मंगलोर : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट दैनंदिनी, दिनदर्शिका व पब्लिक सर्व्हिस ॲडव्हर्टायझमेंटचा पुरस्कार मिळाला. पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील या पारितोषिकांचे वितरण कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. कृष्णा भट यांच्या हस्ते झाले. (Mahapareshan)
महापारेषणचे संचालक (मनुष्यबळ विकास) सुगत गमरे व जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी जनसंपर्क विभागाचे अभिनंदन केले.
मंगलोर येथील हॉटेल मोतीमहलमध्ये आयोजिलेल्या १८ व्या जागतिक संवाद परिषदेमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अभिनेते व दिग्दर्शक रवीकिरण, `पीआरसीआय`चे अध्यक्ष एम. बी. जयराम, डॉ. ममता लाला, डॉ. गीता शंकर, चिन्मयी प्रवीण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (Mahapareshan)
जनसंपर्क विभाग अग्रेसर
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी यशाचे संपूर्ण श्रेय जनसंपर्क विभाग व त्यांच्या टीमवर्कला दिले आहे. सृजनशील व नावीन्यपूर्ण काम व माध्यम क्षेत्रात सातत्याने होणारे नवे बदल समजून जनसंपर्क विभागाने कामांमध्ये वैविध्यता आणून सकारात्मक बदल केले. विशेषतः सोशल मीडियाव्दारे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब, टेलिग्राम, थ्रेडस) जनसंपर्क विभागाने महापारेषणची सकारात्मक भूमिका लोकांसमोर ठळकपणे मांडली. भविष्यातही, महापारेषणचा जनसंपर्क विभाग सातत्यपूर्ण कामगिरी करून महापारेषणचे नाव उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला.