिळाली. हर्षल कदम यांना ९ हजार ६२६ अपेक्षित मते मिळाली. पक्षफुटीची सहानुभूती असूनही महाविकास आघाडीचे हर्षल कदम यांना अपेक्षित मते न मिळाल्याने शंभूराज देसाई यांनी सुरुवातीच्या फेरीपासून अगदी शेवटच्या फेरीपर्यंत यांनी आघाडी कायम ठेवत आपला विजय साकार केला. दरम्यान, अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांना त्यांच्या बालेकिल्लात त्यांची झालेली पीछेहाट ही पाटणकर गटासाठी चिंतेची बाब असल्याचे समोर आले आहे.
बालेकिल्ला असलेल्या कोयना, पाटण या घरच्या बालेकिल्ल्यात पाटणकर यांना अपेक्षित मतदान मिळाले नाही. परिणामी शंभूराज देसाई यांना सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवण्यात यश आले. निवडणुकीच्या प्रचारात अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी आघाडी घेतली होती. मुंबई, पुणे येथील कार्यकर्त्यांच्या सभाही गाजल्या होत्या. या सभांना झालेली गर्दी पाहून अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर हे महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांना चांगली टक्कर देणार हे गृहीत धरले जात होते, मात्र मतमोजणी दिवशी हे चित्र नेमके उलटे झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद कदम यांनाही अपेक्षित मते मिळवण्यात अपयश आले. त्यांनी अपेक्षित मते मिळवली असती तर शंभूराज देसाई यांच्या विजयाची टक्केवारी कमी झाली असती, मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारालाही या ठिकाणी अपेक्षित मते न मिळाल्याने शंभूराज देसाई यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. निवडणुका जाहीर होण्याअगोदरच देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर त्यांनी बोलावून प्रचंड मोठा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यापासूनच शंभूराज देसाई यांनी पाटण तालुका पिंजून काढला होता. याचाच त्यांना फायदा झाला.
अशी घेतली आघाडी
शंभूराज देसाई यांना पहिल्या फेरीत ४२२ मतांची व तिसऱ्या फेरीत २ हजार ०८५ मतांची आघाडी मिळाली. सहाव्या फेरीत अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांना मिळालेली आघाडी कमी केली. परंतु आठव्या फेरीनंतर शंभूराज देसाई यांच्या मताधिक्यात वाढ होत गेली. अठराव्या फेरीपर्यंत देसाई यांची २४ हजार १५५ मतांची आघाडी राहिली. अखेरच्या २४ व्या फेरीमध्ये शंभूराज देसाई यांनी ३४ हजार ८३२ मतांनी अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर व महाविकास आघाडीचे हर्षद कदम यांच्यावर विजय मिळविला.